बुलेट ट्रेन प्रकल्पबाधित शेतकरी मोबदल्यापासून वंचित
भिवंडी : मौजे भरोडी येथील शेतकरी कचरु कृष्णा पाटील कसत असलेली वडिलोपार्जित जमीन मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी संपादित झाली असून कचरु पाटील यांनी प्रांत कार्यालयात वारंवार हेलपाटे मारुनही जमीन भूसंपादनाचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे मोबदल्यासाठी मंत्रालयात जाऊन दाद मागणार असून मोबदला न मिळाल्यास मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा कचरु पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे.
या पार्श्वभूमीवर कचरु पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, १० नोव्हेंबर २०२३ रोजी संबंधित अधिकाऱ्यांनी माझ्याकडून बायोमेट्रिक रजिस्टर करुन घेतल्यानंतर मोबदला मिळण्यासाठी वर्षभर प्रांत कार्यालयात हेलपाटे मारले. परंतु, संबंधित अधिकाऱ्यांनी पैसे देता येत नसल्याचे सांगितले. त्यानंतर कचरु पाटील यांनी त्यांची महत्वाची कागदपत्रे मिळण्यासाठी प्रांत कार्यालयात अर्जाद्वारे मागणी केली असून आजतागायत सदर कागदपत्रे देण्यात आली नाहीत. त्यामुळे माहितीच्या अधिकाराद्वारे माहिती मागितली असता त्याचेही उत्तर मिळत नसल्याचे कचरु पाटील यांनी सांगितले.
बुलेट ट्रेन प्रकल्प बाधित जमीन कचरु पाटील यांची १०० वर्षापासूनची वडिलोपार्जित जमीन असून तहसीलदारांच्या ऑर्डरनुसार बायोमेट्रिक रजिस्टर करताना संबंधित अधिकारी धूर्त होते का? असा गंभीर प्रश्न कचरु पाटील यांनी उपस्थित केला आहे. संबंधित अधिकारी मोबदल्याचे पैसे देण्यास टाळत असल्याचा आरोप कचरु पाटील यांनी केला आहे. तर जमिनीचा मोबदला न मिळाल्यास मंत्रालयासमोर जाऊन आत्मदहन करणार असल्याचा इशाराही त्यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे.