सामुदायिक विवाह सूचक मेळाव्यास वाढता प्रतिसाद

वाशी : आगरी समाज प्रबोधन संस्था, डोंबिवली - ठाणे मार्फत दरवर्षी  सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. यंदा ३० एप्रिल २०२६ रोजी  आगरी समाज प्रबोधन संस्था तर्फे सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे.त्यासाठी आगरी वधु-वर परिचय मेळावा २३ नोव्हेंबर रोजी डोंबिवली येथील पिंपळेश्वर मंदिर मध्ये आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात ५९ मुली आणि १८३ मुलांनी सहभाग घेत नाव नोंदणी केली.

आगरी समाजात लग्नामध्ये मोठा खर्च होत असतो. आजच्या महागाईच्या जमान्यात लग्न खर्च सर्वांनाच पेलवत नसल्याने लग्न करताना कधी-कधी कर्जाच्या खाईत जावे लागते.त्यामुळे वधु-वर पित्याच्या डोक्यावर  खर्चाचा भार  वाढतो. समाजातील प्रतिष्ठा राखण्यासाठी कर्ज काढून लग्न केल्याची अनेक उदाहरणे आहेत.लग्न झाल्यानंतर काही जणांचे अर्धे आयुष्य कर्ज फेडण्यात गेले आहे. मात्र, लग्न खर्चाचा पसारा कमी व्हावा आणि आपल्या संस्कृतीचेही  जतन व्हावे याहेतुने आगरी समाज प्रबोधन संस्था, डोंबिवली तर्फे सामुदायिक विवाह सोहळ्याचा पर्याय पुढे आणण्यात आला आहे.त्यासाठी आधी आगरी समाजाचा परिचय मेळावा पार पाडला जातो. त्यानंतर इच्छुक वधु-वरांची नावे नोंदवली जाऊन एक मोठा मुहूर्त पाहून सामुदायिक विवाह पार पाडले  जातात. या अनुषंगाने २३ नोव्हेंबर रोजी वधु-वर परिचय मेळावा पार पडला. यावेळी ५९ मुली आणि १८३ मुलांनी सहभाग घेत नाव नोंदणी केली. वधु-वर परिचय मेळावा झाल्यानंतर वधु-वर यांची पसंती लागून लग्न गाठ बांधण्याचे ठरल्यावर परत एकदा लग्नासाठी नोंदणी करुन सामुदायिक विवाह पार पाडले जातात. संस्थेचे सर्व कार्यकर्ते या विवाहात अगदी  घरातील समारंभ असल्यासारखे कोणाचेही कार्यवाहकच होतात.या सामुदायिक विवाह सोहळ्यात फार मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येतात. या लग्न सोहळ्यात एकाच वेळी नातेसंबधातील सर्व जण एकाच ठिकाणी येत असल्याने वऱ्हाडाची धावपळ होत नाही. याशिवाय  सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न मोफत  लावले जात असून नवविवाहित जोडप्याला भावी आयुष्याशी प्रोत्साहन पर एक लाख रुपये भेट  स्वरुपात  देखील दिले जातात.यंदा ३० एप्रिल २०२६ रोजी पिंपलेश्वर मंदिर मैदान, सागाव, कल्याण-शिळ रोड, डोंबिवली (पूर्व) या ठिकाणी आगरी समाज प्रबोधन संस्था तर्फे  सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, आगरी समाजातील लोकांनी सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी पुढाकार घेऊन सामुदायिक विवाहसाठी इच्छुक वधु-वरांची आगरी समाज प्रबोधन संस्था कार्यालयात नावे नोंदवावी, असे आवाहन  समाजसेविका अंजलीताई भोईर यांनी केले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘साईबाबां'ची मानाची पालखी उरण मधून मार्गस्थ