नवी मुंबई मेट्रोची झेप : २ वर्षांत गाठला १ कोटीहून अधिक प्रवासी संख्येचा टप्पा  

नवी मुंबई : नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. १ बेलापूर ते पेंधर दरम्यान गत दोन वर्षांत १ कोटी १५ लाख २८ हजार प्रवाशांनी या मेट्रो सेवेचा लाभ घेतल्याची माहिती सिडकोने प्रसिध्द केली आहे. १७ नोव्हेंबर २०२३ पासून सुरु झालेल्या या मेट्रो सेवेला सोमवारी दोन वर्षे पुर्ण झाली आहेत.  

मागील दोन वर्षांच्या कालावधीत मेट्रो सेवेच्या प्रवासी संख्येने गाठलेला एक कोटींहून अधिक आकडा हा मेट्रो सेवेला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभत असल्याचा दावा सिडकोने केला आहे. या मेट्रो मार्गामुळे बेलापूर, खारघर व तळोजा परिसरातील कार्यालये, गृहसंकुले व उद्योग-व्यवसाय यांना अधिक चांगली कनेक्टिव्हिटी लाभली असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांचे म्हणणे आहे.  

मेट्रो सेवा अधिक कार्यक्षम करण्याकरिता सिडकोतर्फे वेळापत्रकाचे काटेकोर नियोजन करण्यात येऊन सध्या गर्दीच्या वेळी दर १० मिनिटांनी बेलापूर व तळोजा स्थानकांदरम्यान दोन्ही दिशांना मेट्रोच्या फेऱया उपलब्ध आहेत. तर उर्वरित वेळांमध्ये दर पंधरा मिनिटांनी मेट्रोची फेरी उपलब्ध आहे. मेट्रोच्या तिकीट दरात कपात करण्यात येऊन सध्या तिकीटाचा किमान दर रु. १० व कमाल दर रु. ३० इतका आहे. या प्रवासी स्नेही सुधारणांमुळे सदर मार्गावरील मेट्रो सेवेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभत असल्याचे सिडकोचे म्हणणे आहे.  

दरम्यान, मेट्रो मार्ग क्र. १ चा विस्तार बेलापूरपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत करण्यात येणार आहे. तसेच १६ कि.मी. लांबीचा मेट्रो मार्ग क्र. २ पेंधर ते तळोजा एमआयडीसी दरम्यान नियोजित असून कळंबोली आणि कामोठे मार्गे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत या मार्गाचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.    

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते नवी मुंबई महापालिकेस प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान