ऐकून घेऊ सगळ्यांचं...एक मत देऊ जबाबदारीचं...

ठाणे : ऐकून घेऊ सगळ्यांचं...एक मत देऊ जबाबदारीचं... महिला बचतगट महिलांचे संघटन आहे. या महिलांचा आपापल्या परिसरात इतर महिलांशी दैनंदिन संपर्क असतो. या संपर्काचा वापर करुन महिला बचत गटांनी महिलांमध्ये मतदानाविषयी जनजागृती कशी करावी आणि मतदानातील महिलांचा सहभागाचा टक्का कसा वाढवावा याविषयी स्वीप पथक द्वारे नुकतेच महिला बचत गटांमधील महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात २५ ठाणे-लोकसभा मतदारसंघ अंतर्गत १४८ -ठाणे विधानसभा मतदारसंघ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाची टक्केवारी आणि मतदान जनजागृती करण्यासाठी ४ मे रोजी महिला बचतगटाच्या माध्यमातून बचतगटातील महिला सदस्यांमध्ये मतदान जनजागृती करण्याचा कार्यक्रम ठाणे मधील दादा पाटीलवाडी येथे आयोजित करण्यात आला होता.

या मतदान जनजगृती कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या बचतगटातील महिला वर्गाला ‘मी मतदान करणारंच...आपणही आपल्या मतदानासाठी सज्ज रहा', या आशयाचे मजकूर असलेले आणि त्यावर मतदान २० मे २०२४ रोजी असे दर्शवणारे माहितीपत्रकाचे वाटप करण्यात आले.

मतदानामध्ये सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. एकही महिला मतदानापासून वंचित राहू नये, शहरातील महिलांना मतदानासाठी सहभागी करुन घेण्यामध्ये महिला बचत गटांनी सहभाग द्यावा. बचत गटाच्या माध्यमातून बचत गटाच्या सदस्य,तुमच्या आजूबाजूला राहतात त्या महिला,कटुबातील सदस्य,नवमतदार आणि नागरिक यांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे, सर्वानी न चुकता दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे, असे आवाहन या कार्यक्रमात सर्व महिलांना करण्यात आले.

याप्रसंगी दादा पाटीलवाडी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना सुलभ मतदानासाठी उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती देण्यात आली. यावेळी  ८२ वर्षीय सिता राऊत यांनी ‘मी २० मे रोजी मतदान करणार आणि इतरांनाही मतदान करायला सांगणार', असे नमूद केले. यावेळी सामूहिक मतदानाची प्रतिज्ञा घेण्यात आली.

    सदर मतदान जनजागृती कार्यक्रमासाठी प्रतिमा, महालक्ष्मी, इच्छापूर्ती, वैभवलक्ष्मी,अनमोल आणि नर्मदा या सर्व बचतगटातील महिलांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित सर्व महिलांनी ‘ऐकून घेऊ संगळ्यांचं...एक मत देऊ जबाबदारीचं...' असा संदेश देत सर्व नागरिकांना २० मे रोजी मतदान करण्याचे आवाहन केले. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

महायुतीच्या प्रचारासाठी  नवी मुंबईतील भाजपा  कार्यकर्ते - पदाधिकारी सज्ज