महायुतीच्या प्रचारासाठी  नवी मुंबईतील भाजपा  कार्यकर्ते - पदाधिकारी सज्ज

नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी पूर्ण ताकदीने  काम करणार 

नवी मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनानुसार  नवी मुंबईतील  कार्यकर्ते आणि पदाधिकारी  महायुतीच्या  निवडणूक प्रचारासाठी सज्ज झाले असून  नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी ठाणे लोकसभेच्या उमेदवाराला मताधिक्क्याने निवडून आणण्याचा निर्धार केला आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी 6 में रोजी सायंकाळी नवी मुंबई जिल्हा भाजपाचे  लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची  संवाद बैठक घेऊन  त्यांच्या भावना जाणून घेतल्या. या बैठकीस आमदार गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्यासह  माजी महापौर, वरिष्ठ पदाधिकारी, नवी मुंबईसह ठाणे आणि मीरा-भाईंदर मधील  माजी लोकप्रतिनिधी, संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हि निवडणूक देशाची निवडणूक आहे.  मोदीजींना पुन्हा  पंतप्रधान बनवण्यासाठी आपले राजीनामे परत घेऊन  महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी काम करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. आमदार गणेश नाईक हे  नवी मुंबईच्या विकासाचे शिल्पकार असून  नवी मुंबईच्या  विकासासाठी आणि नवी मुंबई भाजपा जिल्हा मजबूत करण्यासाठी  आपले नेहमी पाठबळ असेल. नवी मुंबईवर आपण अन्याय होऊ देणार नाही, असा शब्द देखील त्यांनी दिला.

या बैठकीचे प्रास्ताविक करताना  जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी  महाराष्ट्राच्या निवडणूक प्रचाराची धुरा  खांद्यावर असताना अतिशय व्यस्त वेळापत्रकातून  वेळ काढून उपमुख्यमंत्री फडणवीस  नवी मुंबईतील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधण्यासाठी आल्याबद्दल  त्यांचे आभार व्यक्त केले. देवेंद्र फडणवीस  कार्यकर्त्यांच्या भावना जाणणारे नेतृत्व आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघांमध्ये  भारतीय जनता पक्षाची ताकद जास्त असल्याने हा मतदारसंघ  भाजपाला मिळावा अशी  कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची इच्छा होती. निवडणूक प्रचाराची  आखणी करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत  या सर्वांनी  अनपेक्षितपणे आपल्या भावना व्यक्त केल्या. मात्र नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी  आपल्याला काम करायचे आहे, ही  बाब आम्ही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना समजावून सांगितली. पक्ष हितासाठी अनेक वेळा त्याग करावा लागतो असे नमूद करून राज्यामध्ये महायुतीचे सरकार स्थापन करण्यासाठी देवेंद्रजी यांनी केलेला त्याग  कार्यकर्त्यांनी  आठवावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष नाईक यांनी यावेळी केले. 

आमदार गणेश नाईक यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघ  भाजपाला न मिळाल्याने  कार्यकर्त्यांमध्ये  अस्वस्थता होती. ती अनपेक्षितपणे  व्यक्त झाल्याचे सांगितले. मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी  सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी  आपल्या पदाचे दिलेले राजीनामे परत घेऊन निवडणूक प्रचाराचे काम करतील, अशाप्रकारे  उपमुख्यमंत्री फडणवीस यांना आश्वस्त केले. 

संवाद बैठकीमध्ये  नवी मुंबई भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र इथापे, महामंत्री नेत्रा शिर्के  आणि महामंत्री सुरज पाटील यांनी भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने  प्रतिनिधिक  स्वरूपात आपल्या भावना   व्यक्त केल्या.  पक्ष नेतृत्वाच्या आणि लोकनेते आमदार  गणेश नाईक यांच्या आदेशानुसार महायुतीच्या विजयासाठी आम्ही  सर्व शक्तीनिशी  काम करू, अशी ग्वाही या पदाधिकाऱ्यांनी दिली.   

काँग्रेसच्या माजी नगरसेविकेसह अनेक  पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश...

संवाद बैठकीप्रसंगी उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये  नवी मुंबई मनपाच्या काँग्रेसच्या माजी नगरसेविका मीरा पाटील, नेरुळचे काँग्रेस तालुका सचिव दिनेश गवळी, गणेश पालवे, संकल्प पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी  भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपामध्ये या सर्वांचे स्वागत करण्यात आले.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

३० वर्षे जुन्या इमारतींना स्ट्रक्चरल ऑडिट अनिवार्य