मनाचे श्लोक

अखिल मानवजातीच्या कल्याणाठीच तर महान ऋषिमुनींनी, संतांनी ही अफाट आणि अद्‌भुत ग्रंथ संपदा निर्माण करून ठेवली आहे. पण जो मनुष्य या ग्रंथांचे केवळ वाचन, पाठांतर, पारायण यावर लक्ष केंद्रित करून त्यातील अर्थाकडे, आशयाकडे दुर्लक्ष करतो तो स्वतःची अपरिमित हानी करून घेतो. तसेच आपल्या "क्रियेवीण वाचाळतेने” लोकांनाही पथभ्रष्ट करतो.

फुकाचे मुखी बोलता काय वेचे।
दिसेंदीस अभ्यांतरी गर्व सांचे।
क्रियेवीण वाचाळता वेर्थ आहे।
विचारे तुझा तूच शोधून पाहे । श्रीराम ११४।
तुटे वाद संवाद तेथे करावा।
विवेके अहंभाव हा पालटावा।
जनी बोलण्यासारिखे आचरावे।
क्रियापालटे भक्तिपंथेचि जावे । श्रीराम । ११५ ।

काही विद्वानांचा भरपूर शास्त्राभ्यास असतो. अनेक ग्रंथांचे, अनेक प्रकारच्या साहित्याचे विपुल वाचन असते. त्यामुळे त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात माहितीचा साठा असतो. समृद्ध शब्दभांडार असते. काही जणांना वक्तृत्वाची देणगी असते. या सगळ्या भांडवलाच्या आधारावर हे विद्वान बोलत राहतात. हे बोलणे फुकटचे असते. त्यासाठी काही खर्च करावा लागत नाही. उलट त्यांच्या वक्तृत्व कलेला आणि भाषा वैभवाला भूलून लोक प्रवचनांसाठी आमंत्रणे देतात. सत्कार करतात. लोक प्रशंसा करतात. मात्र प्रचितीचा आधार नसलेली ही व्यर्थ भाषणे ना श्रोत्यांचे भले करतात ना वक्त्याचे. उलट लोकेषणा वाढत जाते आणि जसजसे तिचे पोषण होत जाते तसतसा या विद्वानांच्या अंतर्यामी गर्वमात्र साचत जातो. समर्थांनी इथे गर्व "साचतो” असे म्हटले आहे.

एखाद्या डबक्यात पाणी साचते. त्यात केरकचरा जमा होतो. उपद्रवी कीटकांची पैदास होते. हे साचणे हानीकारक असते. नदीचे पाणी वाहते असते. म्हणूनच नदी जीवन दायिनी ठरते. जेव्हा संकुचित अंतःकरणात गर्व साचतो तेव्हा तिथे हानीकारक विकारांची पैदास होते. म्हणूनच अंतःकरण विशाल करून विचारांचा प्रवाह वाहता ठेवायचा असतो. वेद-शास्त्रे-पुराणे हे अध्यात्मिक ग्रंथ जीवन प्रवाही कसे ठेवायचे, अंतःकरण निर्मल आणि विशाल कसे करायचे याचे उत्तम मार्गदर्शन करतात. त्यानुसार आचरण केले तर जन्माचे सार्थक होते. अखिल मानवजातीच्या कल्याणाठीच तर महान ऋषिमुनींनी, संतांनी ही अफाट आणि अद्‌भुतग्रंथ संपदा निर्माण करून ठेवली आहे. पण जो मनुष्य या ग्रंथाचे केवळ वाचन, पाठांतर, पारायण यावर लक्ष केंद्रित करून त्यातील अर्थाकडे, आशयाकडे दुर्लक्ष करतो तो स्वतःची अपरिमित हानी करून घेतो. तसेच आपल्या "क्रियेवीण वाचाळतेने” लोकांनाही पथभ्रष्ट करतो. स्वानुभवी, स्वरूपस्थित महापुरुष आपल्या बोधातून लोकांना परमेश्वराच्या समीप कसे जावे, त्याच्याशी एकरुप कसे व्हावे याचे मार्गदर्शन करतात. पण जे केवळ वाचाळवीर असतात ते आपल्या शब्दज्ञानाच्या अहंकारामुळे स्वतः तर भगवंतापासून दूर असतातच, शिवाय लोकांनाही परमात्म्यापासून, शाश्वत आनंदापासून दूर भरकटत नेतात. कोणताही मनुष्य लोकांना कितीही भूलवत असला तरीही स्वतःला तो ओळखून असतो. आपले बोलणे पोकळ आहे याची त्यालापूर्ण जाणीव असते. लोकांच्या प्रश्नांची उत्तरे आपल्याकडे नाहीत हे त्याला पक्के ठाऊक असते. आपले अज्ञान, आपली अपूर्णता झाकण्यासाठी तो दांभिक बडबड करून लोकांचे लक्ष इतरत्र वेधत राहतो.

समर्थ म्हणतात, ज्या बडबडीने कोणाचेच हीत साधत नाही ती व्यर्थ वाचाळता काय कामाची? प्रत्येकाने आपल्या अंतर्मनात डोकावून विचारपूर्वक आपल्या वागण्या-बोलण्यातील विसंगती तपासून पहावी. स्वतःशी प्रामाणिक राहून आपली अहंता आणि इतर विकार ओळखावेत. त्यांना दूर करण्याचा मनापासून प्रयत्न करावा आणि सत्य, आनंदस्वरूप भगवंताला जवळ करण्यासाठी उपाय शोधावा. हा उपाय संतसंगतीत सापडतो. तिथे परमात्म्याचे गुणगान केले जाते. त्याच्या सच्चिदानंद स्वरूपाची पूर्ण ओळख व्हावी यासाठी स्वानुभवी गुरू आणि जिज्ञासु शिष्य यांच्यामध्येहृद्य संवाद होतो. आपले प्रचितीचे ज्ञान सद्‌गुरू मुक्त हस्ताने निरपेक्षपणे शिष्यांना दान करतात. गुरूंना धनदौलत, मानसन्मान इ. कशाचीही अपेक्षा नसते. शिष्यांचे कल्याण व्हावे हीच तळमळ असते. शिष्याला आत्महीत साधायचे असते. त्याला गुरूंबद्दल आदर आणि शरणागत भाव असतो. संतसंगतीत वाद संपतात. सर्व शंका फिटतात. विचार-विवेकजागृत होतो. आत्मानात्म विवेकाने नित्य-अनित्य यांतील भेद कळतो. आपली नश्वरता आणि परमात्म्याची शाश्वतता समजते. आपल्या क्षुद्र देहाचा क्षुद्र अहंकार किती पोकळ आहे, निरर्थक आहे याचे भान येते. समर्थ म्हणतात, विचारपूर्वक, तटस्थपणे आपल्या गुणदोषांचा शोध घ्यावा.

 डोळसपणे, सावधपणे आपल्या वर्तनात योग्य तो बदल करावा. अहंता खूप सूक्ष्म असते. "मला अहंकार नाही” हीदेखील अहंताच आहे हे सहज लक्षात येत नाही. जोपर्यंत आपले ज्ञानकृतीत उतरत नाही तोपर्यंत ते व्यर्थच असते. या आधीच्या श्लोकांतूही समर्थांनी हा मुद्दा मांडला आहे. "क्रियेवीण नानापरी बोलिजेते। तया मानवा देव कैसेनी पावे”(१०४), "विवेके क्रिया आपुली पालटावी” (१०५). ज्ञानेश्वर माऊली हरिपाठात म्हणतात, "अनंत वाचाळ बरळती बरळ। तयां कैसेनि गोपाळ पावे हरि (७-३). नाठाळ मनाला एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगावी लागते. तेव्हा कुठे विचाराची दिशा हळुहळु बदलु लागते.

संत सद्‌गुरू तळमळीने लोकांना सातत्याने असा बोध करत राहतात. संत तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचे तर त्यांना हे भवसागरात बुडणारे लोक पाहवत नाही. जगाच्या कल्याणासाठीच अवतरलेल्या संतांचा जीव लोकांसाठी तुटतो. या मनोबोधाचे प्रयोजन समर्थांना पहिल्या दोन श्लोकांतून सांगितले आहे. "गमु पंथ आनंत या राघवाचा”(१), "मना सज्जना भक्तीपंथेचि जावे” (२)दासबोधात पहिल्याच समासात ग्रंथाची फलश्रुती सांगताना समर्थ म्हणतात, "आता श्रवण केलियाचे फळ। क्रिया पालटे तात्काळ। तुटे संशयाचे मूळ। येकसरा । श्रीराम । (१-१-२८) बध्दचि होती मुमुक्ष। मूर्ख होती अति दक्ष। अभक्तचि पावती मोक्ष। भक्तीमार्गे । श्रीराम । (१-१-३४ ) सर्वसामान्य माणसांसाठी भक्तीमार्ग हाच कल्याणाचा मार्ग आहे. म्हणून समर्थ या श्लोकांतून पुन्हा एकदा सांगत आहेत की माणसाने सारासार विचार करावा, नश्वर देहाचा अहंकार सोडावा, बोलण्या-वागण्यात ताळमेळ ठेवावा आणि नाशिवंत जगाकडे धाव घेणा-या मनाला आवरून शाश्वत भगवंताकडे वळवावे. आता रहस्य असे आहे की अहंता पूर्ण गेल्याशिवाय भक्ती पूर्णपणे साधत नाही आणि भक्ती दृढ झाल्याशिवाय अहंता क्षीण होत नाही. या रहस्याची उकल फक्त संत संगतीत होते. संतांना, भगवंताला शरण गेल्यानंतर किती आणि कसा लाभ होतो ते पुढच्या दहा श्लोकांतून समर्थ सांगत आहेत.
जय जय रघुवीर समर्थ
- आसावरी भोईर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

ऑनलाइन गेमिंग