ऑपरेशन सिंदूर : दहशतवादाविरुद्ध भारताच्या धोरणाची नवी व्याख्या
ऑपरेशन सिंदूर हे दहशतवादाविरुद्ध भारताच्या धोरणाची नवी व्याख्या आहे. या ऑपरेशनच्या माध्यमातून भारताने शून्य-सहिष्णुता धोरणाचे नवीन निकष प्रस्थापित केले, जगाला आपली ताकद दाखवून दिली आणि लोकहितवादी म्हणून जागतिक शांततेसाठी मोठे योगदान दिले. या मोहिमेत दिसून आलेला मानवतावाद, तांत्रिक कार्यक्षमता आणि प्रखर मुत्सद्देगिरी यांचा अनोखा संगम पाहून जग अचंबित झाले. ऑपरेशन सिंदूर हा एक संदेश आहे की ज्या देशातील महिला पंतप्रधान, राष्ट्रपती झाल्या आहेत, जिथे मुली मोठ्या संख्येने पायलट, डॉक्टर, वैज्ञानिक, इंजिनिअर बनत आहेत तसेच सैन्यात भरती होत आहेत, त्या देशाची नारीशक्ती अत्यंत प्रबळ आणि तेजस्वी आहे.
दहशतवाद ही कोणतीही नैसर्गिक आपत्ती किंवा अपघाती घटना नव्हे की दहशतवादग्रस्त लोक किंवा त्यांच्या कुटुंबीयांची समजूत घालता येईल की त्यांनी या घटनेला नशिबाचा खेळ किंवा प्रारब्ध मानून विसरून जावे. दहशतवाद हा पूर्णपणे मानवनिर्मित असून यात लोकांना शारीरिक आणि मानसिक अत्याचाराला सामोरे जावे लागते. यामध्ये हिंसेचा मार्ग अवलंबून लोकांच्या मनात भीती निर्माण करून समाजात अस्थिरता पसरवण्यात येते ज्यामुळे सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत होते.
संत-महात्म्यांची जननी म्हणून ओळख असलेल्या आपल्या भारतभूमीने जगाला विश्वबंधुत्व, प्रेम आणि शांततेचा संदेश दिला आहे. विविधरंगी भाषा, संस्कृती आणि जीवनशैलीच्या माध्यमातून भारताने विविधतेत एकता याचे सर्वश्रेष्ठ उदाहरण जगासमोर ठेवले आहे. भारताने नेहमीच कठीण परिस्थितीचा सामना तर्क आणि विवेकाच्या आधारावर केला आहे. या भूमीने शिशुपालासारख्या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांचे शंभर अपराधदेखील श्रीकृष्णाप्रमाणे माफ केले आहेत. परंतु भारताचा संयम आणि मौन ही त्याची कमजोरी नव्हे. भारताला दुर्बळ समजणाऱ्यांना योग्य वेळी जशास तसे उत्तर देणे, तसेच शत्रूवर भारी पडणे व त्याचा काळ बनणे हे भारताला चांगलेच ठाऊक आहे. थोडक्यात, आपली शक्ती आणि योग्यता दाखवून आपल्या प्रतिभेची मोहोर उमटवणे भारताला अवगत आहे. भारत दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी पूर्णपणे दृढसंकल्पित आहे.
भारताचा दहशतवादविरोधी लढा हा कोणत्याही दुर्भावनेतून जन्मलेला नसून त्यात लोकहिताची भावनाच सर्वोपरी आहे. या लढ्यामागे जगात शांतता नांदवण्याची सामूहिक इच्छा आहे. भारताने आतापर्यंत दहशतवादाच्या निर्मूलनासाठी अनेक ऑपरेशन राबवले आहेत ज्यांत ऑपरेशन पवन, ऑपरेशन रक्षक, ऑपरेशन सर्प विनाश, सर्जिकल स्ट्राईक, ऑपरेशन बालाकोट स्ट्राईक काही विशेष नावं आहेत. या सर्वांमध्ये ऑपरेशन सिंदूर हे सर्वात नवीन आणि महत्त्वाचे आहे. हे ऑपरेशन यशस्वी करून भारताने कर्तव्यपरायणता, नियोजनबद्धता, प्रसंगावधान, वक्तशीरपणा, नेतृत्व कौशल्य आणि संतुलित दृष्टिकोन अशा अनेक गुणांचा परिचय जगाला करून दिला.
ऑपरेशन सिंदूर हे ‘यथा नाम तथा गुण' याचा प्रत्यय देणारे ठरले. हे साहस आणि वीरतेचे सिंदूर आहे. या नावात त्या तमाम माता-भगिनींचा आक्रोश दडलेला आहे ज्यांच्या डोळ्यांदेखत नराधमांनी त्यांच्या प्रिय व्यक्तींना निर्दयीपणे मृत्युमुखी पाडले. या नावात सामान्य जनतेचा दहशतवाद्यांविरोधी भावनांचा भडका सामावलेला आहे. या नावात असा संदेश आहे की आपल्या माता-भगिनींच्या सिंदुरावर म्हणजेच सौभाग्यावर घाला घालणाऱ्यांना निकृष्टतम वागणूक दिली जाईल कारण त्यांच्या सिंदुराचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्य आहे. या अर्थाने ‘सिंदूर' हे नाव अत्यंत सार्थ आणि योग्य आहे.
भारतात विविध जाती-धर्माचे लोक एकत्र मिळून-मिसळून राहतात. येथे अनेक व्यक्तींनी आपल्या क्षमता व कौशल्याच्या जोरावर देशाची प्रमुख पदं भूषवली आहेत. याव्यतिरिक्त जागतिकीकरणाच्या या युगात विविध देश व्यापार व आयात-निर्यातीच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले गेलेले आहेत आणि प्रगतीचे नवीन मापदंड प्रस्थापित करत आहेत. अशा परिस्थितीत पहलगाम हल्ल्यात लोकांचा धर्म विचारून त्यांची हत्या करणे हे अत्यंत दुःखदायक आणि लज्जास्पद आहे. हे कृत्य म्हणजे संपूर्ण जगाच्या कपाळावर कलंकच आहे. या हल्ल्याला भारताने अत्यंत विचारपूर्वक आणि संयमाने उत्तर दिले. भारतीय सैन्यातील दोन वेगवेगळ्या धर्माच्या महिलांनी ऑपरेशन सिंदूर फत्ते केले. या महिलांच्या माध्यमातून जगासमोर पुन्हा एकदा भारताची नारीशक्ती आणि र्धमनिरपेक्षतेचे प्रबळ उदाहरण समोर आले. त्यांनी केवळ २५ मिनिटांत दहशतवाद्यांचे नऊ तळ उध्वस्त केले. भारताची ही कारवाई अत्यंत केंद्रित, अचूक आणि चिथावणीरहित होती. यामध्ये पाकिस्तानी लष्करी प्रतिष्ठानं किंवा निर्दोष नागरिक यांना कोणत्याही प्रकारची इजा पोहोचवण्यात आली नाही ज्यावरून हे सिद्ध होते की भारताच्या ऑपरेशन सिंदूरचा आधार वैयक्तिक वैर नसून केवळ दहशतवादविरोधी कारवाई करणे हा होता. भारताच्या या सम्यक्दृष्टिकोनाचे जागतिक स्तरावर कौतुक झाले.
ऑपरेशन सिंदूर याच्या माध्यमातून भारताने दहशतवादाबद्दलचे आपले शून्य-सहिष्णुता धोरण स्पष्ट केले. भारताने आपल्या कृतीतून दाखवून दिले की भारत आता दहशतवादी हल्ले सहन करणार नाही आणि आपल्या लोकांच्या रक्षणासाठी अन्यायाविरुद्ध आवाज उठवेल. या रास्त दहशतवादविरोधी लढ्याला जगभरातून पाठिंबा मिळाला. माद्रिद येथे भारताचे हे धोरण मांडण्यात आले ज्यातून यावर शिक्कामोर्तब झाले की भारत दहशतवादाशी लढण्यास वचनबद्ध आहे.
भारताने उचललेल्या कठोर पावलांमुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडून पडली. यामध्ये पाकिस्तानमध्ये तयार करण्यात येणाऱ्या किंवा तेथून आयात होणाऱ्या वस्तूंवर बंदी, सिंधू जल कराराचे निलंबन, अटारी-वाघा सीमा बंद करणे, पाकिस्तानी राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी आणि भारतीय सैन्याला दहशतवादविरोधी मोहिमांसाठी दिलेली मोकळीक यांचा समावेश आहे. यामुळे पाकिस्तानची शेती, पाणीपुरवठा आणि ऊज्राानिर्मिती यांवर संकट कोसळले, अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली आणि महागाई प्रचंड प्रमाणात वाढली. भारताचे हे कठोर वर्तन केवळ एक झलक होती की भारत कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहे. गेल्या वर्षी दहशतवादाविरुद्ध सुरू झालेले हे ऑपरेशन सिंदूर अद्याप औपचारिकपणे संपलेले नाही. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष उलटून गेले असले तरी त्याच्या जखमा आजही तितक्याच ताज्या आहेत, त्याच्या वेदना आजही अनेक लोकांच्या नयनांमधून अश्रुरूपात ओसंडून वाहत आहेत. म्हणूनच ऑपरेशन सिंदूर ही शत्रूसाठी विनाशाची चाहूल आहे ज्याकडे दुर्लक्ष करणे शत्रूला महागात पडू शकते, त्याच्यासाठी दुर्दैवी ठरू शकते.
ऑपरेशन सिंदूर हे दहशतवादाविरुद्ध भारताच्या धोरणाची नवी व्याख्या आहे. या ऑपरेशनच्या माध्यमातून भारताने शून्य-सहिष्णुता धोरणाचे नवीन निकष प्रस्थापित केले, जगाला आपली ताकद दाखवून दिली आणि लोकहितवादी म्हणून जागतिक शांततेसाठी मोठे योगदान दिले. या मोहिमेत दिसून आलेला मानवतावाद, तांत्रिक कार्यक्षमता आणि प्रखर मुत्सद्देगिरी यांचा अनोखा संगम पाहून जग अचंबित झाले. ऑपरेशन सिंदूर हा एक संदेश आहे की ज्या देशातील महिला पंतप्रधान, राष्ट्रपती झाल्या आहेत, जिथे मुली मोठ्या संख्येने पायलट, डॉक्टर, वैज्ञानिक, इंजिनिअर बनत आहेत तसेच सैन्यात भरती होत आहेत, त्या देशाची नारीशक्ती अत्यंत प्रबळ आणि तेजस्वी आहे. स्त्रीच्या सिंदुराचे आणि न्याय व धर्माचे रक्षण करण्यासाठी अद्भुत साहसाने राबवण्यात आलेले ऑपरेशन सिंदूर हे जगासमोर एक उत्तम उदाहरण आहे; हे विजयशिखरावर विराजमान भारताच्या इतिहासातील एक असाधारण ऑपरेशन आहे.
गेली कितीतरी दशके जगातील अनेक देश दहशतवादाच्या समस्येने ग्रासलेले आहेत. दहशतवाद हा वाळवीसारखा आहे जो बघता-बघता अनेक देशांना पोखरून काढेल. हा एक विषारी साप आहे जो मानवजातीला गिळंकृत करेल. खरंतर दहशतवादाला फोफावू देणे हेच मुळात मानवतावादाच्या विरुद्ध आहे. त्यामुळे आता प्रश्न हा आहे की जर एकीतच बळ आहे, तर सर्व देश मिळून दहशतवादाविरुद्ध युद्धाची घोषणा करू शकत नाहीत का? ही दुःखाची बाब आहे की आज अनेक देश आपापसात लढत आहेत; ज्यामुळे महायुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु आज गरज आहे ती आपापसातील मतभेद आणि वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून दहशतवादासारख्या मोठ्या शत्रूचा मुकाबला करण्याची. एकटा माणूस मोठी कामगिरी करू शकत नाही. मात्र सर्वांनी एकत्र येऊन जोर लावला तर डोंगर फोडूनही मार्ग काढता येऊ शकतो. पाच बोटांनी जशी मूठ बनते, तशाच प्रकारे आता वेळ आली आहे एकत्र येण्याची, दहशतवादाविरुद्ध आवाज उठवून या दहशतवादरूपी राक्षसाला मुळासकट उपटून टाकण्याची; अशा प्रकारे जागतिक शांततेच्या दिशेने पाऊल टाकून सामान्य लोकांच्या जीवनाची बाग फुलवून या धरणीमातेला आनंदी करण्याचा एक सार्थ प्रयत्न करण्याची!
- कु. शीतल कोकाटे, ठाणे (भाषाशास्त्री)