लोकल मध्ये महिलांच्या सर्व डब्यात जून अखेरपर्यंत सीसीटीव्ही, टॉकबॅक यंत्रणा

नवी मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे लोकल मधून प्रवासा करणाऱ्या  महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, लोकल मध्ये महिलांच्या सर्व डब्यात येत्या जून अखेरपर्यंत सीसीटीव्ही, टॉकबॅक यंत्रणा सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.    

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर महिला प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र, लोकल मधून प्रवासा करणाऱ्या महिला प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असतानाच महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला असल्याचे लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने महिलांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

मुंबई उपनगरीय रेल्वे लोकलमधून दररोज ७५ लाखांपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतात. त्यापैकी महिला प्रवाशांची संख्या सुमारे ३० टक्के आहे. तर लोकलमधील २९ टक्के आसने महिला प्रवाशांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. पहाटेच्या पहिल्या लोकलपासून रात्री सुटणाऱ्या शेवटच्या लोकल मधून महिला प्रवासी प्रवास करत असतात. विशेष म्हणजे उपनगरीय रेल्वे मार्गांवर महिला प्रवाशांची संख्या वाढत असताना महिलांच्या लोकल प्रवासातील सुरक्षिततेचा मुद्दा समोर आलेला आहे. परिणामी महिला प्रवाशांचा रात्रीचा प्रवास अधिक सुरक्षित होण्याकरिता लोहमार्ग पोलीस सतत प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमीवर लोकलमधील महिला डब्यातील छेडछाडीसह इतर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार  रेल्वे लोकलमधील महिलांच्या सर्व डब्यात येत्या जून २०२४ अखेर पर्यंत सीसीटीव्ही आणि टॉकबॅक यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या जून महिन्यानंतर महिलांचा डब्यात  कडेकोट बंदोबस्त असणार आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेतील महिला प्रवाशांचा प्रवास आता जून नंतर आधुनिक सुरक्षिततेत होणार आहे.

रेल्वे पोलीस महासंचालक कार्यालयाने रेल्वे मधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांचे सर्वेक्षण केले. खाकी गणवेशात रेल्वे पोलीस तैनात करण्याची पारंपरिक पध्दत बदलून सीसीटीव्ही आणि टॉकबॅक यंत्रणा लागू करुन आधुनिक सुरक्षेची गरज असल्याचे मत सर्वेक्षणात सहभागी झालेल्या सुमारे ५९ टक्के महिला प्रवाशांनी व्यक्त केले. याची दखल घेऊन लोकल ट्रेनमध्ये महिलांवरील विनयभंग आणि इतर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, रेल्वे बोर्डाने मध्य आणि पश्चिम रेल्वे लोकल मधील महिलांच्या सर्व डब्यात सीसीटीव्ही आणि टॉकबॅक यंत्रणा बसवण्याची सूचना केली आहे.

महिला डब्यात टॉकबॅक यंत्रणा

रेल्वे मधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत मिळावी यासाठी लोकलच्या गार्डशी संवाद साधता यावा, या उद्देशाने टॉकबॅक यंत्रणा बसविण्यात येणार आहे. लोकलमध्ये ५९४ महिला डब्यात टॉकबॅक प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच येत्या ३० जून अखेर पर्यंत रेल्वे लोकल मधील सर्व महिला डब्यांत टॉकबॅक यंत्रणा सुरु होणार आहे. या यंत्रणेतील बटण दाबल्यानंतर गार्डशी संवाद साधून योग्य ती मदत महिला प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. यामुळे संकटकाळात महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबई आणि उपनगरातील ११७ रेल्वे स्थानकांवर पॅनिक बटण यंत्रणा बसवण्यात येणार आहे. प्लॅटफॉर्मच्या दोन्ही दिशांना एक-एक अशी दोन पॅनिक बटणे असणार आहे. विशेषतः महिलांच्या सुरक्षेसाठी महिलांच्या डब्यासमोरच पॅनिक बटण बसवण्यात येणार आहे.

संकटाच्या वेळी पुरुष आणि महिला प्रवाशांना पॅनिक बटण वापरण्यास परवानगी दिली जाणार आहे. पॅनिक बटण दाबताच अलार्म वाजणार असून, यासोबतच लाल दिवा पेटताच रेल्वे सुरक्षा दल नियंत्रण कक्ष सतर्क राहणार आहे. या सुविधामुळे प्लॅटफॉर्मवर आधारित सीसीटीव्ही यंत्रणा संकटात सापडलेल्या प्रवाशाला सहज टिपून तातडीने मदत करणार आहे, असे मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 नवी मुंबई मधील ५ अनधिकृत शाळांची यादी जाहीर