पत्रसंवादः वडिल-मुलीचा!
पत्र हे एकेकाळी संवादाचे सगळ्यात प्रभावी साधन, माध्यम होते. सासरवाशीण मुलगी जेव्हा घरच्यांना पत्र लिहायची त्यात मायेचा ओलावा तर असायचाच, शिवाय घरच्यांची काळजी, हरपलेले बालपण, त्याच्या आठवणी शिगोशिग भरलेल्या असायच्या. माहेरहून आई-वडिलांचे पत्र आल्यास तिच्या मनात आनंदाचा मोर थुईथुई नाचायचा. देशाच्या सीमेवर शत्रूंशी लढणाऱ्या जवानांसाठी पूर्वी पत्रे हा अनमोल ठेवा असायचा. सैनिकही आपल्या कुटुंबीयांना भावनेने ओथंबलेली पत्रे लिहायची. आता ते प्रमाण कमी नव्हे, दुर्मीळ झाले आहे. प्रेयसी-प्रियकरही एकमेकांना पत्र पाठवून मनातील भावना व्यक्त करायचे. एकूणात काय, तर पत्र ही आपल्या घरातील एक माणूसच झाली होती.
जागतिक साहित्यात तर खास पत्रांचे अनेक खंड निघालेले आहेत. प्रसिध्द रशियन कथाकार ऑस्कर वाईल्डच्या मृत्यूपश्चात हजारो पत्रे प्रकाशित झाली. या पत्रातून वाईल्डला तुच्छ लेखणाऱ्यांची छीः थू झाली. रसेल, रिल्केचे, कार्ल मार्क्स यांचाही पत्रव्यवहार होता. पंडित जवाहरलाल नेहरू हे देशाचे पंतप्रधान होते. पण त्यापलीकडे एक कवीमनाचे लेखक होते. इंदिरा गांधी मसूरीला शिक्षण घेत असताना पंडितजींनी इंदिरेस खूप पत्रे लिहिली. नंतर त्याचे पुस्तक निघाले, ‘लेटर्स फ्रॉम अ फादर टू हिज डॉटर' या नावाचे. या पत्रांतून नेहरू यांनी छोट्या इंदिरेस जगाचे गूज सांगण्याचा प्रयत्न केला. नेहरू, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आरएसएसचे संस्थापक केशव बळीराम हेगडेवार आदींच्या पत्रांचे संग्रह पुस्तकरुपात प्रसिध्द झाले आहेत. मराठीतील साहित्यिकांचा ‘विश्रब्ध शारदा'मध्ये पत्रव्यवहार पहायला मिळतो. साने गुरूजींनी सुधास लिहिलेली पत्रे कोण विसरणार? ग्रेस- जी.ए. कुलकर्णी, सुनिता देशपांडे-जी.ए. कुलकर्णी यांचा पत्रव्यवहार प्रसिध्द झालेला आहे. ही पत्रे पाहताना, वाचताना आपल्याला त्या त्या काळाचे तपशील, पत्रलेखकांचा मूड, मानसिक आंदोलने याचा प्रत्यय येतो.
एकूणात काय, तर पत्रे हा तसा खासगी मामला असला तरी, ‘सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्यांचे आयुष्य कधीही खासगी नसते,' असे महात्मा गांधी म्हणायचे ते अगदी खरे आहे. जर सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्यांची पत्रे आपण वाचली नाही तर त्या माणसाचे कार्यच आपल्याला कळणार नाही. आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात पत्र लेखन ही संकल्पनाच विस्मृतीत जात आहे की काय, असे वाटत असताना सदर लेखकाने व्हॉटसॲपवर मुलीला लिहिलेली ही काही काल्पनिक पत्रे वानगी दाखल.
----------------
चिरंजीव काव्या,
काय करतेस आता! मला वाटतं तू आता, मोबाइल बघत असशील. बरोबर आहे ना, कसे ओळखले मी! सुट्टी लागल्यापासून तुझे मोबाईलमध्ये डोके खुपसून राहणे वाढले आहे. मोबाईल बघणे वाईट नाही. पण तो किती वेळ पाहावा याला एक वेळमर्यादा, तुझ्याच भाषेत सांगायचे तर टाईमबॉण्ड असतो ना! सध्या सुट्टी लागल्याने सकाळी उठल्यावर एक वेळापत्रक तयार कर. मोबाईल किती वेळ पहायला. पुस्तक किती वेळ वाचायचे. दुपारचे किती वेळ झोपायचे, टीव्ही किती वेळ पहायचा. याचे वेळापत्रक तयार करून ठेवले की दिवस छान जातो. आज हे व्हॉटसॲपवर पहिले पत्र. कामातून वेळ मिळाल्यास असेच एखादे पत्र लिहित जाईन. तुला जमल्यास तुही लिही पत्र. आणि व्हॉटसॲपवर पाठव. चांगले काही पाहिलेले, वाचलेले शेअर कर!
-तुझा पप्पा....
------------------------
चिरंजीव काव्या,
दररोज १२ वाजता ऑफिसला पोहचणे गरजेचे असते. आज (१२.१५) वाजता मी अजून ट्रेनमध्ये आहे. साधारण दुपारचे एक वाजतील ऑफिसला पोहचायला. तू दररोज उशिरा उठत असल्याने मला लवकर घरातून बाहेर पडता येत नाही. तू सकाळी ८ वाजता उठलीस तर कमीत कमी आपण ९ वाजता आईकडे जाऊ शकतो. नंतर मी १० वाजता घर सोडल्यास १२ च्या आत ऑफिसला जाऊ शकतो. काव्या, खरे सांगू का, दररोज सकाळी लवकर उठणे आरोग्यास चांगले असते. सकाळची गार हवा, पक्ष्यांची चिमण कोलाहल वातावरणात असते. सकाळी सकाळी गाड्यांची वाहतूक नसल्याने प्रदूषण नसते. सकाळी आनंदमय वातावरण असते. तू सकाळी ६ वाजता उठल्यास निसर्गाची मजा अनुभवता येईल. पश्चिम दिशेला एक तांबूस फुटबॉल दिसेल, छे, तो सूर्य असतो! सकाळी सकाळी सूर्याचे दर्शन घेणे शुभ मानले जाते. सकाळी सकाळी अनेकजण सूर्य नारायणाची पूजा करतात. सूर्य आपल्याला ऊर्जा (एनर्जी) देतो. त्यामुळे त्याची पूजा करायची असते, असा सरळ साधा अर्थ त्यात दडलेला असतो. सूर्याचे दर्शन होत असल्याची जाणीव झाल्यावर पशुपक्षी जागे होतात. आपण तर माणसे आहोत. ज्यांना बोलता येत नाही ते निसर्गाचे चक्र, घड्याळ लक्षात ठेवतात आणि आपण माणूस असून हल्ली निसर्गाच्या विरुद्ध काम करतो.
पूर्वी एक कविता होती, तिच्या काही ओळी आठवतात, सकाळी उठूनि देवासी भजावे, गुरूशी वंदावे.... आई लहान असतानाची ही कविता आहे. तिला सांग, ती पूर्ण कविता तुला ऐकवून दाखवेल. तू म्हणशील, पप्पा किती बोअर करता. पण हेच सत्य आहे. जो सकाळी लवकर उठतो, त्याचा दिवस चांगला जातो. त्याला आरोग्याच्या समस्या उद्भवत नाहीत. आज पत्र जरा मोठं झालंय. पर्याय नव्हता. हे पत्र वाचून तू बोध घ्यावा. त्यानुसार कृती करावी, अशी माफक अपेक्षा बाळगतो.
- तुझा पप्पा
---------------
चिरंजीव काव्या,
हे पत्र वाचण्यासाठी तू झोपेतून उठली असशील अशी आशा बाळगतो. तू झोपेत असताना आज लवकर निघालो. सकाळची आन्हिके उरकून स्टेशनला आलो. पण कसले काय, आजही गाड्या १० मिनिटे उशिराच. मग काय स्लो गाडी पकडली. ती डुलत-डुलत चाललीय. ती पण तुझ्यासारखी आळशी वाटतेय. तिचीही झोप झाली नाही की काय रात्री? मध्य रेल्वे ही उशीरासाठी ओळखली जाते. गाडी कधी वेळेवर आली तर शपथ! असो! एव्हाना तुझा नाष्टा झाला असेल असे मी गृहीत धरतो.
आज घरात एकटीच आहेस. मग काय करणार, रात्री पेनच्या स्टँडला छान रंग लावलास तू. त्यावर वेलबुट्टीदार नक्षी काढ. छान दिसेल. तास दोन तास चित्र काढल्यावर ‘माझा घरातला एकटीचा एक दिवस' या विषयावर काहीतरी लिही. रात्री आल्यावर दाखव. व्याकरणाच्या काही चुका असतील तर त्या दुरुस्त करता येतील. अनेकदा मराठी भाषेत लिहिताना तू पूर्णविराम देत नाहीस वाक्य संपल्यावर. काना काढायचे विसरतेस. भाषेला शिस्त लागावी यासाठी व्याकरण असते. ती शिस्त बिघडवू नकोस. आज आत्या येणार आहे, असे आईने सांगितले सकाळी. किती वाजता येईल माहीत नाही. तिचा फोन आला तर तिला घरी बोलव आणि आईकडे जा. सोबत डबा घेऊन जा. घरी कोबीची भाजी केली आहे. ती खा किंवा त्याचे फ्रँकी कर. भाज्या दररोजच्या आहारात आवश्यक असतात. दररोज ऑम्लेट योग्य नाही. बाकी अजून काय लिहू? आणि हो, जर गॅस लावला तर योग्य वेळी बंद कर. घरातील नळ चालू ठेवू नको. बेल वाजली तर दुर्बिणीतून बघून दरवाजा उघड. आजच्या बातम्या इथेच संपल्या. आता भेटू उद्या येथेच.
जय हिंद, जय महाराष्ट्र.
-तुझा पप्पा ---------------------------
चिरंजीव काव्या,
काल रात्री गप्पा मारताना तू, ‘मन म्हणजे काय?' असा सवाल केला. मन नावाचा कोणताही अवयव शरीरात नसतो. पण मेंदूच्या चलन-वलनाला अनेकजण मन म्हणतात. अरबी भाषेत हातीमताईच्या लहान मुलांकरिता साहसकथा प्रसिध्द आहेत. त्या मराठीही आहेत. त्यातही मन हे निश्चयी, परोपकारी आणि लोभापासून मुक्त असावे असा संदेश दिला आहे. अशिक्षित असणाऱ्या खानदेशच्या बहिणाबाई चौधरी यांनी मनाचे वर्णन-
मन वढाय, वढाय, उभ्या पिकातलं ढोरं
किती हाकता हाकता, फिरी येई पिकावर.... असे केले आहे. मात्र मनावर सगळीकडे भरपूर काही लिहिले गेले आहे. ‘मन चंगा तो कटोरी में गंगा' असे संत रोहिदास यांनी म्हटले आहे.
फ्राइड, कार्ल यंुग, एरिक फ्रॉम अशा अनेकांनी मनाचा थांग घेण्याचा प्रयत्न केला आहे. पण माणसाच्या मनात वर्तमानात काय चाललेे असते, हे मोजणारे कोणतेही मापनयंत्र अद्यापही विकसित झालेले नाही, ‘एआय'चा जमाना आला तरी. माणसाने जास्त, अनावश्यक विचार केल्यावर त्याच्या मेंदूवरचा ताबा सुटतो आणि त्याला मग आपण मेंटल म्हणतो. ‘तोेरा मन दर्पन कहलाये,' असे साहिर लुधियानवी यांचे छान भजन आहे. त्यांनी मनाला आरशाची उपमा दिली आहे. मनावर टनाने लिहिता येईल. पण तू मनापासून अभ्यास करत रहा, यश आपल्याला हमखास मिळते, ही खूणगाठ मनात कायम बांध! पुढे कॉलेजला गेल्यावर मानसशास्त्र हा विषय अभ्यासक्रमात असू शकतो. मानसशास्त्र हा गणितासारखा स्कोअरींग विषय आहे. तूर्तास इतकेच.
-तुझा पप्पा
--------------------
चिरंजीव काव्या,
आज तुझा रिझल्ट लागला. चांगल्या मार्कांनी पास झाली, अभिनंदन! शालेय यश आणि जग हे वेगळे असते, हे तुला आज ना उद्या समजून घ्यावे लागणार आहे. शाळेत आपण चांगल्या मार्कांनी पास व्हावे यासाठी अभ्यास करतो. अभ्यासक्रमात असलेला अभ्यास मन लावून करतो. पण अनुक्रमाणिकेच्या खिडकीपल्याड एक जग आहे. ते जगही तुला समजून घ्यावे लागेल. आपला चांगूलपणा कधी कधी आपल्यालाच त्रासदायक होतो. त्यामुळे जगात, व्यवहारात वावरताना सजग राहिले पाहिजे. आपला कोण, परका कोण याची जाण यायला हवी. अनेकदा आपल्याशी चांगले बोलणारे, सलगी करू पाहणारे अनेकदा दृष्ट प्रवृतीचे असतात. (स्कूलमध्ये तुम्हाला गुड टच, बॅड टच शिकवले असेलच ना!) ते बाहेरून चांगले असल्याचे दाखवतात, पण आतून पार किडलेले असतात. अशांपासून आपण चार पावले दूरच राहिले पाहिजे. जगात एकीकडे सुष्ट माणसे आहेत तर दुसरीकडे दृष्ट प्रवृतीचे लोकही आहेत आणि त्यावरच जग चालले आहे. फवत आपल्याला माणसे ओळखता आली पाहिजे. आज इतकेच. बाकी नंतर कधीतरी.
-तुझा पप्पा
--------------------------
चिरंजीव काव्या,
आज आई बोलत होती गावी जाण्यासंदर्भात. तू गावी येणार ना यंदा. दोन-तीन वर्षांची असताना तुला गावी घेऊन गेलो होतो. तेव्हा तुझे जावळ काढले होते बहुदा! तू टकली झाली होती. गावी जाताच रस्त्यावरून दुडूदुडू पावले टाकत, स्वतःला सांभाळत पळत होती. आपण गुहागरच्या समुद्रकिनारी फिरायला गेलो होतो. तेव्हा समुद्र पाहून तुला जो काही आनंद झाला आणि तू एकटीच समुद्राच्या दिशेने पळाली. तुझी मम्मी, आत्या, आई, मोठी मम्मी सगळ्या तुला पकडायला धावत होत्या.
कोकण म्हणजे खरोखर स्वर्ग आहे. निसर्गाने या प्रांतावर भरभरून माया लावल्याचा प्रत्यय गावी आल्यावर येतो. अंगाखांद्यावर शेकडो बाळे सावरत उभा असलेला फणस. आंबे, काजू, रातांबे, करवंदे असा सगळा रानमेवा खाण्यासाठी खास उन्हाळी सुट्टीत कोकणात गेले पाहिजे. सकाळी मिळेल तो नाष्टा करायचा आणि वाडी-कोनाजवळच्या विहीरीवर अंघोळीला जायचे. जवळच असलेल्या साकवाकडे जायचे. उन्हाळ्यात पऱ्हाला पाणी नसते. पण मजा काही वेगळीच असते. खासकरून विहीरीचे गार गार पाणी अंगावर पडल्यावर ब्रम्हानंदी टाळी लागते. दुपारी जेवणात भात, लाल डाळ आहाहा, काय चव असते गावच्या जेवणात. खरे तर गावच्या पाण्याची चवच त्या जेवणात उतरत असते. आठवड्यातून एकदा मासे, मटण, चिकन खाणे सगळे काही मजेशीर असते. आपल्या गावात रानटी डुवकर येतात. काहीजण त्याची शिकार करतात. दिवसभर गावच्या घराजवळ माकडांचा हंगामा असतो. या घरावरून त्या घरावर पारंब्यांच्या मदतीने उड्या मारणे. आंबे, रातांबे खाण्याचे काम हे आदिमानव करत असतात.
कोकण हा निसर्गाचा सखा आहे. तसाच या प्रांतात विषारी साप (मण्यार, घोणस), विंचवांचा वावर असतो. त्यामुळे अनेकजण पाणंदीतून जाताना हातात काठी ठेवतात. रात्रीच्या वेळीही या प्राण्यांपासून ही काठी आपला बचाव करते. गावी गेल्यावर आम्ही घराजवळच्या अंगणातच झोपतो. पूर्वी विंचूकाट्याची भीती वाटायची. रात्रीचे कोकणही वेगळेच असते. कीर्र काळोखात झाडावर चमचमणारे काजवे पाहण्याची मजा काही औरच असते. हे काजवे पांढऱ्याशुभ्र कपड्यात गोळा करावे आणि त्याचा दिवा बनवावा असेही बालपणी वाटायचे. पण ते बालपणीचे विचार होते. दिलीप प्रभावळकर यांचा ‘दशावतार' हा सिनेमा तू पाहिला का? असेच दशावतारी खेळ रात्री अनेक वाड्यांमध्ये सुरू असतात. त्याला गावी खेळे किंवा खेले म्हणतात. यात पुरूष मंडळीच स्त्रीचे पात्र साकारत असतात. तळकोकणात हे दशावतारी खेळ करण्याची परंपरा आहे. ही कला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न कलिंगसारख्या कलावंतांनी केला. ही परंपरा नव्या पिढीने चालू ठेवली आहे. कोकणावर किती लिहावे. तू गावी आल्यावर छान छान चित्रं काढण्याचा मोह अनावर होईल. इतकी किमया कोकणाच्या निसर्गात आहे. आता जास्त काही लिहीत नाही. प्रत्येक व्यवतीने एकदा तरी कोकण पाहिलेच पाहिजे. राज्यातील विविध जिल्ह्यातून अनेक पर्यटक उन्हाळ्यात खास गाड्या करून कोकण पहायला येतात. आणि आपण दरवर्षी गावी जात नाही, हे आपले दुदैव नाही का? असो. पत्र वाढलंय आता थांबतोय.
-तुझा पप्पा
---------------------------
चिरंजीव काव्या,
आज ना उद्या कधी गावाला जातो असे सारखे वाटतंय. गावकडची ओढ काही वेगळीच असते. गावची लाल माती, जांभ्या दगडातील घरे, मंदिरे सगळे काही डोळ्यासमोर तरळून गेले. आपल्या गावी एक मंदिर आहे. त्याच्याजवळच एक नदी वाहते. शांत परिसर आहे सगळा. ध्यानधारणेसाठी सगळ्यात चांगले ठिकाण. गावी गेल्यावर मुख्य रस्त्यावर खोताचे खोपटेवजा हॉटेल आहे. त्यात छान मिसळ, बटाटेवडे, भजी मिळतात. कधी गावी गेल्यावर घरात नाष्ट्याची वाट न पाहता तुझ्या काकासोबत या हॉटेलमध्ये जातो. दाबून नाष्टा करतो. मग दुपारपर्यंत पोटोबा खूश असतो. गावी गेल्यावर कधी कधी माझ्या आत्याच्या गावी कापडगावला जातो. या गावाला कापडगाव हे नाव का पडले माहित नाही. पण या गावात पूर्वी जांभ्या दगडाची खाण होती. अनेक कारागीर जांभा दगड ताशीत असायचे. आता ही खाण खूप खोल झाली आहे. पावसाळ्यात त्यात भरपूर पाणी साचते. या कापडगावात आंबे-फणसाची झाडे कमी दिसतात. पण काजूच्या बागा अनेक ठिकाणी पहायला मिळतात. उन्हाळ्यात काजूच्या बियांना लगटून असलेले काजूचे गरगरीत फळ खाण्याची मजाही काही वेगळीच असते. या फळापासून काजूची दारू बनवली जाते. दिवसभर शेतात राबून संध्याकाळी घरी परतल्यावर पुरूष मंडळी श्रमपरिहार म्हणून थोडे थोडे मद्य रिचवतात आणि घरी केलेली नाचणीची भाकर आणि कोरड्यास (कालवण) यांच्याबरोबर मस्तपैकी दोन दोन भाकरी खातात. आपल्यासारख्या मुंबईतून आलेल्यांना ही एकच भाकरी भारी पडते. पण दिवसभर शेतात राबणाऱ्यासाठी ते पंचपववान असते.
कोकणात रातांबे सहज मिळतात. या रातांब्यापासून शीतपेय बनवले जाते. त्याला कोकम सरबत बोलतात. रातांबे कापून त्यातील गर काढून तो एका बरणीत काढायचा. त्यात साखर टाकून काही दिवस मुरवत ठेवायचे. नंतर त्याचे कोकम सरबत तयार होते. (गावी गेल्यावर बाबा बनवतात हे सरबत) ही प्रक्रिया करताना उरलेल्या साली उन्हात सुकायला ठेवतात. दोन तीन दिवसात आंबट जर्रर्र कोकम तयार होते. ते साधारण मच्छीचे (मासळी) कालवण बनवताना वापरतात. एखाद्या घरात ओली मासळी नसेल तरी सुकवलेली मासळी मिळते. ती अर्धा तास पाण्यात भिजवून नंतर त्यात कोकम टाकून कालवण बनवतात. मासळीला एक प्रकारचा हिमूस वास येतो. तो घालवण्यासाठी कोकमाचा वापर करतात. पावसाळ्यात कोकणात भीषण स्थिती असते. भाज्या सहज उपलब्ध होतील याची शाश्वती नसते. तेव्हा रानभाज्यांचा वापर केला जातो. कधी कधी उन्हाळ्यात साठवून ठेवलेली सुकी मच्छी उपयोगी पडते. कोकणातील मुख्य पीक म्हणजे भात, नाचणी. उन्हाळ्यात काजू, आंबा, फणस. बाकीचे महिने तसे तंगीचेच असतात. असे असतानाही कोकणातील शेतकऱ्यांनी कधी आत्महत्या केल्याचे आठवत नाही. कोकण समजून घेण्यासाठी हे दुसरे पत्र. हे पत्र वाचल्यानंतर तुझी गावी येण्याची इच्छा - प्रबळ होवो.
ताजा कलमः आपल्या गावी लोकवर्गणीतून बुद्ध विहार साकार करण्यात आले आहे. सम्राट अशोक याच्या कार्यकाळात जसे स्तूप होते. तसेच हे विहार बनवण्यात आले आहे. मे महिन्यात त्याचे उद्घाटन होणार आहे. आपले सगळे नातेवाईक येणार आहेत. खूप खूप मजा करू आपण. निसर्गवाचन कसे करायचे ते तिथे गेल्यावर शिकवेन. कोकणात गेल्यावर पुन्हा मुंबईला येण्याची इच्छा होत नाही. इतके कोकण आपल्याला भुरळ घालते. पत्र खूप वाढलंय. थांबतो आता! - तुझा पप्पा
- विवेक कांबळे