पुस्तक परिक्षण
ग्रंथाली प्रकाशित, राजीव श्रीखंडे लिखित ‘अभिजात साहित्याचे अक्षरविश्व' हे देखणे - आशयघन पुस्तक बाजारात आले आहे. या पुस्तकात इ.स. १५३२ ते २००१ या कालखंडातील विख्यात लेखकांची दखल घेण्यात आली आहे. देखणे पुस्तक अशासाठी की हेमंत जोशी यांनी सुंदर मुखपृष्ठ आणि मांडणी केली आहे. अथांग निळे आकाश आणि शुभ्र चांदण्या, चांदण्या जाळीत पडणारा अजब तरूण चित्रात दिसत आहे. आकाशातील चांदण्या पकडणे तसे सोपे नाही, त्याचप्रकारे जागतिक कीर्तीचे लेखक/कवी परिक्षणात आकृतीबंध करणे तसे सोपे नाही. हेच मुखपृष्ठ रचनेतून छानपणे दृश्यमान झाले आहे.
या पुस्तकात एकूण २२ साहित्यिकांचा आढावा घेण्यात आला आहे. प्रस्तावनेत जेष्ठ पत्रकार/लेखक कुमार केतकर लिहितात - इंग्रजांचे राज्य आपल्यावर नसते तर बहुसंख्य प्रज्ञावंतांची नावे आपणास माहित झाली नसती. हॉलिवुडचे बरेचसे चित्रपट लेखकांच्या पुस्तकांवर आधारित आहेत. राजीव श्रीखंडे हे एक अतिशय चोखंदळ, जिज्ञासू, बहुश्रुत व्यक्तीमत्व आहेत. पाश्चात्य लेखकांवर भाष्य करताना त्यांचे गुढ कायम ठेवून वाचकास चालवत ठेवण्याची श्रीखंडे यांची शैली आहे.
राजीव श्रीखंडे आपल्या मनोगतात लिहितात.. मला कळायला लागल्यापासून मी पुस्तकंच बघत आलो आहे. माझ्या व्यवसायामुळे मला खुप प्रवास करावा लागला. माझं जीवन अभिजात कलाकृतींच्या आस्वादामुळे समृद्ध झाले. साहित्याच्या अफाट विश्वातील काही चांदण्या वेचण्याचा मी प्रयत्न केला आहे. मला ते करताना आनंद मिळाला. निकोलो मॅकेव्हेली - हा पंधराव्या शतकात इटलीत होवून गेलेला तत्वज्ञ, मुत्सद्दी, प्रसिद्ध नेता होता. त्याच्या ‘द प्रिन्स' पुस्तकाने त्याकाळी प्रचलित असलेल्या ब-याच प्रघातांना छेद दिला. हे जागतिक वाड्मयातले एक विलक्षण पुस्तक आहे. डॅनियल डेफोची सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय कादंबरी म्हणजे रॉबिन्स क्रुसो. जागतिक वाड्मयीन इतिहासात मैलाचा दगड ठरलेली ही क्लासिक कादंबरी आहे. ज्योनाथन स्विपट हा आयर्लंडचा लेखक याची कथनशैली ओघवती आहे. त्याने मोजकेच लिखाण केले. ग्वालिव्हेर ट्रव्हर्स या पुस्तकाने त्यास अफाट लोकप्रियता मिळवून दिली. कॉन्दीद व्हॉल्टेअर हा फ्रेंच तत्वज्ञ, लेखक, इतिहासकार - थिओ लॉजीकल, कॅथॉलिक चर्च या त्याच्या कादंब-यांची बहुचर्चित साहित्यात गणना होते. हॅरिएट एलिझाबेथ ही प्रख्यात अमेरिकन लेखिका आहे. अंकल टॉम कॅबीन ही गुलामी नष्ट करण्याच्या चळवळीवर आधारित पुस्तक तिने लिहिले. यामुळे अमेरिकेत दंगली झाल्यानंतर यादवी युद्ध झाले होते. ही जगातली पहिली बेस्ट सेलर कादंबरी आहे. लुईस कॅरॉल हा जगप्रसिद्ध इंग्लीश लेखक त्याच्या भाषेत श्लेष आणि विडंबन आहे. अलाईस इन वंडरलॅन्ड ही त्याची लोकप्रिय कादंबरी, न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये लुईसचा पुतळा उभारण्यात आला आहे. सरकारने त्याच्या कांदब-यातील पात्रांवर आधारित पोस्टाची तिकीटे काढली होती.
रॉबर्ट लुईस स्टीव्हनसन या स्कॉटिश लेखकाने अवघ्या ४४ वर्षाच्या आयुष्यात कायम स्मरणात राहतील अशी पुस्तके जगाला दिली आहेत. किडनॅपड द ब्लॅक एरो, द स्ट्रेंज केस ऑफ डॉ.जेकल एन्ड मि. हैडे या कादंब-यामुळे त्याची गणना जगातील सर्वोत्तम लेखकात होते. हेन्री रायडर हेगार्ड या इंग्लंडच्या लेखकाने ५६ कांदंब-या, ३ कथासंग्रह, संकीर्ण १० पुस्तके आणि दोनशेच्यावर लेख अशी साहित्य संपदा निर्माण केली. अज्ञात जगाच्या कथा हा नवीन प्रकार त्याने तयार केला. ऑस्कर वाईल्ड या आयरीश लेखकाने लेडी वायंडरमेनेज फॅन हे लिहिलेले नाटक फारच गाजले. शारीरिक सौंदर्याशिवाय हे जीवन व्यर्थ अशी त्याची धारणा होती. त्याने काही कथासंग्रहही लिहले. त्याच्या कादंबरीवर अनेक चित्रपट निघाले आहेत. केन्युट हॅमसन या नॉर्वेजीयन लेखकाने हंगर नावाची लक्षवेधी कादंबरी लिहिली. इ.स.१९२० साली त्याला साहित्याचे ऑस्कर पुरस्कार लाभला होता. अंथनी होप या इंग्लीश लेखकाने ३२ कादंब-या लिहिल्या. द प्रिझनर ऑफ झेंडा, रूपर्ट ऑफ हेंटाझौ ह्या त्याच्या लक्षवेधी कादंब-या ठरल्या.
हे जगभरातील २२ लेखक/कवी/नाटककार वाचताना लेखनासाठी त्यांनी किती कष्ट घेतले याची जाणीव होते. त्यांच्या पुस्तकांमुळे मोर्चे निघतात, दंगली होतात, युध्दही पेटतात. त्यांच्या पुस्तकांवर बंदीही येते, जीव रक्षणासाठी देशही सोडावा लागतो. असे नानाविध अनुभव वाचनात येतात. ‘अभिजात साहित्याचे अक्षरविश्व' हे पुस्तक वाचनीय आहेच.विशेषता कवी/लेखक/नाटककार यांना दिशादर्शक आहे.,पुस्तक संग्रही ठेवण्यासारखे आहे.
अभिजात साहित्याचे अक्षरविश्व लेखक- राजीव श्रीखंडे
प्रकाशक- ग्रंथाली प्रकाशन पृष्ठे - २१४ मूल्य - ३५०/- रु.
- गज आनन म्हात्रे