मुशाफिरी

मासे : असे आणि तसे

    ज्यांना मासे खाणे आवडते, परवडते त्यांनी ते खुशाल खावेत. माशांचे सेवन ओमेगा - ३ फॅटी ॲसिड्‌स मिळवून देते. यामुळे हृदयविकाराची भिती, अल्झायमरची शक्यता कमी होते. केस आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारते व झोपही शांत लागते असे विविध आरोग्यविषयक अहवाल सांगतात. आपल्या अवतीभवती जे सहजपणे उपलब्ध असते ते आपल्या आहारात स्वाभाविकपणे येते. कुणाची कुणावर सक्ती नाही; नसावी..आणि कुणाच्या जेवणा-खाण्यासारख्या व्यक्तीगत-खासगी विषयावर वाद हवाय कशाला?

   विख्यात इस्पितळांची शृंखला असलेल्या उद्योगसमुहाच्या एका इस्पितळातील डॉक्टरची मुलाखत मी युट्युब करिता घेत होतो. इतर अनेक प्रश्नांप्रमाणेच मी त्याला एक प्रश्न विचारला की करोनासाठी आवश्यक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घेतला जाणारा आहार आणि शाकाहार, मांसाहार यांचा काही सहसंबंध आहे का, म्हणून! त्याने मोठ्या डिप्लोमॅटिक पध्दतीने उत्तर दिले की, ‘शाकाहार हा चांगला आहेच; पण आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहारात विविध गोष्टींचा समावेश हवा, आहार समतोल व चौफेर हवा. यात सगळे व प्रमाणात हवे.'

   २००२ च्या सुमारास कर्जतजवळ  जीप उलटून झालेल्या अपघातात जायबंदी झाल्याने माझा उजवा हात मनगटाजवळ फ्रॅक्चर झाला होता; तर माझ्या पत्नीच्या कॉलरबोनला इजा झाली होती. त्यावेळी आमच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी  सांगितले की ‘तुम्हाला पाया सूप, चिकन सूप घ्यावे लागेल. हाडांची दुखापत भरुन काढण्यासाठी, हाडे सांधण्यासाठी मांसाहारातून मिळणाऱ्या वाढीव प्रोटीन्सचा लाभ घ्यावा लागेल म्हणून!'

   कुणी काय खावे, काय प्यावे, काय परिधान करावे, कुठे काम करावे, कोणत्या राज्यात रहावे हे सारे प्रश्न पूर्णतः व्यवितगत स्वरुपाचे आहेत. खाण्याच्या बाबतीत म्हणाल तर आपल्या अवतीभवती जे सहजपणे उपलब्ध असते ते आपल्या आहारात स्वाभाविकपणे येते. कोकणाला प्रचंड लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. गोव्याचेही तेच. चांगल्या पावसाचेही वरदान या भागाला आहे. त्यामुळे त्या संपूर्ण परिसरात भात, मीठ आणि मासे याचे प्रमाण विपुल. म्हणून त्या परिसरातील जनसमुहांच्या आहारात मासे, भात असणे हे पूर्णतः नैसर्गिक व स्वाभाविक आहे. बकऱ्या, काेंबड्या वाढीला जेथे जास्त पोषक वातावरण तेथे त्या प्राण्यांच्या मांसाचे प्रमाण तेथील जनसमुहांच्या आहारात जास्त असल्याचे आढळून येईल. काश्मिरमध्ये फिरताना मी पाहिले की आपण ज्या सहजतेने चणे, शेंगदाणे खातो, तितवया सहजतेने तेथील जनसमुह आक्रोड, बदाम, किसमिस खात असतात. कारण तेथे या प्रकारचा सुकामेवा आधिक्याने व निसर्गतःच उपलब्ध होतो. देशविदेशात गणेशमू्‌र्तींच्या सुबकतेसाठी सुप्रसिध्द असलेले रायगड जिल्ह्यातील पेण हे माझे आजोळ. रायगड जिल्ह्याचे पेण, पनवेल, उरण, अलिबाग, रोहा, म्हसळा, श्रीवर्धन, मुरुड, सुधागड, महाड, पोलादपूर हे बहुतांश तालुके तेथील समुद्र, खाड्या व नद्या, तलावांमध्ये मिळणाऱ्या माशांसाठी नावाजलेले आहेत. पेण तालुका हा तर मत्स्यवैभवाने समृध्दच आहे. त्यातही तेथील जिताडा या माशाच्या चवीसाठी अनेक जातिवंत मांसाहारी खवय्ये जीव टाकताना दिसून येतील. या जिताड्याला गोव्यात चणक किंवा चणोक तर इतर ठिकाणी खजुरी मासा असेही नाव आहे. पेणमधील खेड्यांमधून घराच्या आवारातच खोदलेल्या किंवा शेतातील तलावात जिताडा माशांची पिल्ले मोठी होण्यासाठी सोडून ठेवतात. कुणी मांसाहारी पाहुणे अचानक आले तर लगेच जाळी टाकून धरत त्यांचे कालवण बनवले जाते. मूळचे अलिबागचे विख्यात साहित्यिक प्राध्यापक कै. शंकर सखाराम (ज्यांचे 'एस ई झेड' हे पुस्तक तीन विद्यापीठांतून अभ्यासासाठी ठेवण्यात आले आहे, तर त्यांच्या साहित्यावर काहींनी पीएच डीही केली आहे.) यांच्या पुस्तकांतून या जिताड्याचे मोठे टेसदार वर्णन आढळते. तीस चाळीस वर्षांपूर्वी जिताड्याचे कालवण, तळलेल्या तुकड्या व तांदळाच्या मऊसुत भाकरी या भेटीदाखल दिल्यास वरचा साहेब खुश होऊन भेटकर्त्याला नोकरीत कायम करीत असे किंवा त्याचे अडलेनडले काम पटकन करुन टाकत असे असेही वर्णन या लेखनात आढळेल.. अशी या जिताड्याची महती आहे. आजही हे जिताडे मासे घेण्यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवलीतून मत्स्यप्रेमी खवय्ये आपल्या गाड्या दामटीत पार पेण, अलिबागपर्यंत जात असतात ते काही उगाच नव्हे!

   माझ्या आईमुळे मला जिताडे काय किंवा अन्य प्रकारचे मासे काय, यांची चव आणि चटक पार जन्मापासूनच आहे. चांगला मत्स्याहार, चांगला मांसाहार कुठे मिळतो याच्या शोधात मी अनेक ठिकाणी मनसोक्त भटकलो आहे. गेली सुमारे अठ्ठावीस वर्षे पत्रकार.. त्यातही चौदा वर्षे वर्तमानपत्र मालक - संपादक म्हणून वावरताना मुंबईच्या ताजमहाल, सहारा, ताज प्रेसिडेंट, ताज पॅलेस, रिनेसान्स, जे. डब्ल्यु. मॅरियटसह विविध पंचतारांकित हॉटेलांतील एकाहुन एक मांसाहारी डिशेसचा आस्वाद पत्रकार परिषदांनंतरच्या भोजनानिमित्त घेतला आहे. अनेकदा ते फ्रोझन सी-फूड असते. मात्र समुद्रातून, खाडीतून, नदीतून, घराच्या आवारातील तलावातून, पावसाळ्यात शेतात साठलेल्या पाण्यातून पकडून लगेच रांधलेल्या माशांच्या कालवणासमोर, तळलेल्या तुकड्यांसमोर या साऱ्या महागड्या हॉटेलांतील मांसाहारी डिशेसची (फ्रोझन सी-फूडची!) चव फिकीच हे मी अनुभवांती सांगू शकतो. जम्मू, काश्मिर, गुजरात, गोवा, दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाना, आंध्र प्रदेश अशा विविध प्रांतांमधलाही मत्स्याहार मी चाखून पाहिला. प्रत्येक प्रांताची चव वेगळी व खासियतही वेगळी! ठाणे, मुंबई, रायगड, पालघर या परिसरात आढळणाऱ्या भल्यामोठ्या चिंबोऱ्या व त्यांच्या डिशेसची चव मला अन्यत्र आढळून आली नाही. वाशी गावालगतच तेथील रहिवासी श्रीमती गुणाबाई सुतार यांची चिंबोऱ्यांची शेती आहे व तेथील चिंबोऱ्या विविध तारांकित हॅाटेलांना पुरवल्या जातात. एकेक चिंबोरी एक किलो, बाराशे ग्रॅम, दिड किलो वजनाची असल्याचेही मी पाहिले आहे. विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांनी घेतलेल्या गुणाबाईंच्या मुलाखती यु ट्युब वरही पाहण्यासाठी जिज्ञासूंकरिता उपलब्ध आहेत. मांसावर जेवढे आवरण टणक तेवढी त्यातील मांसाची लज्जत भारी हे तत्व चिंबोरी, खेकडे, शिंपल्या यांच्या बाबतीत लागू पडते. नवी मुंबईत सीवूड्‌स-दारावे स्टेशनबाहेरील फुटपाथवर तेथील रहिवासी मंजाबाई म्हात्रे यांची चिंबोऱ्या, बांगडे, कोळंबी व अन्य प्रकारचे मासे, चिकन, मटण, भाकरी देणारी गाडी आहे. तेथे आपापल्या वातानुकुलित गाड्यांमधून येत शेजारपाजारच्या विविध टॉवर्स, बंगले, पेंट हाऊस, अपार्टमेंट्‌स, सोसायट्यांमधील  अनेक जातिवंत खवय्ये या पदार्थांवर ताव मारताना व घरी भरभरुन पार्सले नेताना मी पाहिले आहे. तेथील फुटपाथवर पेपर अंथरुन बैठक मारत मीही अनेकदा मनसोक्त खादाडी केली आहे. नवी मुंबईत अनेकदा जोशी, कुलकर्णी, देशपांडे, सामंत अशा आडनावांची माझी मित्र मंडळीही ‘इथे जवळपास आगरी पध्दतीचे मटण बनवून कुठे मिळते' याची विचारणा मला फोनद्वारे करीत असतात. नवी मुंबईच्या गावोगावी असे मटण बनवून देणारी कुटुंबे आहेत; शिवाय त्यासोबत आदरातिथ्याच्या वागणूकीचाही लाभ होईल. आता तर दरवर्षी डिसेंबर, जानेवारी महिन्यांत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांत तुफान गर्दी होणारे ‘आगरी कोळी महोत्सव' भरवले जातात, तिथेही या अफलातून चवीचा आस्वाद घेता येईल.

   खाऱ्या पाण्यातील मासे, गोड्या पाण्यातील मासे असेही काही पोटभेद आहेत. शिवाय दर बारा मैलांवर जशी भाषा बदलते तसे त्या त्या भागात-गावांत माशांची नावेही बदलतात असेही अनुभवाला येते. खरे तर ‘आम से हम को मतलब..गुठलीसे क्या लेना..' या संतुष्ट वृत्तीचे अनेक खवय्ये असतात. त्यांना त्या खाऱ्या/गोड्या पाण्याशी, नावांशी काहीच देणे-घेणे नसते. दोन महिन्यांपूर्वी मला पुणे जिल्ह्याच्या बारामती, इंदापूर तसेच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, अकलूज, पंढरपूर भागात फिरण्याचा योग आला. त्या परिसरात भिगवणीचे मासे, जिलापी (किंवा चिलापी) मासे, उजनी धरणातील मासे, निरा-भीमा नदीतील मासे असे शब्दप्रयोग वारंवार माझ्या कानावर पडले. इंदापूरहुन सोलापूर जिल्ह्यात प्रवेशताना निरा नदी ओलांडल्यावर माळशिरस तालुक्यात कळंबोली नावाच्या गावाजवळ विलास भोई यांचे हॉटेल आहे. तेथे हे गोड्या पाण्यातील मासे खाण्याचा योग आला. पापलेट, बांगडे, सुरमई, रावस, मुशी, माकोल, कटला, फंटूश, वाम, कोळंबी, जिताडा, हलवा, मांदेली, करली, बोंबिल, घोल, राणी, टोळ, पाला, शेवंड, निवट्या, रुई, कुपा, हेकरु, पोपट, पाकट असले काही नाही;  तर जिलापी (किंवा चिलापी) याच नावांतर्गत मला तिथे मासे खायला मिळाले. त्या परिसरात कदाचित या माशांना आणखी कोणत्या वेगळ्या स्थानिक नावांनीही ओळखले जात असेल.  भरपूर रस्सा, भरपूर तुकड्या, अफलातून चव, सोबतीला ज्वारी आणि बाजरीची भाकरी आणि भात यांचा आस्वाद घेताना तबियत खुश झाली. तेथील पाटीवर लिहिलेला कडक मच्छी फ्राय, अमर्यादित रस्सा, मसाला मच्छी, अळणी मच्छी हा मजकूर वाचून मजा आली शिवाय त्या डिशेसची किंमतही आटोपशीर वाटली.

   या साऱ्याची लज्जत घेण्यासाठी फिरले पाहिजे.. आपला समाज, आपला परिसर, आपला तालुका-जिल्हा-राज्य सोडून इतरत्रही हे केवळ मासे किंवा मांसाहारच नव्हे..तर अन्यही बरेच काही चांगलेचुंगले उपलब्ध असते, घडत असते. आपल्यापुरतेच न पाहता त्याचाही मनमोकळेपणाने स्विकार केला पाहिजे. जे खळाळते, वाहते ते पाणी..आणि पाण्याला जीवन म्हणतात. जे एकाच जागी साचून राहते ते डबके. आपण जीवनाच्या बाजूचे असले पाहिजे.

- (मुशाफिरी, २० जानेवारी २०२३) - राजेंद्र घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई.

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुशाफिरी : हळदी कुंकू, वाण आणि बरेच काही