मुशाफिरी : हळदी कुंकू, वाण आणि बरेच काही

हळदी कुंकू, वाण आणि बरेच काही

   मकर संक्रांतींनंतर रथसप्तमी पर्यंत आपल्याकडे हळदी कुंकू कार्यक्रम सुरु असल्याचे सांगण्यात येते. हा विषय महिलांचा असला तरी विवाहिता, सौभाग्यवती यांनी कुंकू लावावे..त्यांनाच ‘सवाष्ण' म्हणावे असा जर प्रकार असेल तर तेथे पुरूषांचाही विषय अप्रत्यक्षपणे येतोच. हल्ली विविध मंडळे, राजकीय व्यक्ती हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करताना  पति गमावलेल्या महिलांनाही बोलावून वाण देतात. कार्यालयात, लोकलमधील हळदी कुंकू करतानाही फारसा भेदभाव नसतो; मात्र कौटुंबिक किंवा वसाहत स्तरावरील कार्यक्रमात डावे-उजवेपणा सहज दिसून येतो. हे कधी थांबेल?

   हळदी कुंकू हा प्रामुख्याने हिंदू धर्मीय महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम असल्याचे जरी बोलले जात असले तरीही अलिकडे जिकडे तिकडे संस्कृती संकर बऱ्यापैकी होत गेल्यामुळे बऱ्याच मुस्लिम, बौध्द, जैन, ख्रिस्ती, शीख महिलाही आमंत्रण आल्यास हळदी कुंकवाला जातात व राजकारण्यांनी तर याला रथसप्तमीचाही अडसर ठेवलेला नसल्याने रथसप्तमी नंतरही हळदी कुंकू कार्यक्रम सुरुच असतात. त्यातही २०२०-२१-२२ पासून अनेक ठिकाणच्या महानगरपालिका निवडणुका रखडल्यामुळे बिगरहिंदु महत्वाकांक्षी राजकीय स्त्री-पुरुष एरवीही हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करुन आपला लोकसंग्रह वाढवायचा प्रयत्न करीत असल्याचेही दिसून येईल.

   हळदी आणि कुंकू हे तसे पाहिले तर हे पावडर प्रकारातील दोन भौतिक पदार्थ आहेत. हळदीचा वापर प्रामुख्याने स्वयंपाकघराच्या सोबतीेने देवघरात व औषधी गुणधर्म असल्याने उपचारांसाठीही होतो; तर कुंकू हे प्रामुख्याने विविध धर्मकार्यांत, सांस्कृतिक समारंभात आणि प्रामुख्याने विवाहितांचे एक सौभाग्य लक्षण म्हणून वापरात आणले जाते. अनेक ठिकाणी कुमारिका तसेच काही संप्रदायांतील श्रीसदस्य पुरुषही कुंकू आपल्या कपाळाला लावून घेत असल्याचे दिसेल. अनेक विवाहांच्या निमंत्रणपत्रिकांना हळदी-कुंकवाचे बोट लावून मगच त्या वितरीत करण्याची प्रथा पाळणारे लोक आहेत. तर कोणत्याही शुभकार्याला निघताना किंवा विजयश्री मिळवून आल्यानंतर स्त्री-पुरुष भेदाभेद न करता ‘कुंकवाचा टिळा' लावण्याची प्रथा आहे. शिवसेनेचे ठाण्यामधील दिवंगत नेते, माजी आमदार, माजी महापौर (तीन वेळा) स्व. अनंत तरे यांच्या कपाळावर कायम कुंकवाची बोटे रेखाटलेली असत. तर शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे कपाळावर कुंकवाचा आडवा पट्टा रेखलेले छायाचित्र अनेकांसाठी स्फुर्तिदायी ठरलेले आहे. सांगायचे तात्पर्य हे हळदी कुंकू हे दोन केवळ भौतिक पदार्थ म्हणून न राहता त्यांना सांस्कृतिक प्रतिकांचे स्थान कित्येक वर्षांपासून प्राप्त झालेले आहे. एखाद्या समारंभाला ‘हळदी कुंकू' असे पदार्थवाचक नाव मिळण्याचा हा अनोखा प्रकार आहे. दिवाळीच्या खाद्याला ‘दिवाळी फराळ' म्हणतात. चकल्या, लाडू करंजी नाही. देवाच्या दारी गेल्यावर लोक ‘प्रसाद' घेऊन येतात. त्याला नारळ, गुळ-खोबरे, बत्ताशे असे म्हणत नाहीत. भरपेट सुग्रास जेवणाला ‘मेजवानी' म्हणतात. बिर्यानी, पुलाव, हलवा, जिलेबी, बासुंदी अशा कोणत्याही सुट्ट्या पदार्थांचे नाव तिला नसते. मात्र ‘हळदी कुंकवाची' बातच न्यारी आहे.

   तर ते असो. हळदी कुंकू सोहळा कुणी आयोजित करावा, कुठे करावा, कुणाकुणाला त्यासाठी बोलवावे यासाठी कोणतीही विशिष्ट आचार संहिता नाही. त्या वेळी वाटल्या जाणाऱ्या वाणात काय काय द्यावे यातही तात्विक मतभेद आहेत. कुणी म्हणते की फण्या, साबण पात्र, प्लास्टीकच्या अन्य वस्तू या असात्विक आहेत.. म्हणून त्या वाटण्याऐवजी तुळशीची रोपे, कापूर, अगरबत्ती, कुंकू, अशा ‘सात्विक' वस्तूच द्याव्यात. तर कुणी म्हणते की सर्वांनीच या वस्तू वाटल्या तर घरात या वस्तू खूप साचतील, खराब होतील. म्हणून इतरही गरजेच्या वस्तू द्याव्यात. अनेकांनी ‘अशा वेळी वस्तू देण्याऐवजी गरीब, गरजू महिलांना रोख रवकम द्यावी, धान्य द्यावे ज्याचा त्या महिलांना  नित्याच्या आवश्यकतांची पूर्ती करण्यासाठी त्यांच्या अग्रक्रमानुसार वापर करता येईल' असेही विचार मांडले आहेत. या सगळ्यात महत्वाचे म्हणजे हळदी कुंकू कार्यक्रमाला कुणाकुणाला बोलावले जाते ते. या विषयावर मी गेली वीस वर्षांहुन अधिक काळ सातत्याने लिखाण करीत आहे, अनेक महिलांशी बोलून त्यांचे विचार जाणून घेत आहे, अशा कार्यक्रमांचे वार्तांकन करीत आहे. हे करताना अनेक गोष्टी समजल्या. अनेक गोष्टींबद्दल लिहिल्याने सकारात्मक बदल घडून आलेले दिसले. एकुणातच अशा कार्यक्रमांना पति निधन पावलेल्या महिलांना बोलावण्यावरुन मतभेद असलेले मी पाहिले. अनेक कर्मठ, सनातनी, परंपरावादी, कर्मकांडी लोक ‘हळदी कुंकू सोहळे हे  विवाहिता-सवाष्णी-सौभाग्यवती यांच्यासाठीच असतात', या मताचे निघाले. ‘एकदा का एखाद्या बाईचा नवरा देवाघरी गेला की तिच्यासाठी नटणे, थटणे, साजशृंगार करणे हे सारे संपते. तिने मागे मागेच रहावे, सांस्कृतिक कार्यक्रमांपासून फारकत घ्यावी, विवाहित स्त्रियांमध्ये लुडबुड करु नये' असे सांगणारे अनेक नमुने निघाले. या विषयावर माझे पत्रलेखन लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, लोकमत, नवशक्ती अशा वर्तमानपत्रांतून २००२ च्या सुमारास प्रसिध्द होऊन त्या पत्रांना नामांकित संस्थांचे पत्रलेखन स्पर्धांमधील राज्यस्तरीय पहिल्या क्रमांकाची पारितोषिके/पुरस्कारही लाभले. या विषयावरील लेखही लोकांच्या पसंतीस उतरले. मात्र काही जुनाट विचारसरणीचे लोक याला विरोध करणारे निघालेच. आता रुळ बदलताना थोडा खडखडाट तर होणारच की! इथे तर शतकानुशतकाच्या जुनाट प्रथांना छेद देण्याचा विषय होता. यावरुन कल्पना येते की संत तुकोबाराय,  संत एकनाथ, स्त्री शिक्षणासाठी झटणारे महात्मा जोतिराव फुले-सावित्रीबाई तसेच विविध कालबाह्य गोष्टींविरोधात प्रबोधन करणारे महर्षि धोंडो केशव कर्वे, शतपत्रेकार लोकहितवादी गोपाळ हरि देशमुख, प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांना वेगळे विचार मांडताना किती त्रास झाला असेल? जिवंतपणीच यातील अनेकांच्या  प्रेतयात्रा काढायला कर्मठांनी कमी केले नव्हते.

   अलिकडे मी पाहिले आहे की काही आयोजक महिला मंडळे विधवा महिलांनाही हळदी कुंकू कार्यक्रमांना बोलावून त्यांना विवाहितांच्या सोबतीने मानाने वाण देतात. यातही एक गोम आहे. महापालिका, विविध आस्थापनांची कार्यालये, अन्य खासगी कंपन्यांची कार्यालये अशा ठिकाणी शिक्षित, आधुनिक विचारांच्या महिलांचा मुक्त वावर असल्याने त्या आपल्यात विधवा महिला सहज सामावून घेतात. त्यांना सोबतीने वागवतात; मात्र अनेक ठिकाणच्या वसाहती, को-ऑप.हौसिंग सोसायट्या, अपार्टमेण्टस अशा ठिकाणच्या कार्यक्रमांचे आमंत्रण घेऊन काही आयोजक महिला जातात; पण समोरच्या महिलेने ‘मी विधवा आहे' असे सांगितल्यावर तिला तरीही येण्याचा आग्रह करण्याचे सोडून ‘ठिक आहे', म्हणत काढता पाय घेतात..असाही अनुभव काही महिला सांगतात. याबद्दल मी अनेक महिलांना बोलते करुन त्यांचे मनोगत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. माझी दीर्घकाळची मैत्रीण असलेल्या व काही वर्षांपूर्वी पति निधन पावलेल्या महिलेने सांगितले की, ‘एकवेळ बाहेरचे लोक समजून घेतात; पण आपल्याच नात्यातल्या विवाहित बायकांच्या कपाळावर आमच्यासारख्या महिलांना अशा कार्यक्रमात बघून कपाळावर आठ्या उमटतात. त्या मग एकमेकींना नजरेने खुणावून ही बघ कशी इथे आली असे सुचवताना मी पाहते. काही ठिकाणी  मी सरळ घरातूनच साजशृंगार करुन जाते. मंगळसू्‌त्र, हिरव्या बांगड्या, केसात गजरे माळून सरळ कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचते. तेथील मोकळ्या मनाच्या महिला मला मानाने हळदी कुंकवाचे वाण देतात. विधवांप्रमाणेच संतती नसणाऱ्या महिलांनाही काही जुनाट विचारांच्या बायका पक्षपाती वागणूक देतात. बारश्याला अशा महिला गेल्या तर त्यांच्या हाती बाळ दिले जात नाही, असेही पहायला मिळते.'

   दुसरी एक मैत्रीण.. तिचा विवाह वयाच्या १९ व्या वर्षी झाला व तिच्या वयाच्या २३ व्या वर्षी तिच्या नवऱ्याने या जगाचा निरोप घेतला. पण तिची सासू समंजस असल्याने तिने या सुनेला मंगळसूत्र, हिरव्या बांगड्या घालणे सुरु ठेवण्यासआडकाठी केली नाही. त्यामुळे इतर रिकामटेकड्या महिलांना फारसे विरोधात जाता आले नाही. ही मैत्रीण आमंत्रण आल्यास विविध पूजा, बारशी, लग्नसमारंभ, हळदी कुंकू कार्यक्रमांना फुले,गजरे माळून जात असे; मात्र कुणीही तिला अवमानित केले नाही. तिला हळदी कुंंकवाचे वाण देत सन्मानित करत असत. आणखी एका विधवा महिलेचा अनुभव सांगतो. तिला हळदी कुंकू कार्यक्रमास बोलावल्यास  ती स्वतःहूनच जाणे टाळत असे. याचे कारण मी विचारले असता, ‘इतर बायका पायात जोडव्या, हातात हिरव्या बांगड्या, कपाळाला ठसठशीत कुंकू, गळ्यात काळ्या मण्यांचे मंगळसूत्र, केसात गजरे, फुले माळलेली अशा रीतीने वावरत असताना मी अशा अवस्थेत तिथे जाणे ठिक नाही; माझा नवरा गेला..माझ्यासाठी नटणे, थटणे संपले आहे...' असे तिने उत्तर दिले. एकदा माझ्या समोरच एका समारंभात एक महिला खुर्चीत बसलेल्या महिलांना गजरे वाटत होती.  एकेक करत ती एका विधवा महिलेजवळ आली व तिलाही गजरा दिला. त्यावर ती गजरा देणारीवर खेकसली, ‘तुला अक्कल आहे का? मला गजरा देण्याची हिंमत तू कशी केलीस?' असा गोंधळ तिने भर समारंभात घातला.

   एकूण काय, की प्रबोधनाच्या कितीही गोष्टी केल्या तरी ज्यांच्यावर अन्याय होतोय, ज्यांना अवमानित, उपेक्षित, दुर्लक्षित स्वरुपाची वागणूक मिळते त्या महिलांनीच स्वतः कच खाऊन ‘आहे तेच ठिक आहे' अशी मानसिकता पक्की केल्यास पालथ्या घड्यावर पाणीच पडणार! पति निधनानंतर त्याच दुःखाच्या काळात त्या स्त्रीचे मंगळसूत्र, जोडव्या, हिरव्या बांगड्या काढून घेणे, तिच्या कपाळीचे कुंकू पुसणे, तिला अभागी समजणे, तिला विविध धार्मिक समारंभात अघोषित बंदी घालणे, मुल न होणाऱ्या विवाहितेला तिरस्कृत वागणूक देणे हे सर्व टाळावे असा मुळापासूनचा बदल व्हायला हवा. अनेक बंडखोर, सुशिक्षित, सुधारकी वृत्तीच्या महिलांनी बंधने झुगारली..काही अंशी त्यांना समाजातील प्रबोधनवादी, विवेकी, सुधारकी वृत्तीच्या समुहांची साथही मिळत गेली. बदल होतोय; मात्र त्याची गति फार संथ आहे. अद्यापही मोठ्या प्रमाणावरील महिला या प्रवाहपतित पध्दतीनेच वागत असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे  वर्षातून एकदा होणारे हळदी कुंकू, तिथे दिले जाणारे वाण, तेथे विधवांना मिळणारी वागणूक या तर खूप पुढच्या गोष्टी झाल्या.

-  राजेंद्र घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर,

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुशाफिरी : नावे, गावे..काही आम काही खास