पंचनामा

आपल्याकडे खास करून हिंदू धर्मात तुळशी विवाहानंतर लग्नाचा सिझन सुरू होतो. त्याप्रमाणे तो सुरू झाला आहे. अपवाद फक्त पौष महिना आहे. या महिन्यात लग्न तर कोठे जास्तच नाही, तर मुलगी पाहणे किंवा स्थळ पाहणेही वर्ज्य मानले जाते. आख्यायिका आहे की हा कालावधी संक्रांतीचा असल्याने संसारात संक्रांत येते व विवाह विच्छेदनाची दाट शक्यता निर्माण होते.

आजची तरुण पिढी शिकली सवरलेली आहे, बौद्धिक व मानसिकदृष्ट्या पुढारलेली आहे असे सगळेजण समजतात, पण हे सर्व सत्य नाही. आजची पिढी शिकलेली (पुस्तके वाचलेली) नक्कीच आहे, पण बौद्धिकदृष्ट्या परिपक्व नक्कीच झालेली नाही हे वारंवार सिद्ध होऊ लागले आहे.

हिंदू धर्मात विवाह सोहळ्यात विविध प्रकारचे विधी केले जातात. त्या प्रत्येकाला विशिष्ट अर्थ आहे. विवाह विधी होताना नवरा नवरीमध्ये अंतरपाट ठेवून भटजी विविध प्रकारांनी नवरा-नवरीला भावी आयुष्यात जपायच्या आणाभाका देत असतो. त्याला मंगलाष्टका म्हणतात. मुस्लीममध्ये आणाभाका नसल्या तरी विशिष्ट प्रकारचा करार केला जातो. त्यात एकमेकांना भावी आयुष्यात एकमेकांची काळजी घेण्याचा व एकमेकांवर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला जातो. ख्रिश्चन धर्मात विविध धर्मातही नवदाम्पत्याला असाच सल्ला दिला जातो, तोही नवरा-नवरीच्या नात्यासमोर तसेच चर्चमध्ये देव धर्मासह वरिष्ठ लोकांमार्फत आशीर्वादही मिळवून घेतात.

दरवर्षी लाखो-करोडो विवाह होतात, पण त्यापैकी कायमस्वरूपी टिकणारे विवाह फार कमी होताना दिसतात त्याची अनेक कारणे आहेत. पण त्यातूनही मुख्य दोन कारणे आहेत. ती दोन कारणे जपली तर किंवा समजून घेतली तर विवाह विच्छेदाचे प्रमाण फार कमी होऊ शकते. पण आजची तथाकथित शिकलेली मंडळी स्वतःला एवढे शहाणे समजून राहिले आहेत की त्यांना जगण्याचा व संसार करण्याचा अर्थच समजेनासा झाला आहे व एवढ्या-तेवढ्या कारणावरून ते एकमेकांपासून दूर होऊ पाहत आहेत.

 जेव्हापासून महिलांना विशेष अधिकार मिळाले आहेत, त्या अधिकारांचा गैरफायदा घेणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्या स्वार्थासाठी व मतलबासाठी विवाह करतात आणि लगेच़  काही दिवसातच विविध कारणे सांगून कोर्टाची पायरी चढून घटस्फोटासाठी आणि भावी आयुष्यात जगण्यासाठी पोटगीच्या मागणीचा जोर धरतात व ती मिळवूनही घेतात. तेव्हा नवरा नावाच्या व्यक्तिची व त्याच्या कुंटुंबाची काय दशा होते, ते कुंटुंबालाच जाणावे. ज्या अगाध हेच जोडपे जेव्हा प्रेमात पडले होते तेव्हा "जन्म जन्म का साथ है तुम्हारा हमारा असे कसले वादे करून विवाह बंधनात अडकले असतात. पण सुरुवातीचे काही दिवस उलटताच एकमेकांची खरी ओळख दिसताच ते एकमेकांपासून दूर जाण्याच्या मार्गाला लागतात. त्यात भर घालतात ती घरची माणसे - मग ती माहेरची असोत की सासरची, ते आगीत तेल टाकण्याचेच काम करतात. खरं तर या मंडळींनी दोघांना समजावून सांगण्याची जबाबदारी असते. पण तसे होत नाही.

आज देशातील विविध कुटुंब न्यायालयात करोडोंनी केसेस पडलेल्या आहेत. त्यात दोन्हीकडील वकीलांचे मात्र फावले आहे. एकीकडे एक कुटुंब उध्वस्त होत आहे तर, त्याच उध्वस्त होणाऱ्या दांपत्याच्या जीवावर पैशावर दोन वकीलांच्या कुटुंबाची भरभराट होताना दिसत आहे. जग सुधारणेच्या मार्गावर आहे. जगातील नवनवीन शोधामुळे व तंत्रज्ञानामुळे जगात बहुमोल परिवर्तन घडून आले आहे. त्यात मासमीडियाचा मोठा वाटा आहे. जेव्हापासून ते अस्तित्वात आले आहे, तेव्हापासून माणूस सुधारण्याऐवजी बिघडत चालला आहे. माणसाला चांगल्या शिकवणीला बराच वेळ लागतो; मात्र वाईट शिकवणी त्याला लगेच पटतात व तो त्या शिकवणी लगेच अंगिकारतो त्यातून एकमेकांतील मतभेद वाढू लागतात. त्यावर वेळीच उपाय नाही केला तर ते टोकापर्यंत मजल जातात. लग्नापूर्वीचे एकमेकांवरील प्रेम कमी होऊन जाते. लग्नापूर्वी एकमेकांच्या सगळ्या गोष्टी चांगल्या वाटायच्या; पण लग्न होऊन जाताच काही दिवसातच त्या गोष्टी अत्यंत वाईट वाटू लागतात, त्रासदायक वाटू लागतात. कारण लग्नापूर्वीच्या आंधळेपणाचे डोळे येतात. त्यांना एकमेकांतील दोष-उणिवा दिसू लागतात. त्यावर एकमेकांतील दोष-उणिवावर विचार मंथन करून उपाय शोधण्याऐवजी त्यावर एकच इलाज शोधला जातो. तो म्हणजे एकमेकांपासून दूर होण्याचा हा इलाज किती घातक आहे हे विभक्तीनंतर कळते, पण जेव्हा ते कळते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. नंतर होतो तो पश्चाताप.

पूर्वीच्या काळात एकमेकांत संवाद होता. आत्ताच्या काळात संपर्क साधने आहेत, या संपर्क साधनांनी एकमेकांतील अंतर दूर केले. एकमेकांतील संवेदनाही संपुष्टात आणल्या आहेत. तरुण आणि ज्येष्ठांनी विचार जाणून घेणे सोडले आहे. अनेकदा प्रेमाचा एक शब्द वर्षांचे अंतर क्षणार्धात दूर करू शकतो. जर प्रेमच उरले नाही तर एकमेकांतील दुरावा कसा संपेल?

त्यासाठी एकमेकांशी संवाद किंवा बोलचाल चालू राहणे महत्त्वाचे आहे. बोलचाल असेल तर कोणत्याही समस्येचे समाधान काढता येते. हीच गोष्ट आजची पिढी विसरत चालली आहे. म्हणून लहान-सहान गोष्टींवरून रूसवे-फुगवे व अबोला धरला जातो. परिणामस्वरूप एकमेकांचा मान-सन्मान होताना दिसत नाही. आदराची जागा अरे-तुरेने  घेतली आहे. नवीन नवरा-नवरी सुरुवातीच्या काळात आपापल्या माता-पित्यांना आदराने संबोधित असतात, पण जसे त्या जोडप्यात तणाव वाढतो तसे माता-पित्यांच्या आदराला तिलांजली दिली जाऊन त्या ठिकाणी ‘मी आणि माझे', ‘तू आणि तुझे' सुरू झाले की समजायचे कुटुंबाला व कुटुंबाच्या एकोप्याला तडे पडणे सुरू झाले व संवाद नसल्याने ते तडे वाढत जाऊन घराचे शकले होणे नक्की झाले आहे.

आजच्या जमान्यात पती-पत्नी नोकरी निमित्ताने, पैसा कमावण्याच्या निमित्ताने बराच काळ एकमेकांपासून दूर राहतात. दूर राहण्याचा अर्थ प्रत्यक्ष दूर गावी नव्हे तर एकाच घरात असूनही दिवसाच्या २४ तासांपैकी अनेक तास विविध कामात व्यग्र असतात. अशावेळी त्यांच्यातील आपापसातील संवाद हरवतो. त्यांच्यातील जवळीक संपते. अशावेळी एकमेकांवर संशयाचे भूत घर करते. म्हणतात ना, ”खाली दिमाग शैतान का घर . मग तो शैतान जागा होतो व एकमेकांच्या मनातील विश्वास किंवा भरोसा संपायला लागतो. खरे तर कानाने ऐकलेल्या व डोळ्यांनी पाहिलेल्या अनेक गोष्टी खऱ्या नसतात. कानात आणि डोळ्यात चार बोटांचे अंतर असते, पण तेच खरे समजून आजची तरुण पिढी एकमेकांवरील विश्वास नष्ट करत आहे. तोच धागा तुटला तर संसाररुपी माळ कशी टिकणार?

एकमेकांवरील प्रेम संपले, सन्मान संपला, विश्वास संपला की त्याची जागा एकमेकांवर टीका-टिपणी सुरू होते - ही टिका टिप्पणी जसजसा काळ जातो तसतशी वाढत जाते परिणाम काय होणार हे सांगणे गरजेचे नाही, ते सर्वांना माहित आहे. आणि त्यातही टिका टिप्पणी सहन करण्याची कुवत दोघांतही नसल्याने संसारात तणाव वाढतो प्रकरण शब्दावरून हाणामारीवर जाते आणि ही हाणामारी संसार जोडायला का नाती तोडायला क्षणाचाही विलंब करत नाही.

नात्यात मग ते कोणतेही असो त्यात ‘अहम' मी हा कधीच नसावा जेथे ‘मी' येतो तेथे ‘तू' येतो. आणि अधिक की, दोघांचा ‘इगो' जागा होतो. ‘इगो' दुखावला गेला की त्याची जागा दुरावा घेतो.

आजची तरुण पिढी शिकली सवरलेली आहेत बऱ्यापैकी स्वतःची कमाई करत आहेत. हातात बऱ्यापैकी पैसा खेळत असल्याने प्रत्येकात 'मी' हा भरलेला आहे. स्वतःवर जास्त विश्वास वाढला आहे. दोघांपैकी कोणीही स्वतःला कमी समजत नाही. त्यामुळे एक दुसऱ्यावर 'कुरघोडी' किंवा स्वतःला वरचढ समजू लागल्याने बाकीच्या गोष्टी दुय्यम समजल्या जातात.

काल एक टॅक्सीवाला भेटला होता म्हणाला ‘अंकल मुझे दो बच्चे है। और बीवी मायके मे रहती है। इस लिये मै हमेशा टेन्शन मे रहता हूँ' मी त्याला कारण विचारले तर तो म्हणतो त्याच्यापेक्षा तिची कमाई जास्त आहे तिचा तिला गर्व आहे आणि त्याचा स्वभाव तापट असल्याने त्याने अनेकवेळा मारहाण केली, एकदा तर सगळ्याच्या देखत त्याने तिचे कपडेही जाळले व धमकी दिली की, यापुढे अशी वागलीस तर कपड्यासकट तुलाही जाळून टाकेल. गेली तीन वर्षे ती आपल्या माहेरीच राहत आहे. आता त्याला तिची आठवण येत आहे स्वतःच्या चुकीची जाणीव झाली आहे; पण ती स्वतःचा अपमान सहन करायला तयार नाही व परत यायलाही तयार नाही. तिच्या घरची मंडळीही तिला पाठवायला तयार नाहीत. मुलांचा सांभाळ आई-वडील करतात, पण मुलांना आईचा सहवास मिळत नाही.

असे प्रसंग टाळण्यासाठी दोघांकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे आणि त्यातच अनेक जोडप्यात एका नव्या समस्येने शिरकाव केला आहे. ती म्हणजे एकमेकांना वेळ देणे कमी झाले आहे. आजच्या महागाईच्या जमानात पैसा महत्त्वाचा झाला आहे. पैशासाठी लोक धावाधाव करत आहेत. जेथे ते स्वतःलाच वेळ देऊ शकत नाहीत तिथे दुसऱ्याला वेळ कसा देणार. कामाच्या धावपळीत एवढे थकून जातात की, एक दुसऱ्यासाठी क्षणाचाही वेळ काढायचा विचार त्यांच्या मनात येत नाही. त्यामुळेही अनेकांचे वैवाहिक आयुष्य संपुष्टात येत आहे.  - भिमराव गांधले 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

नागरी धर्म