प्रवास सृजनाचा
कविता डॉट कॉम कृत परिचय एका कवीचा
(सौजन्य : दै. आपलं नवे शहर)
पंकज अलकाबाई अशोक बोराडे
पद :- प्राथमिक शिक्षक
नमुंमपा शाळा क्र. ७१, इंदिरा नगर
शिक्षण :- बी.ए., डी. टी. एड.
छंद - वाचन, निवेदन, कविता लेखन, नाट्य दिग्दर्शन, लेखन, अभिनय
माझा शिवराय
शिवराय म्हणजे कोण ? शिवराय म्हणजे काय ?
ज्याला परस्त्रीमध्ये दिसते आपली माय,
त्या प्रत्येकाची नजर म्हणजे माझा शिवराय
लाख संकटे येऊ दे, येऊ दे वादळवारा
सह्याद्री गत आजही देतो, जो खडा पहारा
तडजोड न करता उभा आहे जो, रोवून आपला पाय
त्या प्रत्येकाची निष्ठा म्हणजे माझा शिवराय
अन्यायाशी झुंज देतो, झुंज देतो अत्याचाराशी
स्वराज्य स्थापण्या रयतेचे, लढा देतो भ्रष्टाचाराशी
लढतो भिडतो अत्याचाराशी, मिळवून देण्यासाठी न्याय
भिडणारे ते प्रत्येक हात म्हणजे, माझा शिवराय
स्वधर्मावर जेवढी श्रद्धा, परधर्माचा तेवढाच आदर
मंदिरात जो शाल चढवितो, दर्ग्यात चढवितो तोच चादर
सर्वांना जो सोबत घेऊन चालतो संपविण्या भेदभाव
त्या प्रत्येकाचा प्रयत्न म्हणजे, माझा शिवराय
ज्याच्या मनामध्ये वसला आहे, या मातीबद्दल अभिमान
मातृभाषेसाठी लढतो झगडतो, मराठीचा बाळगतो स्वाभिमान
मराठीला अस्तित्व समजतो भाषा,
म्हणजेच मराठी माय
त्या प्रत्येकाची तळमळ म्हणजे, माझा शिवराय
पंकज अलकाबाई बोराडे
(प्राथमिक शिक्षक)