आनंदाचा कंद...

रिटायर्ड कर्नल सुभाष म्हणजे ग्रेट, शौकीन,हंसी मजाक माणूस. बंदुकीच्या गोळ्या निधड्या छातीवर झेलल्या त्यांनी. अनेक ठिकाणी जखमा झाल्या त्यांना पण त्या जखमांचे व्रण ते कुरवाळत नाही बसले, उलट अभिमानाने ते सांगतात ही माझी गर्वाने मिरवावी अशी प्रशस्तीपत्रकेच आहेत.

सकारात्मक दृष्टिकोनातला हा राजा माणूस मला फार आवडतो माणसांचा संग्रह त्यांच्याजवळ आहेच;  पण विविध देशातली नाणी, तिकिटे, प्रत्येक देशाची प्रतीके, निशाणे, सर्वधर्म एक आहे हा समन्वय साधून त्यांनी संग्रह केला आहे. मी एकेक वस्तू न्याहाळत होतो. एका काचेच्या कपाटात व्यवस्थित टांगलेले प्लॅस्टर बघून मी चमकलो आणि तिथेच थबकलो. बँडेज? प्लॅस्टर? आणि इतकं  कसं जपून ठेवलेय आणि ते कां बरं? हा कोणता आनंदी छंदाचा प्रकार?

माझ्या चेहऱ्यावरच्या गोंधळ पहात ते गडगडाटी  हंसत म्हणाले, "नवल वाटलं ना हा शोपीस बघून? प्लॅस्टर काढण्यासाठी लोकं कासावीस होतात. काढल्यावर ते फेकून देतात. मी तर ते मौल्यवानपणे जपलय म्हणून, गोंधळालास ना तू? अरे या प्लॅस्टरमुळेच मला संकटात धावून येणारी माणसे भेटली आणि प्रसंगाने माणसांची परीक्षा झाली त्यांच्या सेवाभावाची खूण मला पटली. त्यांची आठवण म्हणूनच मी हे जपलंय नजरेसमोर ठेवलंय.”

 माझं कुतूहल जागं होऊन मी म्हणालो, "नक्कीच  ह्या मागे काहीतरी इतिहास असणार आहे, होना कर्नल साहेब?”

"बरोब्बर ओळखलंस वेळ असेल तर ते गुढरहस्य ऐकवतो तुला. ऐकायचंय?”

"हे काय बोलणं झालं का साहेब! तुमच्याकडच्या गुण गौरवकथा ऐकायला आम्ही नेहमीच अग्रेसर असतो.” मी त्यांच्या सोपयावर मांड ठोकून प्लॅस्टर रहस्य ऐकण्यासाठी उत्साहाने खाली बसलो.

 हळूवारपणे एखादं कोडं उलगडावं तसे ते सांगू लागले, "आयष्यात सुख आले, ते मी अनुभवले दुःखही  झेलले यश आल्यावर त्यावर स्वार झालो. पण स्वदेशीयांकडून अपयश आल्यावर मात्र मी खचलो, अस्थिर झालो. देशासाठी देशबंधूंसाठी आम्ही आमचं आयुष्य पणाला लावतो; पण तेच देशबंधू आमच्याशी गद्दारीने वागले तर मात्र आम्ही उद्विग्न होतो.”

 मला रहावलं नाही म्हणून मी विचारले, "परतून मायदेशी आल्यावर काही अनुभवलंत का तुम्ही? काय घडलं असं?”

"काय घडलं? अरे दगडाच्या काळजाची माणसं भेटली मला, पण हो! हो! त्यातही एक माणुसकीचा झरा पण होता.”

 "कर्नल साहेब,  तुमचा अनुभव ऐकायला मला आवडेल. सांगा ना काय घडलं असं?” माझी उत्सुकता बघून गोष्टीवेल्हाळ कर्नल सांगू लागले, "आतापर्यंत तू माझ्या लढाईवरच्या कथा ऐकल्यास; पण त्या घटनेमुळे मात्र माझ्या एकाकी आयुष्याला कलाटणी मिळाली." पाकिटातला फोटो मला दाखवत ते पुढे म्हणाले  "त्याआधी हा बघ गुंडाचा, माझ्या नातवाचा फोटो बघ.”

 फोटोतलं गोडुलं, गोबरं गोजिरवाणं पोरगं हंसत होतं. बाजूला गोरीघारी त्याची आई आणि शेजारी बाबा उभे होते. प्रत्येकाच्या फोटोवर बोट ठेवून ते सांगू लागले, "हा माझा राजबिंडा लेक आनंद, ही माझी गोरी परी म्हणजे माझी सून आणि हा बघ, हा राजपुत्र माझा नातू आहे.”
  त्यांना मध्येच अडवत मी म्हणालो, "पण तुम्ही तर..”  

"हो हो खरंय बिनापाश अविवाहीत, ना घरका ना घाटका असा मी सडाफटिंग माजी सैनिक आहे. मग मी आजोबा कसा झालो असंचं म्हणायचंय नां तुला? पण मित्रा इथे मात्र मी गुंतत गेलो. माझ्या आईने मला लहानपणी कान मंत्र दिला आहे माणसं जोड. जोडलेल्यांना कधीही तोडू नकोस. तुझ्या व्यक्तिगत आयुष्यात आलेली प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची आहे, तेव्हा ही जोडलेली गांठ कायम पक्कीच राहू दे.”

"साहेब तुमच्या आईचं प्रत्येक वाक्यन्‌वाक्य मोलाचे आहे. म्हणूनच तुम्ही जगमित्र आहात. पण सांगा ना तो प्रसंग. काय घडलं असं?”

"अरे नेहमीप्रमाणे मी मस्तीत एका पायाने गाडी चालवत होतो तुला माहीतच आहे एक पाय मी रणांगणावर सोडून आलोय ते ! तर काय सांगत होतो वाटेत कुत्र्याचं पिल्लू आलं. त्याला वाचवायला म्हणून मी करकचून ब्रेक दाबला ते पिटुकलं वाचलं रे! पण मागच्या कारवाल्यांनी मला उडवलं. माझा फुटबॉल झाला आणि फुटपाथवर मी आदळलो. मला सांवरायला जवळ यायच्याऐवजी माझे हे देशबंधू लांब पळाले. मला उठवायला कुणाचाही हात पुढे येईना, रक्तस्त्राव झाला नव्हता; पण कमरेचं हाड कटकन मोडल होतं. लढाईत निधड्या छातीने गोळ्या झेलणारा मी इथे मात्र हरलो. कारवाला तर केव्हाच पळाला होता.”

 बापरे फारच अवघड प्रसंग. "अहो! ज्यांच्यासाठी अहोरात्र तुम्ही रणांगणावर तळहातावर शीर घेऊन लढलात ती माणसंच माणुसकी विसरली. ही कृतघ्नता आहे.”

"हो ना! पण त्या पळून जाणाऱ्या लोकांतही एकजण देवदूतासारखा थांबला. पेपर विकणारा छोकरा होता तो. त्या छोकऱ्याचा छोटा हात माझ्या मदतीला पुढे झाला.

 वर्तमानपत्राचा ग्ीा आणि सायकल मित्राच्या स्वाधीन करून तो माझ्याकडे धावला होता. मी वेदनेने तडफडत होतो कुणीतरी मला सोडलं होतं; पण कुणीतरी माझ्या मदतीला धावलं होतं. तब्बल पंधरा दिवस मी हॉस्पिटलला होतो. भानावर आलो तेव्हा मला कळलं माझ्या एका पायाला प्लॅस्टर घातलंय.”

"पण मग कर्नल साहेब  तुमचा हॉस्पिटलचा ऑपरेशनचा खर्च, जेवण खाणं कसं आणि कुणी ?”      

"अरे तो देवदूत छोकरा म्हणजे आजचा माझा मानसपुत्र आनंद आहे आणि त्याची आई कांताबेन माझी मानस भगिनी आहे. आनंदचे वडील परलोकवासी झाले; पण जातांना त्यांनी आठवण म्हणून त्यांच्या नावाचं पदक असलेली चेन कांताबेनच्या गळ्यात घातली होती. तो तिचा अमूल्य ठेवा होता. माझा पहिल्या दिवसापासूनचा खर्च भागवण्यासाठी माऊलीने चेन गहाण ठेवली. मला कुणीच नाही असं कळल्यावर ती माझी धर्माची बहीण झाली. नवऱ्याच्या आठवणीचं पदक काळ्या दोऱ्यात ओऊन गळ्यात बांधलं. मला फारशी दुखापत झाली नव्हती; पण पाय फ्रॅक्चर मध्ये होता मी बँडेजचं ओझं वाहात होतो; तर खर्चाचा भार त्या मायलेकानी माझ्यासाठी, मागील जन्माचे ऋणानुबंध असल्यासारखा उचलला होता. तुला सांगतो मित्रा, त्या काळात डॉ. वैशंपायन, सिस्टर फरीदा, इतर नोकर सफाई वर्ग अहोरात्र माझ्या सेवेला तत्पर होता. आपल्या देशासाठी सीमेवर लढणारा देशप्रेमी हीच भावना माझ्या बाबतीत प्रत्येकाच्या मनात होती आणि तो सेवक वर्ग सेवेला तत्परतेने पुढे झाला. अरे! सख्खे नातेवाईक काय ठेवतील इतकी माझी बडदास्त त्यांनी ठेवली. त्या सेवेची खूण त्या काळातली निस्वार्थी माणुसकी ती सेवाभावी माणसं त्यांच्यामुळेच तर मी लवकर बरा झालो आणि एका पायावर उभा राह्यलो.

 बंदुकीच्या गोळ्यांच्या खाणाखुणा मी शरीरावर वागवल्या. त्या बघून माझ्या देशप्रेमाच्या आठवणी उफाळून येतात. तशीच आठवण या माझ्या जोडलेल्या माणसांची मनात कायम राहावी त्यांच्या प्रेमाचं प्रतीक माझ्या डोळ्यासमोर रहावं म्हणून मी हे प्लॅस्टर काचेच्या कप्प्यात आणि मनाच्या कोपऱ्यात जतन करून ठेवलं आहे. मी बरा झालो तेव्हा कांताबेनची चेन सोडवून आणली तिने जपून ठेवलेल्या आनंदच्या वडिलांच्या प्रेमाचं प्रतीक असलेला बदामी फोटो चेनमध्ये घालून मी तिला वचन दिलं, आजपासून तू माझी वडील बहिण आहेस आणि आनंद माझा मानसपुत्र आहे कांताबेननी ते नातं मानलं आणि शेवटपर्यंत निभावलं.

 आनंद मुळातच हुशार होता परिस्थितीमुळे त्याचं अडलेलं शिकायचं स्वप्न मी पूर्ण करण्याचं वचन बेनला दिलं. आज आनंद परदेशात मोठ्या हुद्द्यावर आहे जेनीसारखी गोड सून आणि नातू त्याच्यामुळे मला आणि कांताबेनला मिळालाय. मागच्या जन्मीच्या ऋणानुबंधाच्या गाठी आहेत ह्या. दुसऱ्या नातवाची चाहूल आम्हाला लागलीय. तो आनंदोत्सव साजरा करण्यासाठी लवकरच आम्ही अमेरिकेला जाणार आहोत आणि बरं का मित्रा,  "सामानाच्या पॅकिंगमध्ये हे प्लॅस्टर असणार आहे. तिथे ते मिरवून सगळ्यांना ही प्लॅस्टर कथा मी ऐकवणार आहे. कारण अरे, त्याच्यामुळेच तर माझ्यासारख्या भटक्या माणसाला बहिण मिळाली पुत्र, सून, नातू मिळाला आहे ना! आता सांग आहे की नाही माझं संग्रहालय प्रेक्षणीय?”

कर्नल साहेबांची प्लॅस्टर प्रेमकहाणी ऐकून मी अवाक झालो म्हणालो, "मानलं मानलं कर्नल तुम्हाला!” असं म्हणत मी त्यांना आणि त्यांच्या प्लॅस्टरला कडक सॅल्यूट ठोकला.
-राधिका (माजगावकर) पंडित 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!