ती माणसे गेली कुठे?
साधारण पंधरा-वीस वर्षांपुर्वीपर्यंत असे वातावरण होते की कुणाच्या नात्यात लग्न असले की सारा गोतावळा लग्नघरी जमत असे. मामा-मामी, मावशी, आत्या, काका, काकु, त्यांची मुले, सूना असा तो सारा माहौल असे. बहुधा लग्ने ही गावच्या घरी, दारातच होत असत. मग मंगल कार्यालय' अर्थात ‘हॉल सिस्टीम आली. कारण त्याआधी ब्लॉक, फ्लॅट सिस्टीमने यजनानांना ‘फ्लॅट' आणि आयोजकांना ‘ब्लॉक' करुन टाकले होते. अनेक लग्नघरी मामा, मावशा पापड, कुरडया, सांडगे अशा व ईतर चीजवस्तू स्वतः आपल्या घरुनच बनवून पोहचत. यातही मामाकडेच लग्नाची सारी सूत्रे असत. त्याच्यापुढे लग्नघरचा कर्ता पुरुषही फारसा आवाज काढत नसे..असा तो सारा काळ होता.
सगळे काही ‘आऊट सोर्स' करण्याचा जमाना अवतरला आणि यातून पहिला बळी गेला तो जवळच्या नातलगांचा. गावची, साधी भोळी, निष्पाप, उंची कपड्यांतून नव्हे, तर कामातून जवळीक जपणारी नाती हळुहळु यातून बाद होत गेली. कॅटरर्स, फोटोग्राफर्स, मंडपवाले, लायटींगवाले, गाडी सजवणारे, मेंदी काढणारे हे सगळेच बाहेरचे म्हटल्यावर ‘आतल्यांना' काहीच काम उरले नाही. मग ती हवीत कशाला? मला आठवते की माझ्या नात्यातील अनेक साखरपुडे, हळदी, पूजाविधी, विवाहांचे जेवणप्रसंगी ही घरचीच माणसे रांधत असत. नात्यातले लोक घराच्या रंगकामापासून सारी कामे करीत असत. फोटो काढायलाही नात्यातलाच कुणी कॅमेरावाला हमखास येत असे. नवरदेव ज्या गाडीतून जाणार त्या गाडीला सजवायला नवरदेवाची चुलत, मावस, आते, मामे भावंडे समर्थ असत. हळदीला नाचकामाची जबाबदारी त्यांच्यावरच असे. लग्नाची वरात निघाल्यावर त्या लग्नात मिळालेल्या आहेरातील, रुखवातातील भांडी, कूकर, हंडे, कळशा, पाण्याच्या टाक्या डोक्यावर घेऊन बेधुंद नाचणारी ज्येष्ठ नातेवाईक मंडळीही मी ‘याची देही याची डोळा' पाहिली आहेत. ती माणसे गेली कुठे?
ती माणसे श्रीमंत नव्हती. त्यांच्याकडे स्वतःची वाहनेही नव्हती. ती उंची घरात राहणारी नव्हती. ती कुठल्या कंपनीची-इमारतींची-गोडाऊन-गॅरेजची मालकही नव्हती. तरीही ‘घरचे कार्य' म्हटल्यावर ती धावत यायची व यजमानांचा भार हलका करायची...कसलीही अपेक्षा न ठेवता! हळुहळु काळाने कुस पालटली. लोक ‘करियर'कडे लक्ष देऊ लागले. शाळा, वलास, छंद वर्ग, वर्षभर चालणाऱ्या विविध परिक्षा, घरातच आई अथवा वडिलांकडून काही नातलगांचा होणारा अपमानजनक उल्लेख यातून नवी पिढी बिथरली. कुटुंबे फुटायला सुरुवात झाली होतीच. त्यात मग छुपी स्पर्धा, इर्षा वाढू लागली. ‘त्याच्या/तिच्या पुढे तुला जायचंय, त्याला/तिला ओव्हरटेक करायचंय, आख्ख्या कुटुंबात तूच आघाडीवर राहायला पाहिजेस' वगैरे सूचनांचा भडिमार मुलांवर होऊ लागला. लग्न, साखरपुडे, बारशी, पूजा, हळदीसमारंभ, वास्तूशांती वगैरे ठिकाणी नातलग भेटतात, एकमेकांची ख्यालीखुशाली कळते, पुढचे बेत आखता येतात या सगळ्याकडे ‘नॉन प्रॉडक्टिव्ह थिंग्ज' म्हणून पाहायला मुलांना शिकवले जाऊ लागले. मुलांना आपण पालकांनीच आपले जुने नातलग, मित्रमंडळी, जुने शेजारी, परिचित, आपल्या संकटकाळी धावून आलेले लोक यांच्याबद्दल काही सांगितले नाही, त्यांना त्यांच्यासमोर नेऊन ओळखी करुनच दिल्या नाहीत तर त्यांना तरी त्रण, कृतज्ञता, सामीलकी, बांधीलकी, सामाजिक जाणीव हे सगळे कसे कळणार? हे होत नसल्याने हळुहळु या मुलांमध्ये त्यांच्याच नातलगांबद्दलचा एक प्रच्छन्न दुरावा आकार घेऊ लागला. मी पाह्यलंय की अलिकडे आर्थिक स्थिती सुधारलेल्या काही घरांमधून मुलांसाठी ‘सेल्फ कंटेण्ड' खोल्या असतात. ‘अभ्यास, वर्क फ्रॉम होम' यांच्या नावाखाली ही मुले स्वतःला तेथे काेंडुन घेतात. आपल्या घरी मावशी, मामा, काका, आत्या येऊन गेल्याचे त्यांच्या खिजगणतीतही नसते. असे जर वातावरण वाढू लागले तर या मुलांकडून नाती गोती जपली जाण्याची अपेक्षा करणे म्हणजे पालथ्या घड्यावरचे पाणीच नव्हे काय?
डबल इन्कम नो किड म्हणजे डिंक म्हणजेच जोडीदारांपैकी दोघांनीही कमावते असणे व ते कमावण्यासाठी किंवा मुले जन्माला घालून त्यांचं पालनपोषण करा, स्वतःची सोनेरी वर्षे त्यांच्या संगोपनात घालवा, त्यांचं शी-शू काढत बसा, त्यांच्या शाळा-कॉलेजच्या कटकटी सांभाळत बसा या झंझटमारीपेक्षा मुलं जन्मालाच न घालण्याचा निर्णय घेणे, मुलाने किंवा मुलीने लग्नच न करणे, जमलेले लग्न मोडणे, लग्न झालेच तरी ते वर्ष सहा-महिन्यांत काही ना काही कारणास्तव न टिकणे, लग्न टिकणे पण आपापसात तो सलोखा न उरणे, पती-पत्नीने एकाच छपराखाली राहणे... पण एकमेकांचे तोंडही न पाहण्याची इच्छा बाळगणे असे अनेक प्रकार, उपप्रकार मी अवतीभवती पाहात आहे. माझ्या नात्यामध्येही काही मुलींनी लग्न न करण्याचा निर्णय घेऊन तो प्रत्यक्षात उतरवला आहे. काही मुलगे घोडनवरे पदाला पोहचले आहेत. शिक्षणाच्या नावाखाली आधीच परदेशात जाऊन बसलेले काही मुलगे, मुली नावापुरते भारतात येत लग्न आटोपून सरळ आपापल्या जोडीदाराला घेत आपल्या पालकांना इथे एकाकी टाकून परत परदेशीच रवाना झाले आहेत ! तोंडी लावायला त्या पालकांना पाहुण्यांसारखे परदेश दाखवायला नेले जाते. गर्भारपण, बाळंतपणासाठी हक्काचे कामदार म्हणून वापरण्यासाठी बोलावले जाते व काम झाले की पुन्हा त्यांची बोळवण भारतात केली जाते. असे प्रकार पूर्वी केवळ अभिजनांमध्ये पाहायला मिळत असत. पण आता शिक्षण, रोजगार, स्वतःला प्रगत करण्याच्या व्यापक संधी उपलब्ध झाल्याने समाजाच्या विविध स्तरांमधून हे सारे पाहायला मिळत आहे. बापरे, किती बरे ही अफाट प्रगती!
या सगळ्यात नातेसंबंधांचा बळी गेला नसता तरच नवल. एकेकाळी मी पाहिलंय की एकत्र कुटुंबात किंवा विभक्त कुटुंबातही त्या परिवारातील आजोबा किंवा मोठा चुलता किंवा मोठा मामा यांचा मोठा दबदबा असे. त्या घरातील मोठ्या निर्णयांवर त्याचा प्रभाव असे. ‘मामांना, काकांना, आजोबांना विचारल्याशिवाय आम्ही काहीच करणार नाही' अशा प्रकारचे डायलॉग मी अनेक कुटुंंबांतून वेळोवेळी ऐकले आहेत. लग्न, वास्तुशांत, गृहप्रवेश, नवीन खरेदी या व अशा अनेक प्रसंगी घरातील सदस्याइतकेच, किंबहुना काकणभर जास्तच महत्व या ज्येष्ठ नातलगांना असे. ‘आम्ही दोघं आमची दोन किंवा आमचं एकच' अशा प्रकारची कुटुंबरचना आली आणि घरातली डोकी वगळल्यास बाकी साऱ्यांच्या सहभागाला, निर्णयप्रक्रियेतील सामीलकीला दरवाज्याबाहेरच ठेवण्याची प्रथा कधी रुढ झाली ते समजलंसुध्दा नाही.
गावची ग्रामीण, फारशी एटीकेट्स माहीत नसलेली, अघळपघळ बोलणारी, मुलाबाळांच्या-नातवंडांच्या गालांवरुन खरखरीत हात फिरवून स्वतःच्या कानाजवळ बोटे मोडणारी ती प्रेमळ, निरपेक्ष, नितळ मायेची माणसं आता पाहायला मिळणं दुर्मिळ झाले आहे. मी स्वतः या पिढीच्या त्या मायेचा, प्रेमाचा अनुभव घेतला आहे. पण आता मीच वयाच्या अशा टप्प्यावर पोहचलो आहे की माझे आई-वडील, सर्व आत्या, सर्व मावशा, मामा, माम्या या सगळ्यांनी या जगाचा निरोप घेतल्यालाही बराच काळ लोटला आहे. माझ्या आईचे आई-वडील तर मी लहानपणीही पाहिले नव्हते; त्या वयात त्यांनी हे जग सोडले होते. आता परिस्थिती अशी आली आहे की लग्नपत्रिकेमध्ये जरी ‘सर्वांनी सहकुटुंब येऊन वधूवरांस शुभाशिर्वाद द्यावेत' असे छापलेले असले तरी घरातील सारेजण नोकरी, व्यवसाय, वलास, छंद वर्ग, आधीच नियोजित असलेले कार्यक्रम अशा अनेक कारणांमुळे लग्नाला जाऊ शकत नाही. अनेकदा ‘ते सगळे तरी आपल्याकडील लग्नाला कुठे होते?' असा प्रश्न करीत घरातल्या एखाद्यानेच लग्नाला जाऊन त्याची ‘परतफेड' केली जाते. असे म्हटले जाते की सगळीकडे ईश्वराला पोहचता येत नाही म्हणून त्याने आई-वडीलांकडे ते काम सोपवले. मग सगळीकडे आईवडीलांनाही पोहचणे शक्य नसते म्हणून नातेवाईकांकडे ती जबाबदारी आली. आता सगळीकडे नातेवाईकही पोहचू शकत नसतात म्हणून रक्ताचे संबंध नसलेली... पण रक्तसंबंधांपेक्षाही दाट जवळीक असलेली मित्रमंडळी तयार झाली असल्याचे दिसून येते. अलिकडच्या विविध लग्नसोहळ्यांत एकवेळ नातेवाईक कमी आढळतील; पण नवरदेव व नवरीचा मित्रपरिवार कसा प्रभाव टाकून असतो हेही पाहता येईल. बऱ्याचदा काही ‘कावेबाज, कटकारस्थानी' नातेवाईक लग्नासारख्या प्रसंगी यजमानाची कशी अडवणूक करता येईल, त्याची चारचौघात कशी फजिती करता येईल, त्याला अपमानित होण्याच्या प्रसंगांना कसे तोंड द्यावे लागेल याची व्यवस्था किंवा प्रतिक्षा करत असतात. त्यावर हा मित्रपरिवाराचा उतारा चांगला आहे.
ते काही असो...शेवटी मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, तो समुहात राहणे पसंद करतो. त्याला बोलण्याची कला निसर्गाने दिली आहे. बोलणे...मग ते सुसंवादी असो वा विसंवादी; प्रेमाचे असो वा भांडणाचे...ते घडून आलेच पाहिजे. माणूस बोलणे विसरला किंवा त्याने ते कमी केले तर मानवाचे शेपूट जसे कमी वापरामुळे किंवा अजिबातच न वापरल्यामुळे गळून गेले...तसे बोलण्याची शक्तीही निघून जाईल की काय अशी भिती वाटते. म्हणून एकत्र यावे, एकत्र जमावे, एकमेकांची टिंगलटवाळी यथेच्छ करावी, दंगामस्ती...प्रसंगी भांडणेही करावी व काही वेळातच सारे रुसवे फुगवे विसरुन निरागसपणे एकमेकांच्या गळ्यात पडावे. एकाच आईची लहान लेकरे नाही का अशीच भांडून काही क्षणांनी एकत्र येत? पुढच्या आनंदी क्षणांच्या सहवासासाठी ! तसे मोठ्यांच्या बाबतीतही घडल्याचे पाहायला मिळावे. पण त्यासाठी माणसे हवी आहेत. त्या माणसांनी आपल्याशी जोडलेले असायला हवे. ती माणसे जोडण्याची कला मात्र ज्याने त्याने आपला ‘अहं' बाजूला ठेवूनच विकसित करायला हवी. कारण त्यासाठी कोणताच ऑनलाईन किंवा ऑफलाईन कोर्स उपलब्ध नाही.
-राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक दै. आपलं नवे शहर