थेट मंत्रालयातून

छत्रपतींची बदनामी करणारे कोण फडणवीस की पवार !

राज्य विधिमंडळाच्या नागपूरमध्ये पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी राजांना स्वराज्य रक्षक म्हणून संबोधल्याच्या कारणास्तव भारतीय जनता पक्षाने राज्यभर त्यांचा निदर्शनं करून निषेध केला. झोपी गेलेला जागा झाला, असाच हा आंदोलनाचा प्रकार होता. स्वराज्य रक्षक अशी उपाधी दिल्याने अजित पवार यांनी संभाजी राजांचा जणू अवमानच केला असा प्रचार भाजपच्या धर्माभिमान्यांनी सुरू केला. वास्तविक पवार यांनी ते राज्याचे अर्थमंत्री असताना संभाजी राजांचा स्वराज्य रक्षक असा उल्लेख मागल्यावर्षी अर्थसंकल्प मांडताना जवळपास 10 वेळा केला. राज्याच्या अर्थसंकल्पाची पूर्वतयारी ही वित्तमंत्रालयाच्या संबंधित अधिकार्‍यांकडून होत असते. अर्थसंकल्प जाहीर झाला त्यातील संभाजी राजांविषयीची टिपण्णं ही अधिकार्‍यांच्या टिपण्णीचा भाग होता. तटस्थ असलेली कोणीही व्यक्ती उगाच मसाला लावून कोणाला काहीही उपाध्या देणार नाही. आणि छत्रपतींना तर नाहीच नाही. ऐतिहासिक नोंदी नसलेल्या गोष्टींचा उगाच उल्लेख करून कोणी आफत ओढवून घेणार नाहीत. अशाही परिस्थितीत अजित पवार यांनी संभाजी महाराजांचा अवमान केला, असं उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं असेल तर 2022 चं अंदाजपत्रक जाहीर होत असताना विरोधी पक्षनेते म्हणून स्वत: फडणवीस सभागृहात काय करत होते? राजांचा अवमान झाला असेल तर तो तेव्हाच व्हायला हवा. सभागृहात असलेल्या फडणवीसांना तो कळला नाही, असं थोडीच आहे? पण सोंगच घेतलं असेल तर?

हिवाळी अधिवेशन संपत असताना अर्थसंकल्पात छत्रपती संभाजी रायांच्या स्मारक उभारणीसाठी राखून ठेवण्यात आलेल्या निधीचा उल्लेख करताना अजित पवारांनी संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते, असा पूर्वीप्रमाणे उल्लेख केला. खरं तर ही घटना 29 डिसेंबर 2022 रोजीची. म्हणजे शुक्रवार अधिवेशनाच्या अंतिम दिनाची. तेव्हाही उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस सभागृहात होते. हा उल्लेख झाला तेव्हा लागलीच फडणवीस यांना विविध आयुधांचा वापर करत अजित पवार यांचा निषेध करता आला असता. पण तेव्हा त्यांनी आणि त्यांच्या सभागृहात असलेल्या आमदारांनी झोपेचं सोंग घेतलं होतं. याक्षणी त्यांनी साधा आक्षेपही नोंदवला नाही. खरं तर सभागृहातील अशा नोंदी या अजरामर टिकणार्‍या असतात. संदर्भ म्हणूनही त्यांचा वापर होत असतो. पण ही संधी भाजप आमदारांनी तेव्हा घालवली. एकानेही पवारांनी केलेल्या उल्लेखाचा निषेध  केला नाही की विरोधही केला नाही. सभागृहातले भाजपचे आमदार इतके तल्लख असतात की त्यांना सोन्याची अंडी देणारी कोंबडी असा मुंबईचा उल्लेखही खुपतो त्यांना संभाजी राजांचा अवमान झाल्याचं कळलं नाही? पाच दिवस उलटल्यावर फडणवीसांना जाग येते आणि पवारांनी संभाजी राजांचा जाणीपूर्वक अवमान केला अशी हाकाटी देत आंदोलन पेरलं जातं. अजित पवार यांनी संभाजी राजांचा जाणीवपूर्वक अवमान केला असं फडणवीसांना वाटणं स्वाभाविक आहे. पवारांच्या नावावर हे खपवलं की आपल्या आमदार, मंत्र्यांनी आणि राज्यपालांनी छत्रपतींविरोधी केलेल्या टीकाही खपून जातील, असा त्यांचा मानस असावा. पवारांनी छत्रपतींच्या केलेल्या कथित अवमानानंतर गृहखातं स्वत:च्या हातात असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी पवारांविरोधी गुन्हा नोंदवण्याचे आदेश द्यायला हवे होते. त्याऐवजी त्यांनी राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेलाच खतपाणी घातलं. सत्ताधार्‍यांनी कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल, असं कृत्य करायचं नसतं. ते मंत्री म्हणून घेतलेल्या शपथेचा आणि संविधानाचा अवमान आहे, हे फडणवीस यांना कळत नाही?

छत्रपती संभाजी राजांच्या स्वराज्य रक्षक या उल्लेखात टीका कोणती, हे एकदा फडणवीसांनी राज्यातल्या जनतेला पटवून दिलं पाहिजे. धर्म प्रतिपालक वा गोब्राह्मण प्रतिपालक ही उपाधी कोणत्या ऐतिहासिक नोंदीचा भाग आहे, याची विचारणा करणार्‍या इतिहास संशोधकांना वेडे ठरवणारी जमात सध्या भाजच्या या आंदोलनाचं तोकडं समर्थन करत आहे. ऐतिहासिक दस्तावेजात नको ते घुसवून ही माणसं छत्रपतींच्या नावे स्वत:ची दुकानं चालवू पाहत आहेत. याला राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर बसलेली फडणवीसांसारखी माणसं फूस देत आहेत. छत्रपतींचा कळवळा आलेल्या भाजपच्या या मंडळींना याआधी थोर विभूतींचा झालेला अवमान दिसला नाही? राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपतींविषयी अनेकदा केलेल्या अवमानकारक टिपण्णींनंतर त्यांची बाजू घेणार्‍यांना खरं तर पवारांचा निषेध करण्याचा कोणताही अधिकार नाही. उलट राज्यपालांच्या बोलण्याचा अर्थ तसा नव्हता, असं ही मंडळी कोणत्या तोंडाने सांगत होती? पंढरपूरचा आमदार परिचारक आणि  अहमदनगरचा उपमहापौर श्रीपाद छिंदम शिवरायांच्या नावाने अक्षरश: लाखोली वाहतात आणि तेच पुन्हा भाजपच्या वळचळणीला बसतात, याचा अर्थ लोकांना कळत नाही? शिवाजी महाराज आग्य्रातून बाहेर पडले तसेच शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले, असं सांगत राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा छत्रपतींची तुलना शिंदेंशी करतात. सुधांशू त्रिवेदींसारखा बोलघेवडा प्रवक्ता छत्रपतींनी औरंगजेबाची पाचवेळा माफी मागितली होती, असं ठोकून देतो तेव्हा आज निषेधाचा पत्कारा घेतलेली भाजपची मंडळी कुठल्या बिळात गेली होती? भाजपशी संबंधितांनी मान्यवरांच्या केलेल्या अवमानाचा लेखाजोखा काढला तर अशी आंदोलनं रोज करावी लागतील, याचं भान भाजपच्या नेत्यांना आहे की नाही?  पवारांविरोधी आंदोलन पुकारणारे भाजप नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना माघारी पाठवण्याचं राहो, पण त्यांचा साधा निषेध करू शकले नाहीत. कोणीतरी लाड नावाचा आमदार छत्रपतींच्या जन्मावर पचकतो. निषेध होऊ लागला की पवारांच्या नावाने बोटं मोडतो. संजय गायकवाड नावाचा आमदार तर छत्रपतींच्या गनिमी काव्याची तुलना शिंदेंच्या बंडाशी करू लागतो. भगवान गोयल या भाजपच्या मुर्ख माणसाने तर ‘आजके शिवाजी नरेंद्र मोदी’, या नावाचं पुस्तक छापलंय. या पुस्तकात मोदींची तुलना शिवरायांशी करण्यात आलीय. गोयल यांच्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी होऊनही केंद्राने त्याची साधी दखल घेतली नाही, हे कसं चालतं? इचलकरंजीच्या सुरेश हळवणकर या भाजप आमदाराने तर मोदींची भलामण करणारं हे पुस्तक म्हणजे शिवरायांचं कौतुक असल्याचं म्हटलंय.

भाजपची सत्ता असलेल्या कर्नाटकमध्ये 16 डिसेंबर 2021 या दिवशी छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. राज्यभर याचा निषेध झाला. भाजप मात्र यापासून नामेनिराळा राहिला. या घटनेचा उल्लेख तिथले मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी लहान-सहान घटना असा केला. तेव्हाही महाराष्ट्रात आणि कर्नाटकात बोम्मईंची निर्भत्सना करण्यात आली. भाजपची मंडळी तेव्हाही तोंडाचा चंबू करून होती. आणखी एक भाजपचे उप्दव्यापी मंत्री गिरीराज सिंग हे मध्यप्रदेशच्या छिंदवाड्याच्या दौर्‍यावर होते. तिथे जाताना कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास हार अर्पण करण्याचा आग्रह त्यांच्याकडे धरला. पण त्यांनी नकार दिला.

आपल्या म्हणण्याचं समर्थन करण्यासाठी जुन्या दस्तावेजांचे दाखले देणारी ही माणसं वि.दा.सावरकर यांच्या ‘सहा सोनेरी पानं’ या पुस्तकात छत्रपती शिवरायांविषयी आणि छत्रपती संभाजी राजांविषयी केलेल्या अश्‍लाघ्य क्तव्यांविरोधात टीका करायला या मंडळींची बोबडी बरी वळते? छत्रपतींनी आपली लढाई मुस्लिमांशी नसून त्यांच्या साम्राज्याशी असल्याचं जाहीररित्या मांडूनही छत्रपतींना जाणीवपूर्वक मुस्लिमद्वेष्टे ठरवण्याचा प्रयत्न या मंडळींचा आहे. यासाठी ते पध्दतशीर बदनामीची मोहीम राबवत आहेत. याचाच भाग म्हणजे राज्यभर सुरू असलेलं आंदोलन होय...   - प्रविण पुराे (ज्येष्ठ पत्रकार)

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुशाफिरी : पेशा, पैसा, पर्सनल लाईफ वगैरे..!