मुशाफिरी : पेशा, पैसा, पर्सनल लाईफ वगैरे..!

पेशा, पैसा, पर्सनल लाईफ वगैरे..!

  अलिकडे खासगी जीवनाचा फार गवगवा केला जातोय. परदेशात तर त्याचं खूपच प्रस्थ माजलं आहे. तिकडे आईवडिलांच्या आणि प्रत्येक मुलाच्या (तशी फार मुलं ते लोक जन्माला घालत नाही म्हणा!) स्वतंत्र खोल्या असतात. कुणी कुणाच्या व्यवितगत आयुष्यात म्हणे फारशी ढवळाढवळ करीत नाही. प्रत्येकाला त्यांचं व्यवितगत जीवन असतं. त्याचा एक अवकाश असतो. व्यक्ती सार्वजनिक जीवनात कितीही व्यस्त असली तरीही तिची स्वतःची अशी एक स्पेस असतेच असते व इतरांनी ती तिला व्यापू देण्याच्या आड येता कामा नये, याचं भान मात्र देशी व विदेशी लोकांनी बाळगलेलं बरं.

  एक जमाना होता. आपल्याकडे एकत्र कुटुंब पध्दती होती. या शेतीप्रधान देशाच्या ग्रामीण भागात शेती करण्यासाठी घरच्याघरी मनुष्यबळ उपलब्ध व्हावं म्हणून अनेक मुले जन्माला घातली जात. त्याकाळी कुटुंबनियोजनाची साधने व त्याबाबतचे प्रबोधन योग्यरित्या न झाल्यानेही असे होत असेल कदाचित ! कुटुंबप्रमुखाला आपली मुलं कोणकोणत्या यत्तेत शिकताहेत हेही अनेकदा माहित नसे. पै-पाहुणे केव्हाही येत. मुवकाम ठोकत. कुटुंबप्रमुख ऐनवेळी कुणालाही जेवायला सोबत घेऊन येत असे. त्याचा व त्या आगंतुक पाहुण्यांचा शाब्दिक अथवा नजरेनेही निषेध न करता घरच्या महिला जेवण वाढायला घेत. अनेक निमशहरी भागातही दहा पंधरा वर्षापूर्वीपर्यंत चाळ सिस्टीमच्या घरांतून कुणीही कुणाच्याही घरात बिनदिवकतपणे जाई. घराचा मालकही त्याचे स्वागत करी. कुणीही कुणाच्याही घरातून जेवण, गरजेच्या वस्तू मागू शकत असे व ते मिळतही असे हे विशेष! हळूहळू ‘खासगीपणा हा खास असतो व आपल्याप्रमाणे इतरांचाही तो जपायचा असतो' याची जाणीव, भावना, भान सगळीकडे झिरपू लागले. खेडी स्वयंपूर्ण झाली की नाही हे माहित नाही; पण काही शहरी, निमशहरी, महानगरी कुटुंबे स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करु लागली व ‘आपले आपण पाहु या, इतरांची अजिबात लुडबुड आपल्या घरात नको'  अशी मानसिकता पहायला मिळू लागली. आता तर मोबाईलवर कॉल करतानाही समोरच्याला बोलायला वेळ आहे की नाही हे विचारुनच पुढचे संभाषण करावे की नाही याचा निर्णय घेतला जाऊ लागला.

   संभाषणावरुन आठवलं..माझ्यापेक्षा अधिक वर्षे वाशीकर असलेले ज्येष्ठ साहित्यिक व ‘चाफा बोलेना'  हे काव्य रचणाऱ्या कवी बी यांचे नातू अशोक गुप्ते यांनी कधीही मला फोन केला तर त्यांचा पहिला प्रश्न असा असतो की, ‘तुला बोलायला वेळ आहे ना रे बाबा!'  मग मी ‘बिनधास्त बोला' असे म्हटल्यावरच त्यांचे पुढील संभाषण सुरु होते. याबद्दल मी त्यांना सांगून टाकले की ‘पत्रकारिता पेशा एकदा निवडला की कामात असल्याची सबब सांगत राहणे चुकीचे आहे. अगदीच एखाद्या व्यासपीठावर आहे, मिटींगमध्ये आहे, जेथून मोबाईल कानाला लावत बोलणे केवळ अशक्य आहे ..तरच नंतर बोलु या असे सांगणे ठीक; अन्यथा पत्रकाराने येणाऱ्या कॉलला उत्तर दिले पाहिजे, किंवा थोड्या वेळाने बोलू म्हणून वेळ मागून घेतला पाहिजे, असे माझे स्पष्ट मत आहे.'  याउलट माझा एक ज्येष्ठ व पत्रकारितेतून जवळपास निवृत्त झालेला एक मित्र आहे. त्याला आपण कधीही कॉल केला तर तो त्याचेच चऱ्हाट लावत बसतो, ते सारे आपण पाच-दहा मिनिटे ऐकल्यावर मग तो सांगणार की,  ‘बोल..कशासाठी फोन केला होतास ?'  

   आता बोला!

   तसेच त्याने स्वतः कॉल केला तर त्याच्या मुला-सुनांचे कवतिक आधी ऐकवणार व मग यथावकाश विचारणार,..‘तुझे सगळे ठीक चालले आहे ना!'  तोवर आपल्या मनात जे बोलायचे असते ते विसरुन गेलेलो असतो आणि त्याच्या परिवारपुराणाने आपण पुरेसे पकलेले असतो. पत्रकारिता असो.. की अन्य कोणताही पेशा! तो ज्याने त्याने विचारपूर्वकच स्विकारलेला असतो. त्याला त्याचे फायदे, तोटे, लाभ, संभाव्य हानी, धोके हे सारे माहित असते. त्यामुळे एकदा त्या पेशात उतरले की कुरकुर करुन उपयोगाचे नसते. मी अनेकदा विचार करतो की देशाच्या सीमेवर, कडावयाच्या थंडीत किंवा अगदी वितळवून टाकील अशा उष्म्यात आपले सुरक्षा जवान तैनात असतातच की! त्यांनीही संरक्षण क्षेत्र निवडण्यापूर्वी आपल्याला कधीही, केव्हाही मृत्यु गाठेल, अपघात होईल, कायमचे किंवा तात्पुरते अपंगत्व येईल याचा विचार केलेला असणारच! एकदा निर्णय घेऊन तो अंमलात आणला की मग तेथून शवयतो कुणी यु टर्न घेत नसते.  

   तीच गोष्ट डॉक्टर, नर्स, पोलिस, अग्निशमन दल, समुद्रखाड्या-नद्या येथील जीवरक्षक, सर्पमित्र अशा विविध क्षेत्रात व्यस्त असणाऱ्या घटकांची! विख्यात हृदयविकार तज्ञ डॉक्टर नित्यनाथ अर्थात नितू मांडके यांनी आयुष्यभरात १० हजारांहुन लोकांच्या हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्या. याचा ताण त्यांच्या स्वतःच्याही हृदयावर झाला असणार. त्या ताणाची त्यांनाही कल्पना असणारच की! डॉ. मांडके यांनाही केवळ ५५ व्या वर्षी हृदयविकारानेच गाठले व त्यांची जीवनयात्रा संपली. पत्रकारितेत गेली अठ्ठावीस वर्षे व्यतीत करताना विविध पेशात व्यस्त असणाऱ्या अनेकांच्या मुलाखती घेण्याची, त्यांचे मनोगत जाणण्याची संधी मला मिळत असते. वाशी खाडीपुलावर येऊन खाली पाण्यात उडी मारत आत्महत्या करु पाहणाऱ्या जवळपास ४५ हुन अधिक व्यक्तींचे प्राण वाचवणाऱ्या वाशी गावच्याच रहिवासी मासेमार जीवरक्षक महेश सुतार याची मुलाखत त्याच खाडीपुलाखालील पाण्यामधील बोटीवर मी घेतली होती. त्याने सांगितले की,  ‘कोणत्याही वेळी पोलिसांचा मला फोन येतो. कधी मी खाडीमध्येच मासेमारी करत असतो, कधी घरी जेवत असतो, कधी परिवारासह कोणत्यातरी कार्यक्रमात गुंतलेला असतो. पण ते सारे सोडुन लगेच मी खाडीपुलाकडे धाव घेतो. या कामाचे कुणी पैसे देत नसते. उलट उन, वारा, थंडी, पाऊस यांची पर्वा न करता आपला जीव धोक्यात घालून पाण्यात उडी घ्यावी लागते. अनेकदा या आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींनी मारलेल्या उड्यांमुळे आम्ही खाडीत लावलेली मासेमारीची जाळीही तुटतात, नुकसान होते. खासगी जीवन म्हणूनही काही उरत नाही;  पण कुणाचेही प्राण वाचवणे हे ईश्वरी सेवेचे काम समजून मी करत असतो.'  

   १९९७-९८ पासून मी सर्पमैत्री, निसर्ग संरक्षण, पर्यावरण रक्षणासाठी झटणाऱ्या संस्थांशी निगडीत आहे. त्यांच्या कामाला शवय तेवढी प्रसिध्दी देण्यात व्यस्त आहे. हे करताना मी पाहिले की नवी मुंबईतील आबा रणवरे यांच्यासारख्या पर्यावरणप्रेमी व्यक्तीला त्यांच्याच परिसरातील अनेक अवलक्षणी लोकांनी हस्ते परहस्ते त्रास दिला, बदनामी केली. त्यांचे मनःस्वास्थ्य ढळेल यासाठी प्रयत्न केले... आणि इकडे आबा आपल्याला अवगत असलेली, वनस्पतींच्या औषधी गुणांवरुन आजारी, बाधित असणाऱ्या लोकांवर उपचार करुन त्यांना आराम पडू देण्याची आपला कला वापरात आणीत राहिले. हे करताना त्यांनी ‘मी आणि माझे कुटुंब, माझा खासगीपणा'  याचा गवगवा न करता त्या कामाला त्यांनी अग्रक्रम दिला. सर्पमित्रांची एक वेगळीच तऱ्हा! अनेक सर्पमित्रांना त्यांच्या घरुनही त्या कामासाठी पुरसे पाठबळ लाभत नसते. कारण? कधीही विषारी सापाचा दंश होऊन प्राण गमावण्याची भिती. अनेक सर्पमित्रांना विवाहासाठी जोडीदार मिळणे अवघड होते. कोणत्याही मुलीचा बाप असे धोकादायक काम करणाऱ्याला आपली कन्या देण्याची जोखीम घ्यायला तयार नसतो. कंपनीत कामावर असलेल्या सर्पमित्रांना कोणत्याही वेळी वस्तीत, अवतीभवती, शेतात कुणाला साप दिसला की बोलावणे येते. लग्नात, घरी, कुटुंबात सुखाचे क्षण व्यतित करताना, जेवतानाही कधी कधी ताटावरुन उठुन जावे लागते. सर्पमित्र आरामात जेवून, कार्यक्रम आटोपून येईल याची वाट बघत साप कधीही एका ठिकाणी थांबत नसतो. अनेक सर्पमित्र वन्यजीवप्रेमी हे जखमी, अपघातग्रस्त प्राणी, पक्षी यांचीही सूटका करुन त्यांच्यावर उपचारही करतात. व्यक्तीगत जीवनाचा, स्वतःच्या स्पेसचा, खासगीपणाचा काही वेळ का होईना.. त्याग करुन, त्यातून कोणतीही आर्थिक प्राप्ती होणार नाही हे माहित असूनही ही सारी मंडळी आपले सामाजिक दायित्व, बांधीलकी जपत असतात, सामाजिक त्रणातून उतराई होण्याचा आपल्या परीने प्रयत्न करीत असतात. या बद्दल त्यांना कोण किती पैसे देतं का, या हटके क्षेत्रात काम करत असल्याबद्दल सहानुभुती बाळगतं का, याचा जरा एकदा आपण साऱ्यांनी आपल्याच मनाशी विचार करुन अशा महानुभावांबद्दल नेहमी कृतज्ञता बाळगली पाहिजे. 

-राजेंद्र घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई.

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुशाफिरी