मुशाफिरी : निमित्त चोविसावे वर्ष 

निमित्त चोविसावे वर्ष    

बारा वर्षांना एक तप म्हणायचा प्रघात आहे. बारा या आकड्याला संख्याशास्त्रात मोठे महत्व आहे. घड्याळाच्या डायलवर बारा आकडे असतात. वर्षाला महिने बारा असतात. काही नकारात्मक घडले की ‘बारा वाजले' असे म्हटले जाते. खूप उशिर झाला ‘जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा' अशा आशयाचे गाणेही खूप गाजले हेही आपण पाहिले आहे. पूर्वीचे त्रषी-मुनी बारा-बारा वर्षे तप करायचे, असाही उल्लेख पुराणांमध्ये आढळून येईल. असे एक तप पूर्ण होऊन या स्तंभलेखमालेचा प्रवास दुसऱ्या तपाच्याही शेवटच्या वर्षाकडे सुरु झाला आहे.

नमनाला हे घडाभर नव्हे..पण चमचाभर तेल घालून प्रस्तावना देण्याचे कारण म्हणजे मुशाफिरी हे जे सदर तुम्ही वाचत आहात, त्याला गेल्या महिन्याच्या-नोव्हेंबरच्या शेवटच्या लेखाबरोबरच तेविस वर्षे पूर्ण झाली असून या आठवड्याचा  चोविसाव्या वर्षातील हा पहिला लेख तु्‌म्हा सुसंस्कारी, चोखंदळ, अभिरुचिसंपन्न वाचकांसमोर मांडण्यास मला अत्यानंद होत आहे. विसाव्या शतकातील १९९९ या वर्षातील नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी मुशाफिरी ही लेखमाला ‘आपलं नवे शहर' मधून सर्वप्रथम सुरु झाली. तेंव्हा मी ३६ वर्षांचा होतो. मोबाईल, टि्‌वटर, इन्स्टाग्राम, यु्‌ट्युब, समाजमाध्यमे, किंचाळणाऱ्या आवाजात गोंधळ घालत दिल्या जाणाऱ्या काही वृत्तवाहिन्यांवरील ‘ब्रेकिंग न्युज' यांचा जन्म व्हायचा होता. हस्तलिखित मजकूर वर्तमानपत्रांच्या कार्यालयात स्व-हस्ते, पोस्टाने, कुरियरने पोहचवणे किंवा फॅक्सने पाठवणे असे पर्याय अवलंबण्याचा तो काळ. त्या वेळी नवी मुंबईला ‘साप्ताहिकांची नवी मुंबई' असे म्हटले जाई. यातील अधिकाधिक साप्ताहिके ही वाशी सेक्टर १७ मधील बिग प्लॅश किंवा वाशी प्लाझा याच ठिकाणी एकवटलेली असत. मुंबईतील आघाडीच्या दैनिकांनी नवी मुंबईत हळुहळु शिरकाव करण्याचे ते दिवस. त्यानंतर मात्र बहुसंख्य बड्या मराठी, हिंदी, इंग्रजी दैनिकांनी नवी मुंबईत बस्तान हलवले. नवी मुंबईत आपापली कार्यालये, छापखाने थाटले व नवी मुंबईसाठी वेगळी पाने द्यायलाही सुरुवात केली.

   ठाणे-बेलापूर रोड याच मुख्य मार्गासाठी ओळखला जाणारा हा टापू वाशी खाडीपुलामुळे मुंबईशी जोडला गेला होताच. त्यात पाम बीच मार्गाची भर पडली. १९९२ साली मानखुर्दनंतर वाशीला पोहचलेली हार्बर रेल्वे मग सानपाडा, जुईनगर असे टप्पे गाठत पनवेलपर्यंत पोहचू पहात होती.  ठाणे-वाशी रेल्वेमार्गाचे काम सुरु झाले होते. १९९७ सालापासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा बोलबाला सुरु झाला होता. १९९९ च्या सुमारास महाराष्ट्रात काँग्रेस फोडून त्याच्या पोटातून राष्ट्रवादी काँग्रेस हा नवाच पक्ष जन्माला आला होता; पण सत्ता मिळवताना पुन्हा त्याच काँग्रेसशी निवडणुकीनंतर आघाडी करुन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासोबत छगन भुजबळ उपमुख्यमंत्री बनले होते. तर तिकडे दिल्लीत अटलबिहारी वाजपेयी हे अनेक पक्षांना एकत्र करुन पंतप्रधान बनले होते. असा तो सारा काळ. त्या काळात मुशाफिरी या लेखमालेला प्रारंभ झाला आणि अखंडपणे ही लेखमाला वाचकांसमोर येत राहिली.

   नवी मुंबईतील एका गावातील एका कुटुंबातील गणेशमूर्तीबाबतच्या विषयाला समोर ठेवून या लेखमालेचा श्रीगणेशा झाला होता. त्यानंतर मग कोणत्याही विषयासाठी, शब्दांसाठी कशावरही अवलंबून रहावे लागले नाही. विषय समोर येत राहिले, शब्द आपसूकच सुचत गेले, लेख आकाराला येत गेले. ते वाचून विविध वर्तमानपत्रांच्या कार्यालयांतून ‘आमच्याकडेही लिहा' अशा सूचना मिळत राहिल्या. या लेखमाले आधी दै. लोकसत्तेच्या ‘नवी मुंबई पुरवणी' त मुलखावेगळी माणसं, विक्रम वेताळ तर सायंदैनिक आपलं महानगर मधून इकडचं तिकडचं हे स्तंभलेख मी नियमित लिहित असे. मुशाफिरी या लेखमालेला कोणत्याही विषयाचे, आकारमानाचे, जातिधर्माचे बंधन नसल्याने मु्‌क्तहस्ते लिहिता आले. मधल्या काळात दैनिक महाराष्ट्र टाईम्स नवी मुंबई प्लस साठी पर्यटन, गावठाणे विषयक, दै. सकाळ टुडे साठी व्यवितमत्व व सोसायटी विषयक, दै. गावकरी व दै. पुण्यनगरी साठी विशेष मुलाखती अशी सदरे लिहिता आली. त्यावर माझे पुस्तकही तत्कालिन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या हस्ते प्रकाशित झाले. पण सातत्याने चोविसाव्या वर्षीही सुरु असलेल्या मुशाफिरीने दिलेले समाधान हे शब्दांच्या पलिकडले आहे.

   ‘दिवाळी अंकांपुरते लिहितात ते शाईने लिहीणारे..पण नित्यनेमाने, विविध प्रश्नांवर तसेच विविध विषयांवर लिहितात ते लेखक रवताने लिहित असतात' असे भाषाप्रभु व अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे भूतपूर्व अध्यक्ष पु.भा.भावे म्हणत असत. महाराष्ट्राचे एक माजी आमदार, पत्रकार, लेखक स्व. प्रमोद नवलकर यांनी ‘भटक्याची भ्रमंती' हे सदर दै. नवशवित मध्ये तब्बल ३६ वर्षे त्यांच्या मृत्युपर्यंत लिहिले. त्यांना जेंव्हा हृदयविकाराचा झटका आला त्याच्या केवळ काही अवधि आधीच त्यांनी भटक्याची भ्रमंती साठी लेख तयार केला होता. साप्ताहिकांच्या नवी मुंबईत २४ वर्षे सातत्याने चालवले जाणारे अन्य कोणते सदर माझ्या तरी माहितीत नाही. या लेखमालेने मला अत्युच्च दर्जाचा लेखनानंद दिला. आताची दैनिक वर्तमानपत्रे ही आकाराने आक्रसलेली आहेत. १९९९ व त्यापूर्वीच्या काळात ब्रॉडशिट पेपरही चांगला लांबरुंद असे, याचा पडताळा काही तत्कालिन वाचक देतील. या लिखाणाने वाचकवर्गात भर तर पडलीच; पण वाचकांचे रुपांतर मित्रांमध्येही अलगद होऊन गेले. अनेक संस्था, संघटना, मंडळे, युनियन चालवणारी व्यक्तिमत्वे, समाजसेवक, राजकीय प्रभावशाली व्यक्तिमत्वे, आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय-राज्यस्तरीय गाजलेले खेळाडू, डॉक्टर-प्राचार्य, साहित्यिक, समीक्षक, कलावंत, रंगकर्मी, जादुगार अशा विविध लोकांपर्यंत हे लिखाण जात राहिले, त्यांच्याही पसंतीची पावती मिळत राहिली. मग ‘करलो दुनिया मुठ्ठीमे' पाठोपाठ स्मार्ट फोन अवतरले. समाजमाध्यमांचे आगमन झाले व वृत्तपत्रसृष्टीनेही कात टाकली. डिजिटल अंक, बोलणारा अंक, जेपीजी ईमेज, पीडीएफ ईमेज, फेसबुक-युट्युब वरील लाईव्ह पोस्टस-मुलाखती-क्लिप्स-रील्स यांच्यामुळे माहिती तंत्रज्ञानाचा विस्फोटच झाला व सारे जग आपल्या दारातच नव्हे, तर जणू दिवाणखान्यातच येऊन बसले. ‘स्थानिक वर्तमानपत्र', ‘विशिष्ट भागात स्टॉलवरच उपलब्ध असणारा अंक' या कल्पना बाजूला पडल्या. स्थानिक अंक हे व्हाट्‌सअपमुळे जिल्हा, राज्य, देशाच्या सिमा ओलांडून जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही वाचले जाण्याची सोय झाली. त्यांचा वाचकवर्ग विस्तारला.

   मुशाफिरी स्तंभासाठी लिखाण करताना या साऱ्या स्थित्यंतरांचा साक्षीदार मला होता आले. त्यामुळ मराठी जिथे जिथे वाचली जाते अशा कोणत्याही भागातील वाचकांपर्यंत मुशाफिरीही अलगद जाऊन पोहचू शकली. समाजमाध्यमांचा कुणीही कितीही तिरस्कार केला तरी त्यांची बलस्थाने दुर्लक्षून चालणार नाहीच. या तेविस वर्षांच्या काळात मुशाफिरीतील निवडक लेखांवर एकवीस पुस्तके अंध विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीत मंडणगड-रत्नागिरी येथील स्नेहज्योती अंधशाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा प्रणव सेनगुप्ता यांच्यामुळे रुपांतरीत झाली. बावीसावे व तेविसावे पुस्तक तयार आहे. चोवीसाव्या आणि पंचविसाव्या पुस्तकासाठीच्या लेखांची निवड करणे सुरु आहे. या स्तंभलेखमालेतील विविध लेख विविध समाजमाध्यमांवर व्यापक वाचक वर्ग मिळवताहेत. पेपरमधील लेख कुणी वाचला ते ती व्यक्ती थेट बोलून किंवा पत्र, ईमेल पाठवून सांगत नाही तोवर समजत नाही. व्हाट्‌सअप-फेसबुकमुळे मात्र वाचकांशी थेटच संवाद होत असल्याने त्यांचा अभिप्रायही मिळतो, समजतो, वाचकसंख्येचाही अदमास लाईक, शेअर, कमेंटवरुन येतो.

   या सर्व काळात मुशाफिरी लिहिताना तसेच विविध मुलाखती घेताना पुस्तके, वर्तमानपत्रे, बातम्या वाचण्यासोबतच माणसे वाचण्याची सवय होऊन गेली. मानसशास्त्राचा पदवीधर असल्याने ही माणसे पारखूनही घेता आली. बिटविन दि लाईन्स, मौनातले, अव्यक्त, न बोललेले, बोलायचे असून बोलायचे राहिलेले अशा प्रकारच्या लोकांचे वर्तन समजून घेता आले. पत्रकारिता आणि ललित लेखन अशा दोन्ही क्षेत्रात मला आवडते असणाऱ्या स्व. माधव यशवंत गडकरी, स्व. प्रमोद नवलकर, उत्तम कांबळे व तत्सम प्रभावशाली भटक्या-फिरस्ती पत्रकार-ललितलेखक मंडळींच्या पाऊलखुणा समोर ठेवून चालायचा प्रयत्न करता आला व त्या प्रयत्नांना चोखंदळ, अभिजात, संस्कारी वाचकांनी दिलेला भरघोस प्रतिसादही अनुभवता आला. त्याबद्दलची कृतज्ञ भावना आज मनात दाटली आहे. चोविसाव्या वर्षातील या लेखमालेसाठी अनुकुलता दर्शवणाऱ्या तमाम हितचिंतकांना धन्यवाद आणि येत्या आठवड्यापासून ही लेखमाला शनिवारऐवजी दर शुक्रवारच्या अंकातून प्रसिध्द केली जाईल याची नोंद घ्यावी अशी प्रेमळ सूचना.

 राजेंद्र घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई.

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुशाफिरी :