मुशाफिरी :

आपल्यापैकी...आणि त्यांच्यापैकी

सुसंवादापेक्षा वाद, वितंडवाद, दुःस्वास, तिरस्कार, असुया, द्वेष हेच जणू आता बहुतेकांचे व्यवच्छेदक लक्षण मानले जावे इथपर्यंत सध्या वातावरणात बिघडून गेल्याचा पडताळा ठायीठायी येत आहे. आपल्या या राष्ट्राला महान परंपरा आहे. आपले संत सांगून गेले की ‘हे विश्वचि माझे घर'. ‘वसुधैव कुटुंबकम' अशी आपली शिकवण. ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे' असे आपल्याला महाराष्ट्र माऊलीने सांगून ठेवले आहे. वातावरण बिघडून गेल्याचे म्हटले जातेय ते खरे...पण हे सारे आताच होत आहे का? तर तसे अजिबात नाही.

विश्वाचा विचार करता प्रेमाची शिकवण देणाऱ्या येशू ख्रिस्ताचा नाताळ आता याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येत आहे. पण प्रभू येशूला त्याच्या जीवंतपणी यमयातना देत हाल हाल करुन मारले. कुणी ? तर त्याच्याच धर्मबांधवांनी. संत ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांना ‘संन्याशांची मुले' म्हणून समाजाचा छळवाद सोसावा लागला. महाराष्ट्र माऊली साने गुरुजींना याच समाजाने त्रास दिल्याने त्यांनीही आपले जीवन अकाली संपवले. अंध व्यवितंसाठी लिपीचा शोध लावणारा फ्रेंच संशोधक लुईस ब्रेल याच्या संपूर्ण हयातील फ्रेंच सरकारने त्याच्या शोधाला मान्यता दिलीच नाही. त्याच्या निधनानंतर काही वर्षांनी त्याच्या या अनन्यसाधारण शोधाचे गोडवे गायिले गेले व मग सरकारला जाग आली व त्याच्या ब्रेल लिपीला मान्यता दिली गेली. आपल्या राज्यात प्रबोधनाची शिकवण देणाऱ्या अनेक समाजसुधारक, प्रबोधनकारी व्यक्तींच्या जीवंतपणीच प्रेतयात्रा काढण्यात आल्या. महिलांच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या जोतिराव फुले व सावित्रीबाई यांच्यावर शेणाचे गोळे फेकून मारणारेही आपल्याच समाजातले होते.

   एवढे सगळे असतानाही आपले आणि त्यांचे, आपल्यापैकी आणि त्यांच्यापैकी, हिंदु विरुध्द मुस्लिम, मराठी विरुध्द गुजराती-कानडी-दक्षिण भारतीय, मेघालयवाले विरुध्द आसामी, बिहारी विरुध्द बंगाली, देवभोळे-सश्रध्द विरुध्द अंधश्रध्दा निर्मुलनवाले, दारु पिणारे विरुध्द निर्व्यसनी, उच्चवर्णिय विरुध्द बहुजन समाज, आरक्षणवाले विरुध्द खुल्या गटातले, शाकाहारी विरुध्द मांसाहारी असे विविध प्रकारचे गट तट आहेत. मराठी लोकांत जातवार, धर्मवार, जिल्हावार, तालुकावार गटवारी नाही असेही समजू नये. आपल्या समाजाचा, तालुका-जिल्ह्याचा अभिमान बाळगण्यास, आपल्या माणसांना चांगलं म्हणण्यास कुणाची हरकत असण्याचं काहीच कारण नाही. पण हे करताना आपल्यातल्या नसलेल्यांना वाईट, दुय्यम, कमअस्सल समजणे हे मात्र अर्धवटपणाचंच लक्षण होय. साधा बाहेरच्या वॉर्डातला माणूस गल्लीतल्या निवडणुकीला उभा राहिला तरी तो परका आहे, असा प्रचार करायला मागेपुढे पाहिले जात नाही. माझ्याबाबतचा एक प्रसंग इथे नमूद करावासा वाटतो. मला जात, जिल्हा, भाषा अशा गटातटात विभागून घेणे आवडत नाही. सर्व भागातले, सर्व जातीतले, विविध प्रांतातले लोक त्यांच्या गुणांनुसार मला जवळचे, आपले वाटतात. नवी मुंबईच्या इवल्याशा साहित्य पसाऱ्यातही कसे हेवेदावे असतात, आपल्या पाठीमागे लोक कशा प्रकारचा तोकडा, संकुचित, गटबाजीयुक्त विचार करतात हेही काही वर्षांपूर्वी एका स्थानिक मित्राच्या माध्यमातून ध्यानात आले. जो तो आपापल्या परीने चाहते, हितचिंतक, वाचक मिळवतो, प्रसिध्दीस पावतो. माझा जन्म मुंबईचा, शिक्षण कल्याणमधील, पनवेल-उरण-अलिबाग-ठाणे- मुंबई परिसरात विविध नातेवाईक एकवटलेले. त्यामुळे या सर्वच भागात माझी उठबस व पायपीट खूप. नवी मुंबईतील एका स्थानिक मित्राने चारचौघात मला नावाजले. तर येथील एक स्थानिक साहित्यिक दुखावला. तो त्याला म्हणू लागला की अरे हा आपल्या ‘माती'चा नाही. बाहेरचा आहे. (मातीचा म्हणजे दिघा ते बेलापूर या पट्टयातला.) त्याचे कशाला कौतुक करतोस उगाचच?  

   मला हे माझ्या त्या मित्राने येऊन सांगितले म्हणून कळले.

   आणखी एक उदाहरण. माझ्या मालकीचे साप्ताहिक मला चौदा वर्षे अखंडितपणे चालवता आले. त्या काळात एका मित्राने ऐरोलीजवळच्या दिवा गावातील एका कोळी समाजाच्या पुढाऱ्याशी ओळख करुन दिली. त्यानंतर अनेकदा त्या पुढाऱ्याच्या विविध कार्यक्रमांना मी हजर राहुन प्रसिध्दी दिली, त्याच्या मुलाखती प्रसारीत केल्या. त्यामुळे खूष होऊन एका दिवाळी अंकासाठी त्या पुढाऱ्याने चांगली जाहिरातही त्याने देऊ करुन त्याचे बिलही लागलीच देऊन टाकले. (नंतरची काही बिले मात्र थकवली. तर ते असो! ) पण मला त्या पुढाऱ्याची दिवाळी अंकासाठी मिळालेली जाहिरात येथील स्थानिकाला रुचली नाही. त्याने त्या पुढाऱ्याला सांगितले की मी घरतांना तुमच्याकडे आणले आणि तुम्ही त्यांना थेट जाहिरात देऊन मोकळे झालात? मला विचारायला हवे होते.

   त्या पुढाऱ्याशी तोवर माझे चांगले संबंध प्रस्थापित झाल्याने त्याने हा संवाद मला लागलीच कळवला आणि त्यामुळे माणसे 'दिसतात' कशी व प्रत्यक्षात 'असतात' कशी याबद्दलच्या माझ्या ज्ञानात मौलिक भर पडली. आता कुणाला वाटेल की हे नवी मुंबईतील स्थानिकांची उणीदुणी काढणारे लिखाण आहे म्हणून. प्रत्यक्षात मात्र तसे नसून जवळचे वाटणारे लोक जवळचे असतातच असे नाही, आपले व परके असा भाव काही लोक कसा बाळगून असतात यावरील हे भाष्य आहे. नवी मुंबईच्या गेल्या सत्तावीस वर्षाच्या माझ्या वास्तव्यात मला   स्थानिक समाजाचा अत्यंत चांगला अनुभव आहे. नवी मुंबईचे आमदार व माजी मंत्री गणेशजी नाईक, आमदार सौ, मंदाताई म्हात्रे, आमदार रमेशजी पाटील, माजी खासदार संजीवजी नाईक, ज्ञानविकास शिक्षण संस्थेचे ॲड. पी. सी. पाटील, सौ जयश्री पाटील, आगरी कोळी युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष सी.ए. निलेश पाटील, सी.ए. मनोज म्हात्रे, सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांच्यासारख्या अनेकांशी तसेच येथील विविध राजकीय पक्षांचे वेळोवेळी नगरसेवकपद भूषवणारे अनेक स्थानिक भूमिपुत्र मान्यवर यांचा माझा निकटचा स्नेह राहिला आहे. नवी मुंबईत बाहेरुन आलेल्या हिंदु, मुस्लिम, ख्रिश्चन, बौध्द, शीख अशा विविध धर्मियांशी सौहार्दाचे संबंध मला ठेवता आले, त्यांच्या विचारमंचावर कधी पाहुणा, कधी अध्यक्ष, कधी वक्ता तर कधी पारितोषिक विजेता म्हणून वावरता आले ते मी कुणाबद्दल आपला, परका, स्थानिक, बाहेरचा असा भेदभाव न ठेवल्याने अशी माझी भावना आहे. १९८३ साली माझी धाकटी बहीण नवी मुंबईत नेरुळ गावात दिल्याने माझे नवी मुंबईशी नातेसंबंध जुळले व येणेजाणे वाढले.. आणि २०२१ साली मी नवी मुंबईच्या करावे गावातील मुलीला सून म्हणून स्विकारल्याने नवी मुंबईच्या म्हात्रे कुटुंबात एक मुलगी (बहीण) दिली व म्हात्रे कुटुंबातून एक मुलगी घरी आणली अशी रीतीने नातेसंबंध दृढ झाले.

त्यामुळे मग नवी मुंबई काय किंवा अन्य कोणत्याही ठिकाणचे आपला-परका, आपल्यापैकी-त्यांच्यापैकी असे दृष्टीकोन मात्र त्रासदायक वाटतात. नवी मुंबईत अनेकदा बाहेरच्यांना भाडोत्री, तर कल्याण-डोंबिवली तसेच रायगडमधील स्थानिकांना दख्खने अशा नावांनी ओळखले जाण्याची पध्दत आहे. नवी मुंबईत एकेकाळच्या ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्टयात शेकडो कारखाने होते. त्यात नवी मुंबईतील स्थानिक ग्रामस्थ नोकरी करुन आपला चरितार्थ चालवीत. मग हे रोजगार देणारे बाहेरचे, अमराठी कारखानदार आजही भाडोत्रीच की काय? आज परिस्थिती अशी आहे की नवी मुंबईतील अनेक कारखाने विविध कारणांनी वापी, बलसाडसह गुजरातमधील विविध ठिकाणी स्थलांतरीत झाले व त्या जागांवर आय टी पार्क्स, गृहसंकुले, व्यापारी संकुले, डी मार्ट, इन ऑर्बिट, रघुलिला, नेवसस यांसारखी मॉल्स तयार झाली, होत आहेत. तेथे नवी मुंबईकरांची आजची उच्चशिक्षित पिढी चांगल्या पॅकेजच्या नोकऱ्या करते. नोकऱ्या देणाऱ्या लोकांनाही भाडोत्री म्हणून हिणवणार का? शिवाय दख्खने हा काय प्रकार आहे? त्याचा उच्चार करताना दख्खने म्हणजे आक्रमक, हिंसक, भांडखोर अशा नकारात्मक छटा दर्शवल्या जातात. इतिहास असे सांगतो की परक्या  इंग्रजांविरुध्द व देशी सरकारविरोधातही सर्वाधिक आक्रमक आंदोलने रायगड जिल्ह्यात झाली. चरीचा संप, चिरनेरचा जंगल सत्याग्रह, १९८४ सालचे लोकनेते दि.बा.पाटीलसाहेबांचे सिडकोविरुध्दचे जमिनीला वाढीव भाव मिळवून देणारे उग्र आंदोलन हे त्यातीलच काही. सन्मा. दिबांच्या आंदोलनामुळे नवी मुंबई-उरण-पनवेलच्या जमिनमालकांना आजचे वैभव नजरेस पडले. लाभ मिळवून देणाऱ्यांशी कृतज्ञ रहावे की त्यांना दख्खने म्हणून हिणवावे? असो. प्रत्येक वेळी राजकारणीच तुम्हाला एकमेकांविरोधात झुंजवतात असे नसते. अनेकदा काही लोकही जवळच्यांना परके समजून वागवतात. हे परकेपण लवकर संपवण्याचा मोकळेपणा सर्वांच्या ठायी येवो हीच सदिच्छा!

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुशाफिरी : लग्नगाठी सैलावताहेत ?