मुशाफिरी

म्हातारपण म्हणजे...!

   ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांशी स्नेहाचे नाते ठेवले पाहिजे. ही मंडळी स्वतःसाठी कमी व समाजासाठी, इतरांसाठी अधिक जगली, जगताहेत. अपघाती, आकस्मिक, अकाली मृत्यु आला नाही तर तुमच्या आमच्यापैकी प्रत्येकाला या वृध्दावस्थेतून जायचे आहे, हे एकदा मनावर ठसवले की म्हातारपणाच्या कल्पनेने त्रास होत नाही.

   सदर मजकूर लिहायला घेत असताना ज्येष्ठ अभिनेते श्री विक्रम चंद्रकांत गोखले यांची प्रकृति अत्यवस्थ असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांवर येऊन थडकले होते. फुल खिले है गुलशन गुलशनफेम हसऱ्या निवेदिका, सुसंवादिका तबस्सुम गोविल यांनी नुकताच आपल्याला अलविदा केला. त्या आधी ज्येष्ठ पत्रकार व आमचे मित्र श्री लक्ष्मण राजे (मिरा-भाईंदर) यांनी जगाचा निरोप घेतला. त्याच्या काही दिवस आधी उरण येथील ज्येष्ठ लेखक श्री गजानन मोरेश्वर दर्णे यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. जन्माला आलेल्या प्रत्येकाला एक ना एक दिवस हे जग सोडायचे आहे. ते कोणत्या स्थितीत? हे जरी आपल्या हातात नसले तरी आपले व इतरांचे आयुष्य सुगंधित करुन जाणे, इतरांच्या उपयोगी पडणे, मदतीसाठी तत्पर असणे, अडल्या-नडलेल्यांना सहकार्य करणे एवढे तरी आपण निश्चित करु शकतो. ‘मरे एक त्याचा दुजा शोक वाहे अकस्मात तोही पुढे जात आहे', असे एक वचन आहे. म्हणजेच प्रत्येकासाठी मृत्यु हा अपरिहार्य, अटळ आहे व तोच शाश्वतही आहे.

   ज्येष्ठ नागरिकांना ‘देशाची संपत्ती' मानणारे काही देश व समाज आहेत. या ज्येष्ठांकडे अनेक पावसाळे पाहिल्याचा अनुभव असतो. विविध प्रसंग, अडचणी, समस्या, गुंतागुंतीचे प्रश्न त्यांनी पूर्वायुष्यात सोडवले असल्याने त्यांचा तो सारा अनुभव इतरांना मोठ्या प्रमाणावर उपयोगी पडू शकतो. यामुळे तरुण, युवा, मध्यमवयीनांची शक्ती, वेळ, पैसा यांची बचत होऊ शकते. आजमितीस म्हातारे असणाऱ्या अनेकांनी त्यांच्या उमेदीचा काळ हा आपल्या कुटुंबाच्या संगोपन, पालनपोषण, देखभालीसाठी दिला असतो. कुटुंबासाठी झिजता झिजता म्हातारपण कधी आलं हे त्यांचं त्यांनाही कळत नाही. हरहुन्नरी अभिनेते श्री दिलीप प्रभावळकर यांच्या ‘हसवाफसवी' या प्रयोगात त्यांनी सहा पात्रे सादर करुन मराठी नाट्यप्रेमींना उच्च प्रतिचा नाट्यानंद तर दिलाच; पण वयोवृध्दांकडे कसे मिश्किलपणे पहायला हवे, वयोवृध्द कसे आपली दुखणी-खुपणी विसरुन आयुष्य जगू पाहतात, याकडे पाहण्याची एक खेळकर दृष्टीही दिली. काही वर्षांपूर्वी गाजलेल्या ‘श्रीयुत गंगाधर टिपरे' या मालिकेतील त्यांनी साकारलेले ‘आबा' हे पात्र आठवा..म्हणजे मी काय सांगतोय हे अधिक नेटकेपणाने पटेल. मला माझ्या आईच्या आई-वडिलांना पाहता आले नाही. कारण माझ्या जन्मापूर्वीच त्यांनी हे जग सोडले होते. माझ्या वडिलांची आई-माझी आजी मला आठवते. काहीशी कडक स्वभावाची ती होती. तर आजोबा हे प्रेमळ होते. माझी टिंगल करण्यासाठी ते ‘राजा उंदरा' म्हणत.. मग मी लटक्या रागाने त्यांचे धोतर ओढले की, ‘नाही रे माझ्या राजेंद्रा' म्हणत कडेवर उचलून गालगुच्चा घेत हे मला अजून आठवते. त्यांचा मृत्यु झाला तेंव्हा मी सहावीत असेन. असे म्हणतात की नूतन बालकाला (म्हणजे नातवाला) आजोबाने उचलून घेतल्यावर ते नवजात बालक चूळबूळ करते, पायांची जलद हालचाल करते. या नातवाच्या ईवलाल्या पायाचा आजोबाच्या छातीला स्पर्श झाला की आजोबासाठी स्वर्गाचे दार खुले होते. अर्थात या साऱ्या समजुती आहेत. पण नातवंडे ही आजी-आजोबांसाठी जणू दुधावरची साय कशी असतात ते अधोरेखित करण्यासाठी हे पुरेसे आहे.

     आगरी-कोळी बोलीमध्ये म्हाताऱ्या माणसासाठी ‘डोकरा' तर म्हातारीसाठी ‘डोकरी' असा शब्द आहे. भारतीय सैन्यात ‘डोगरा रेजिमेण्ट' असते. या आगरी-कोळी म्हाताऱ्यांना त्यांच्याबद्दल बोललेले चटकन कळू नये म्हणून मग त्यांना ‘डोकरा रेजिमेण्ट' असेही मजेने संबोधले जाते. अनेक म्हातारे-म्हाताऱ्या या मिश्किल, दिलखुलास स्वभावासाठी,  क्रॅकिंग जोक करण्यासाठी, वाट्यालाआलेले जीवन रसरशीतपणे जगण्यासाठी, जीवनाचा भरभरुन आनंद घेण्यासाठी प्रसिध्द असतात. कंबर दुखतेय, सांधे आखडलेत, चालताना त्रास होतो, अन्न गिळवत नाही, मुलगा-सुन विचारत नाहीत असल्या कुरबुरी करताना ते दिसत नाहीत. ‘म्हातारपण म्हणजे कुत्तरपण' असे मी काही ज्येष्ठ नागरिकांना बोलताना ऐकले आहे. उतारवयात आजारपण येणे, अंथरुणात खितपत पडणे, देहधर्माचे भान नसणे, एकेक अवयव निकामी होत जाणे या साऱ्या बाबी आपल्या हातातल्या नाहीत. अनेक नशिबवंतांना  कोणताही आजार नसताना, हातीपायी धड अवस्थेत मृत्यु आल्याचेही मी पाहिले आहे. तर अनेकांना अनेक दिवस, अनेक महिने, काही वर्षे कोमामध्ये निश्चलावस्थेत काढावे लागतात. याचा पाप-पुण्य वगैरे मामल्याशी काही संबंध असेलच असे नाही. पण लोक सरळसरळ याला कर्म, कर्मफळ, करावे तसे भरावे टाईपची लेबले लावू पाहतात. मग नुकताच जन्माला आलेल्या नवजात बालकाच्या हृदयाला छिद्र असते, त्याचे डोळे निकामी असतात, काही बालके विविध अवयवांचा कॅन्सर घेऊन जन्माला येतात. त्यांचे काय? कर्मठ लोक त्याला ‘मागच्या जन्मीच्या कर्माचे फळ' असे म्हणायलाही मागेपुढे पहात नाहीत. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडीस, विख्यात अभिनेते प्राण यांची शेवटची काही वर्षे कोमातच गेली. श्वास सुरु होता म्हणून ते त्या काळात हयात होते असे म्हणायचे. अर्थात खूप चांगले नातलग त्यांना लाभल्यामुळे त्यांचा शेवट हा गोडच झाला. ‘याचसाठी केला होता अट्टाहास शेवटचा दीस गोड व्हावा' या सुभाषिताचा अर्थच हा आहे की आपले सारे जीवन इतके व्यवस्थित असावे की मृत्यु येतानाही चांगल्या अवस्थेत यावा व मरणाचा जणू सोहळा व्हावा.

   वयोमानपरत्वे व्यक्तिची पाहण्याची, ऐकण्याची क्षमता कमी होत जाते. लक्षात रहात नाही, विस्मृतीची अडचण त्रास देते. मला आठवते..काही वर्षांपूर्वी मी चालवत असलेल्या वार्तादीप साप्ताहिकाच्या कार्यालयात एक ज्येष्ठ गृहस्थ येत असत. ते बरेच काही सांगत. तरुणपणातील आठवणी वगैरे. पण आपण काही सांगायला गेलो की ‘आँँ ' म्हणून आपल्याकडे बघत.. आणि जे काही सांगायचे ते मोठ्या आवाजात बोलूनच सांगत. अशा व्यवतींना कमी ऐेकू येत असल्याने बाकीच्याही सगळ्यांनाच कमी ऐकू येते या समजुतीतून हे लोक मोठ्यानेच बोलतात. पु.ल.देशपांडे यांच्या ‘व्यक्ति आणि वल्ली' मध्ये ‘हंड्रेड पर्सेट पेस्तनकाका' हे पात्र आहे, ते याच जातकुळीतले. कमी ऐकू येणे आणि विस्मृती यांच्या समस्येमुळे अनेक ज्येष्ठ अनेकांना त्रासदायक वाटू शकतात. प्रारंभीच उल्लेख केलेले उरण येथील आकाशवाणी मान्यतप्राप्त ज्येष्ठ दिवंगत लेखक गजानन मोरेश्वर दर्णे यांचे मला वारंवार मला फोन येत व ते विचारत की कथा पाठवू का, म्हणून. ‘पाठवा' सांगितले तरी त्यांची कथा मला मिळत नसे. मग पुन्हा काही दिवसांनी फोन करुन कथा पाठवू का, अशी ते विचारणा करीत. हे सारे स्मृतिभंशामुळे होत असल्याचे माझ्या ध्यानात येई. श्री दर्णे यांच्यामुळेच माझा परिचय मंडणगड (रत्नागिरी) येथील स्नेहज्योती अंधशाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा प्रणव सेनगुप्ता यांच्याशी झाला नि मग या बाईंमुळे माझी आजवर एकविस पुस्तके अंध विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीत येऊ शकली याची कृतज्ञ जाणीव मला आहे. आता सौ. सेनगुप्ता यांचेही वय सत्तरीपार आहे. कामाच्या व्यापात त्यांनाही अनेकदा विसरायला होते व एकदा सांगून झालेले त्या मला पुन्हा पुन्हा केव्हाही फोन करुन अधिकारवाणीने सांगू पाहतात. मीही सारी कामे बाजूला ठेवून त्यांचे सगळे म्हणणे ऐकतो. वाशी येथील रहिवासी व आजमितीस वयाच्या आठ दशकांचा टप्पा ओलांडलेल्या लायन्स वलब सदस्या उषा तेंडुलकर यांच्याबद्दलही असाच अनुभव आहे. त्याही मला अधिकारवाणीने काही कामे सांगू पाहतात. मलाही यथाशक्ती ते करायला आवडते. ज्येष्ठ नागरिक संघाच्या विविध सदस्यांशी माझे स्नेहाचे नाते आहे. ही सारी मंडळी स्वतःसाठी कमी व समाजासाठी, इतरांसाठी अधिक जगली, जगताहेत. अपघाती, आकस्मिक, अकाली मृत्यु आला नाही तर तुमच्या आमच्यापैकी प्रत्येकाला या वृध्दावस्थेतून जायचे आहे, त्यातील समस्यांना तोंड द्यायचे आहे. ही अवस्था सर्वांसाठी अटळ आहे. आपले नवजात बालकपण, शिशु अवस्था आपल्या जन्मदात्या मातापित्यांनी सुकर, सुसह्य, सुगम, संरक्षित केली. आपले तारुण्य, उतारपणाकडील आयुष्य आपण आपल्या पध्दतीने जगलो.  वृध्दावस्था ही आपल्या मुलांच्या, नातवंडांच्या साथीने, मदतीने जाणार आहे. ती श्रीयुत गंगाधर टिपरे आबा यांच्याप्रमाणे आनंदाची, समाधानाची, कौटुंबिक जिव्हाळ्याची जाऊ द्यायची..की ‘खडूस म्हातारा/म्हातारी' अशी दूषणे ऐकत कंठायची, ते ज्याने त्याने आपल्या वर्तनाने निश्चित करायचे आहे. एक मात्र खरे की ताज्या फळांपेक्षा सुकी फळे अर्थात अक्रोड, बदाम, काजू अशा ड्राय फ्रुटसचे मोल नेहमीच अधिक असते व त्यांच्यामुळे आपले भरणपोषणही अधिक भक्कमपणे होते..एवढे लक्षात ठेवू या.

- (मुशाफिरी) राजेंद्र घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई.

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

थेट मंत्रालयातून