अक्षता म्हात्रे हिला न्याय द्या, नराधमांना फाशी द्या
नवी मुंबई/वाशीः अक्षता आगासकर-म्हात्रे या विवाहितेवर अत्याचार करुन तिची हत्या करणाऱ्या नराधमांना फाशी देण्याच्या मागणीसाठी नवी मुंबईमध्ये २८ जुलै रोजी आक्रोश लाँग मार्च काढण्यात आला. कोपरखैरणे मधील तीन टाकी येथून वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत शांततेत निघालेल्या या ‘आक्रोश मार्च'मध्ये हजाराेंच्या संख्येने नवी मुंबईकर नागरिक सहभागी झाले होते. ‘जस्टीस फॉर अक्षता'च्या घोषणा यावेळी करण्यात आल्या. काळ्याफिती लावून सदर घटनेचा निषेधही करण्यात आला.
आमदार गणेश नाईक, माजी खासदार राजन विचारे, संजीव नाईक, शिवसेना उपनेते विजय नाहटा, ‘भाजपा'चे नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, ‘काँग्रेस'चे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, ‘शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे गट'चे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, ‘राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार गट'चे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत, ‘मनसे'चे३ शहर अध्यक्ष गजानन काळे, महिला जिल्हाध्यक्षा सलुजा सुतार (शरदचंद्र पवार गट), माधुरी सुतार (भाजपा), पुनम पाटील (काँग्रेस), आदि सर्वपक्षीय नेत्यांनी, समाजातील प्रतिनिधींसह हजारो नवी मुंबईकरांनी अक्षता म्हात्रे हिला श्रध्दांजली अर्पण केली. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या सदर घटनेविरोधात प्रचंड आक्रोश, संताप आणि क्लेश यावेळी व्यक्त झाला.
आमच्या बहिणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीवर लटकवून माझ्या बहिणीला न्याय मिळावा, हीच इच्छा आहे. - कोमल आगास्कर, अक्षताची बहीण.
अक्षता अत्याचार- हत्या प्रकरणात जनतेमध्ये प्रचंड आक्रोश आहे. अक्षताला न्याय मिळवून देण्यासाठी सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा. त्याचबरोबर या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र देऊन चर्चा केली आहे. पोलीस महासंचालकाकडून नियुक्तीचे पत्र निघाल्यानंतर निकम सदर खटला हाताळणार आहेत. अक्षताला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व धर्माचे, जातीचे, पंथाचे लोक एकत्र आले आहेत. सर्वांच्या भावना तीव्र आहेत. अक्षताला न्याय मिळेपर्यंत आणि नराधमांना फाशी मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही. - आमदार गणेश नाईक.
घडलेली घटना निंदनीय आहे. फास्ट ट्रॅक कोर्टात देखील ६ महिन्यात निकाल लागलेला नाही. त्यामुळे मी विंनाती करतो की, निकाल देण्यासाठी वेळ निश्चित करुन त्यानुसार तातडीने निकाल द्यावा. अक्षताला न्याय द्यावा. -राजन विचारे, माजी खासदार-ठाणे.
मी पोलिसाना सांगितले होते. त्यांना सदर प्रकार निष्काळजीपणे घेऊ नयेत. त्याबाबत मुख्यमंत्र्यांना देखील अवगत केले आहे. त्यांनी तातडीने निती आयोगाची बैठक झाल्यावर उज्वल निकम लढा लढतील अशी घोषणा केली. -विजय नाहटा, उपनेते-शिवसेना शिंदे गट.
महिलांवर अन्याय होऊ नये, कौटुंबिक छळ होऊ नये. ते पुजारी नव्हते, ते राक्षस होते. आगरी-कोळी समाज धार्मिक असून त्यांची आस्था मंदिरावर आहे. त्यामुळे ती आस्था तुटता कमा नये. आरोपींना कठोर शासन व्हावे. - अनिल कौशिक, जिल्हाध्यक्ष-काँग्रेस.
राज्य सरकारला एकच विनंती आहे की, आपण घेतलेले निर्णय अंमलात आणा. आमच्या लाडक्या बहिणीला मुख्यमंत्र्यांनी न्याय मिळवून द्या. नवी मुंबई शांत प्रिय शहर आहे. अक्षताला न्याय मिळवून देण्यासाठी पक्षीय राजकारण बाजुला ठेवून आम्ही तत्परतेने लढ्यासाठी तयार आहोत. -चंद्रकांत पाटील- जिल्हाध्यक्ष-राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट.
आपण सर्वपक्षीय एकत्र येऊन अक्षताला न्याय देऊ शकतो. शांततापूर्ण वातावरणात आम्ही पायी आलो. जर पोलिसांनी न्याय दिला नाही तर, आम्ही या चौकातच न्याय मिळवून घेऊ. -नामदेव भगत, जिल्हाध्यक्ष-राष्ट्रवादी अजित पवार गट.