यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील आरोपी गुलबर्गा येथे जेरबंद

नवी मुंबई : उरण मधील यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील आरोपी दाऊद शेख याला नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कर्नाटक गुलबर्गा येथील अलर गावातून अटक केली आहे. मागील ५ दिवसांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र, पोलिसांनी त्याचा माग काढत अखेर ३० जुलै रोजी पहाटे डोंगराळ भागात लपून बसलेल्या दाऊद शेख याला ताब्यात घेतले. दाऊद शेख याने यशश्रीची हत्या केल्याची कबुली दिली असून त्याची अधिक चौकशी केल्यानंतर या हत्येमागचे कारण स्पष्ट होणार असल्याचे ‘नवी मुंबई'चे अपर पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) दिपक साकोरे यांनी सांगितले.  

उरणमध्ये राहणारी यशश्री शिंदे २५ जुलै रोजी दुपारी १.३०च्या सुमारास आपल्या घरातून बाहेर पडली होती. त्यानंतर ती आपल्या मैत्रीणीला भेटून तेथून ती दुपारी २.३०च्या सुमारास उरण रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघून गेली होती. यावेळी आरोपी दाऊद शेख याने तिला भेटण्यासाठी बोलावून घेतल्यानंतर दोघेही उरण रेल्वे स्टेशन जवळच्या झुडपांमध्ये भेटले होते. त्या ठिकाणी दोघांमध्ये वाद झाल्याने दाऊदने यशश्रीच्या पोटावर आणि पाठीवर हत्याराने वार करुन तिची हत्या करुन पलायन केले. यशश्री घरी न आल्याने तसेच तिचा फोन देखील बंद असल्याने तिच्या पालकांनी रात्री उशीरा उरण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.    

त्यानुसार पोलिसांकडून बेपत्ता यशश्रीचा शोध घेत असतानाच २६ जुलै रोजी सायंकाळी उरण रेल्वे स्थानकालगतच्या झुपडामध्ये लघुशंकेसाठी गेलेल्या व्यक्तीला यशश्रीचा मृतदेह आढळून आला. त्याने दिलेल्या माहितीनंतर उरण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन यशश्रीचा मृतदेह ताब्यात घेतला. यशश्रीच्या पाठीवर आणि पोटावरील जखमांवरुन तिची हत्या करण्यात आल्याचे आढळून आले. शवविच्छेदन अहवालात यशश्रीवर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचे आढळून आले आहे. सदर घटनेमुळे उरणसह संपूर्ण नवी मुंबईतील लोकांमध्ये रोष निर्माण झाला होता. तसेच यशश्रीची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात येत होती.

त्यानुसार उरण पोलिसांनी या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करुन फरार आरोपी दाऊद शेख याला पकडण्यासाठी ३ वेगवेगळे पथके रवाना करण्यात आले होते. त्याचप्रमाणे गुन्हे शाखेचे पथक देखील मागील पाच दिवसांपासून या आरोपीच्या मागावर होते. आरोपी दाऊद शेख कर्नाटकातील गुलबर्गा येथील अलर गावातील डोंगराळ भागात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती युनिटने त्याला ३० जुलै रोजी पहाटे ५ वाजता तेथील डोंगराळ भागातून ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत दाऊद शेख याने यशश्रीची हत्या केल्याचे कबूल केले आहे.  

मृत यशश्री आणि आरोपी दाऊद या दोघांमध्ये चांगली मैत्री असल्याचे त्यांच्यातील मोबाईल संभाषणावरुन निदर्शनास आले आहे. त्यामुळे २५ जुलै रोजी कर्नाटकातून उरणमध्ये आलेल्या दाऊद शेख याने यशश्रीला बोलवून घेतल्यानंतर ती त्याला भेटण्यासाठी गेली होती. त्यावेळी दोघे भेटल्यानंतर त्यांच्यामध्ये वाद झाला असावा, यातून त्याने हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, अद्याप आरोपीची चौकशी बाकी असल्यामुळे दाऊदने यशश्रीला का मारले? तेे स्पष्ट झाले नसल्याचे अपर पोलीस आयुक्त दिपक साकोरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.  

यशश्री आणि दाऊद दोघेही अनेक वर्षापासून उरणमध्ये राहत आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये जुनी ओळख होती. काही वर्षापूर्वी दाऊद शेख याच्यावर यशश्रीची छेडछाड केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात विनयभंग आणि पोक्सो कायद्याअंर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला अटक करुन त्याची जेलमध्ये रवानगी केली होती. ६-७ महिन्यानंतर जेलमधून सुटल्यानंतर दाऊद शेख कर्नाटक येथील आपल्या मुळ गावी गेला होता. मात्र, त्यानंतर दाऊद पुन्हा यशश्रीच्या संपर्कात आल्याचे या दोघांमधील मोबाईलवरील संभाषणावरुन दिसून आले आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

 यशश्री हत्या प्रकरण : लग्न करण्यास, बंगळुरुला येण्यास नकार दिल्याने यशश्रीची हत्या