सानपाडा सेक्टर-२१ मधील ७ अनधिकृत गोदामे निष्कासित
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका नेरुळ विभाग कार्यालय मार्फत सानपाडा सेक्टर-२१ मधील होल्डींग पाँड भागात उभारण्यात आलेली ७ अनधिकृत गोडाऊन निष्कासित करण्याची कारवाई करण्यात आली.
नवी मुंबई महापालिका बी विभाग नेरुळ कार्यक्षेत्रातील सानपाडा सेक्टर-२१ मधील भूखंड क्रमांक-१ अधिक २ए, नोड होल्डींग पाँडवर अतिक्रमण करुन अनधिकृत गोदाम उभारणाऱ्या बांधकाम धारकांना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगररचना अधिनियम, १९६६ मधील कलम ५३१(अ) अन्वये नोटीस बजाविण्यात आली होती. त्या नोटीसीची मुदत संपुष्टात येऊनही सदर अनधिकृत बांधकाम संबंधितांकडून स्वतःहून हटविले नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार महापालिका नेरुळ विभाग कार्यालय तर्फे धडक कारवाई करीत २३ जुलै रोजी सानपाडा सेक्टर-२१ मधील भूखंड क्रमांक-१ अधिक २ए, नोड होल्डींग पाँड या ठिकाणी उभारण्यात आलेल्या ७ अनधिकृत गोडाऊनवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईच्या माध्यमातून सदर भूखंड मोकळे करण्यात आले आहेत.
सदर कारवाई नवी मुंबई महापालिका उपआयुक्त (अतिक्रमण विभाग) डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेरुळ विभाग सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. अमोल पालवे यांच्या नियंत्रणाखाली महापालिका अतिक्रमण विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी सुरक्षारक्षक, स्थानिक पोलीस यांच्या सहयोगाने केली. या मोहीमेकरिता २० मजूर, १ मुकादम, १ गॅस कटर, २ जेसीबी आणि १ डंपर यांचा वापर करण्यात आला.
दरम्यान, महापालिका कार्यक्षेत्रातील होल्डींग पाँड भागात उभारण्यात आलेली अनधिकृत बांधकामे, गोदामे निष्कासित करण्याची कारवाई यापुढे अधिक तीव्र करण्यात येणार आहे, असे महापालिका उप आयुक्त (अतिक्रमण) डॉ. राहुल गेठे यांनी सांगितले.