यशश्री शिंदे हत्या प्रकरणी उरण शहरात निषेध रॅली

उरण : उरण मधील २२ वर्षीय  यशश्री शिंदे हिची अमानुषपणे हत्या करण्यात आली असून दाऊद शेख या आरोपीने यशश्रीची हत्या केल्याचे उघड झाले आहे. या हत्त्येप्रकरणी उरण मध्ये तणावाचे वातावरण पसरले असून याबद्दल २८ जुलै रोजी उरण शहरात निषेध रॅली काढण्यात आली.

आरोपीला फाशी झालीच पाहिजे या मागणीसाठी माजी आमदार मनोहर भोईर, शिवसेनेचे नरेश रहाळकर, ‘राष्ट्रवादी'च्या प्रदेश पदाधिकारी भावना घाणेकर, ‘शेकाप'च्या सीमा घरत, ‘मनसे'चे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, सामाजिक  कार्यकर्ते प्रकाश  कांबळे, ‘शिवसेना'चे संतोष ठाकूर, ‘आरपीआय'चे शिवाजी ठाकूर, संतोष पवार, ‘भाजपा'च्या सायली म्हात्रे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी-कार्यकर्ते तसेच अनेक महिला संघटनांचे पदाधिकारी-सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

उरण शहरातील महात्मा गांधी पुतळ्यापासून ‘निषेध रॅली'ला सुरुवात झाली. पुढे गणपती चौक, राजपाल नाका, पालवी हॉस्पिटल, उरण चारफाटा परत बाजारपेठ, राजपाल नाका, गांधी चौक आणि पुढे उरण तहसील-पोलीस स्टेशन येथे आंदोलनकर्त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारला. आरोपीने निघर्ृणपणे हत्या करुन कर्नाटक येथे पलायन केले आहे. पोलीस त्याच्या मागावर आहेत. लवकरच आरोपीला पकडून आणून कठोर शिक्षा केली जाईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

आरोपी दाऊद शेख याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. लवकरात लवकर आरोपीला शोधून आणा आणि या नराधमाला फाशी झालीच पाहिजे, अशी मागणी संतप्त जमावाने आमदार महेश बालदी यांच्याकडे केली.

दरम्यान, पोलीस कर्नाटक येथे गेले आहेत पोलिसांनी आरोपीला आयडेन्टीफाय केले आहे. कर्नाटक येथून आरोपीला पकडून आणायला वेळ लागणार आहे. पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले नाही तर ३१ जुलै रोजी निर्णय घेऊ २ ऑगस्ट रोजी बेमुदत बंद करु, असे आ. महेश बालदी यांनी जमावासमोर बोलताना सांगितले. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

अक्षता म्हात्रे हिला न्याय द्या, नराधमांना फाशी द्या