मारहाणीत १७ वर्षीय मुलाची हत्या  

नवी मुंबई  तुर्भे येथील सांमत विद्यालयासमोर ५ ते ६ अल्पवयीन मुलांच्या गटाने २ तरुणांना मारहाण केल्याने एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू तर दुसरा मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या हाणामारीच्या घटनेनंतर एपीएमसी पोलिसांनी हल्लेखोर अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, सदर हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून त्याचा तपास करण्यात येत आहे.  

या घटनेतील मृत झालेल्या मुलाचे नाव आदित्य बाबासाहेब भोसले (१७) असून जखमी झालेल्या दुसऱ्या मुलाचे नाव देवांग संदीप ठाकूर (१७) असे आहे. सदर दोघेही तुर्भे गावात राहण्यास असून ते शिक्षण घेत होते. १३ मार्च रोजी दुपारी दोघेही तुर्भे येथील सामंत विद्यालयाजवळ गेले होते. यावेळी तेथे आलेल्या इतर ५ ते ६ मुलांसोबत त्यांची वादावादी झाली. या वादाचे पर्यावसन भांडणात झाल्यानंतर त्या मुलांनी आदित्य आणि देवांग या दोघांना लाथाबुक्क्यांनी, लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या मारहाणीत दोघेही गंभीर जखमी झाले. या दोन्ही जखमी मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.  

मात्र, आदित्य भोसले याचा मृत्यू झाला. तर त्याचा मित्र देवागं ठाकूर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर एपीएमसी पोलिसांनी ५ ते ६ मुलांवर हत्येचा गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेतले आहे. या मुलांमध्ये नेमका कोणत्या कारणांवरुन वाद झाला स्पष्ट झालेले नाही. मात्र, तत्कालीन कारणावरुन वाद होऊन सदरची मारहाण झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. त्यानुसार पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे. 

 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

घरफोडया करणारा सराईत चोरटा पोलिसांच्या जाळ्यात