घरफोडया करणारा सराईत चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

नवी मुंबई : रबाळे पोलिसांनी रात्रीच्या सुमारास घरफोडी करणा-या अंकुश उत्तम ढगे (३९) या सराईत चोरटयाला ३६ तासात अटक करुन त्याने रबाळे व आजुबाजुच्या हद्दीत केलेले १२ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच या गुह्यातील तब्बल १२ लाख ३५ हजार रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागीने हस्तगत केले आहेत.  

घणसोलीतील संजय हाईट्स इमारतीत राहणारे रघुनाथ शेलार (४३) हे गत गत ९ मार्च रोजी खांदा कॉलनी येथील त्यांच्या नातेवाईकास भेटण्यासाठी गेले असताना अज्ञात चोरटयाने  रात्रीच्या सुमारास बंद असलेल्या त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडुन, कपाटातील लॉकर उचकटुन त्यातील २ लाख ३७ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेले होते. याबाबत रबाळे पोलीस ठाण्यात दुसऱया दिवशी गुन्हा दाखल झाल्यानंतर रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी दिपक खरात व त्यांच्या पथकाने तांत्रीक तपासाच्या आधारे या घरफोडीच्या गुह्यातील आरोपीचा शोध सुरु केला.  

यावेळी सदर घरफोडीच्या गुह्यातील आरोपी अंकुश ढगे हा घणसोली गावातील जिजामाता नगर मधील महालक्ष्मी अपार्टमेंटमध्ये राहत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडुन मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला घरफोडी करण्यासाठी वापरण्यात येणारे क्रु-ड्रायव्हर व एक लोखंडी क्रु पानासह शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे कौशल्यपुर्ण तपास केला असता त्याने घणसोली परिसरात अनेक ठिकाणी रात्रीच्या सुमारास घरफोडया करुन सोने चांदीचे दागीने चोरल्याचे व त्यातून मिळालेली रक्कम त्याच्या उदरनिर्वाहासाठी व मौजमजेसाठी खर्च केल्याची कबुली दिली. अधिक तपासात त्याने रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ घरफोडया केल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.  

(पंकज डहाणे पोलीस उपआयुक्त परिमंडळ-१)
रबाळे पोलिसांनी अटक केलेला सराईत चोरटा अंकुश उत्तम ढगे याने रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकुण १२ रात्रीचे घरफोडीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. या गुह्यातील १२ लाख 35 हजार रुपये किमंतीचे २० तोळे सोन्याचे दागिने व ५०० ग्रॅम चांदीचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. या आरोपीविरोधात यापुर्वी कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ११, रबाळे एमआयडीसी, आझाद नगर पोलीस ठाणे, कोन गाव पोलीस ठाणे तसेच एन.एम.जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी-१ असे एकुण १५ गुन्हे दाखल आहेत.  

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

धाराशिव भागात पत्नीची हत्या करुन फरार झालेल्या आरोपीला पनवेल मधुन अटक