नवी मुंबई सांस्कृतिक, कला, क्रीडा महोत्सव'ला उत्साहात प्रारंभ

नवी मुंबई : श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था आणि सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने सीबीडी येथील सुनील गावस्कर मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘नवी मुंबई सांस्कृतिक, कला, क्रीडा महोत्सव-२०२४'चा १९ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला. या ‘महोत्सव'चे उद्‌घाटन आयोजिका ‘श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था'च्या संस्थापक-अध्यक्षा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आले. तसेच ‘महोत्सव'ची सुरुवात महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाने करण्यात आली.

सालाबादप्रमाणे यावर्षीही श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था आणि सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नवी मुंबई सांस्कृतिक, कला, क्रीडा महोत्सव-२०२४'चे आयोजन करण्यात आलेले आहे. ‘श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था'च्या वतीने गेली २७ वर्षे समाजपयोगी, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्य, संगीत यासह विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. ‘नवी मुंबई सांस्कृतिक, कला, क्रीडा महोत्सव'च्या पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या महिलांचा उत्साह पाहून आनंद वाटत आहे, असे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

महिला आणि विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा. तसेच त्यांना एक व्यासपीठ तयार व्हावे या उद्देशाने ‘श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था'च्या माध्यमातून सदर कार्यक्रमाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. नवी मुंबईतील हजारो महिला या निमित्ताने एकत्र येऊन आपली कला सादर करतात. त्यामुळे कलाकारांना या ‘महोत्सव'च्या माध्यमातून एक व्यासपीठ निर्माण होते. विद्यार्थ्यांसाठी आणि महिलांसाठी विविध मनोरंजक स्पर्धा आयोजित करुन त्यांचे मनोबल वाढवले जाते, अशी माहिती आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी दिली.

‘नवी मुंबई सांस्कृतिक, कला, क्रीडा महोत्सव' अंतर्गत १० दिवस नवी मुंबईकरांसाठी विविध कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. विविध समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमांबरोबरच संस्कृतीदर्शक चित्र प्रदर्शन, खाद्य संस्कृती, भव्य फनफेअर असे या ‘महोत्सव'चे खास आकर्षण ठरणार आहे. तसेच येथील ग्रामसंस्कृती, लोककला आणि लोकपरंपरेचे जतन व्हावे. नवोदित कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देतानाच जुन्या जाणत्या कलावंतांचा गुणगौरव व्हावा. ग्रामसंस्कृती आणि नगर संस्कृती यांच्यामध्ये वैचारिक आदान-प्रदान व्हावे. सांप्रदायिक एकता आणि एकात्मता वृध्दींगत व्हावी, हाच उद्देश समोर ठेवून सदर ‘महोत्सव'चे आयोजन करण्यात येते. महोत्सव निःशुल्क असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि ‘महोत्सव'चा आनंद लुटावा, असे आवाहन आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केले आहे.

यावेळी आयुवत राजेश नार्वेकर, माजी महापौर जयवंत सुतार, माजी विरोधी पक्षनेते पंढरीनाथ पाटील, माजी विरोधी पक्षनेत्या सौ. सरोज पाटील, ‘पंजाबी कल्चरल वेल्फेअर असोसिएशन'चे अध्यक्ष कमल शर्मा यांनीही आपले मनोगत व्यवत केले.

याप्रसंगी माजी नगरसेवक दीपक पवार, अशोक गुरखे, डॉ. जयाजी नाथ, निलेश म्हात्रे, साबू डॅनियल, माजी नगरसेविका शुभांगी पाटील, माजी नगरसेविका शशिकला पाटील, डॉ. राजेश पाटील, माजी जिल्हाध्यक्ष सी. व्ही. रेड्डी, माजी परिवहन सदस्य काशिनाथ पाटील, बलबीर चौधरी, दत्ता घंगाळे, गोपाळ गायकवाड, विकास सोरटे, प्रताप भोसकर तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

महापालिका शाळांतील सुरक्षा रक्षकांचे तीन महिन्याचे वेतन थकीत