नवी मुंबई शहराला ‘हुक्का पार्लर'चे ग्रहण

अधिवेशन संपताच पुन्हा एकदा ‘हुक्का पार्लर' मधून धुराचे लोट?

वाशी : नवी मुंबई शहरातील अवैध व्यवसायांचा आवाज नुकताच नागपूर येथे ७ ते २० डिसेंबर २०२३ दरम्यान झालेल्या राज्य विधीमंडळ हिवाळी अधिवेशनात घुमला होता. तर ‘हुक्का पार्लर'चा प्रश्न अधिवेशनात येणार म्हणून नवी मुंबई शहरातील हुक्का पार्लर, पब आणि ऑर्केस्ट्रा बार यांवर पोलिसांनी अंकुश ठेवला होता. मात्र, राज्य विधीमंडळाचे अधिवेशनात संपताच नवी मुंबई शहरातील अवैध व्यवसायांवर घातलेली वेसण सैल केल्याने हुक्का पार्लर मधून धुरांचे लोट पुन्हा एकदा सुरु झाले आहेत.

नवी मुंबई शहराला ‘हुक्का पार्लर'चे ग्रहण लागले आहे. यात वाशी-तुर्भे मधील एपीएमसी परिसर आघाडीवर असून, या परिसरात आठ ते नऊ हुक्का पार्लर सुरु आहेत, अशी माहिती मिळत आहे. या ‘हुक्का पार्लर' मध्ये महाविद्यालयीन तरुण-तरुणी हुक्क्याच्या नशेच्या अधीन हात आहेत. मित्र-मैत्रिणींसोबत हुक्का ओढत धुरांचे लोट सोडणे तरुणांमध्ये फॅशन समजली जाऊ लागली आहे. याचाच पुरेपूर फायदा हुक्का पार्लर व्यावसायिकांकडून घेतला जात आहे. तरुण-तरुणांना आकर्षण ठरेल, अशी जाहिरातबाजी किंवा पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. त्यानुसार, मध्यरात्रीपर्यंत नवी मुंबई शहरातील हुक्का पार्लरमध्ये तरुणाई रमत आहे.तर हुक्का पार्लर सोबतच नवी मुंबई शहरात अंमली पदार्थ व्यवसाय, ऑर्केस्ट्रा बार तेजीत सुरु आहेत. याबाबत राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आवाज घुमला तर मागील पावसाळी अधिवेशनात देखील राज्यातील अवैध व्यवसायांचा मुद्दा गाजला होता. त्यावेळी नवी मुंबई पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चार बार चे परवाने निलंबित केले होते.मात्र आता देखील अधिवेशन  दरम्यान असे व्यवसाय बंद ठेवण्याचे गुप्त संदेश देण्यात आल्याची चर्चा होती. मात्र, अधिवेशन संपताच हुक्का पार्लर मधून धुरांचे लोट सोडणे पुन्हा एकदा सुरु झाले आहे. नुकतेच एपीएमसी मधील काही हुवका पार्लर मधून धुरांचे लोट सोडल्याचे समोर आले आहे.

नवी मुंबई परिसरातील हुक्का पार्लरवर पोलीस नजर ठेऊन असतात. त्यामुळे एपीएमसी मधील सेवंथ स्काय आणि एपीएमसी परिसरातील  इतर ‘हुक्का पार्लर'वर पोलिसांनी या आधीही कारवाया केल्या आहेत. त्यामुळे ज्या वेळी हुक्का पार्लर सुरु असतील त्यावेळी तक्रारदारांनी पोलिसांना त्याबाबत व्हिडिओ पाठवल्यास तात्काळ कारवाई करुन तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. - अजय शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक - एपीएमसी पोलीस ठाणे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून गत पाच वर्षात तब्बल ९५६५ व्यक्ती बेपत्ता