नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून गत पाच वर्षात तब्बल ९५६५ व्यक्ती बेपत्ता

अद्याप बेपत्ता असलेल्या १४८२ व्यक्तींचा शोध घेण्याचे नवी मुंबई पोलिसांसमोर आव्हान  

नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतुन २०१९ पासून नोव्हेंबर २०२३ या पाच वर्षाच्या कालावधीत एकूण ९५६५ व्यक्ती बेपत्ता झाल्याचे उघडकिस आले आहे. यात सर्वात जास्त ४४४३ महिलांची संख्या असून त्यांच्या खालोखाल ३५७७ पुरुष बेपत्ता झाले आहेत. त्याचप्रमाणे ११३७ मुली व ४०८ मुले देखील बेपत्ता झाले आहेत. २०१९ पासून अतापर्यंत बेपत्ता झालेल्या एकुण महिलांपैकी ३७३९ महिला तसेच २८७७ पुरुषांचा शोध लागला आहे. त्याचप्रमाणे १०८३ मुली व ३८७ मुलांचा देखील शोध लागला आहे. या आकडेवारीवरुन मागील पाच वर्षात नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतुन बेपत्ता झालेल्यापैकी ७०४ महिला, ७०० पुरुष, ५६ मुली व २२ मुले अशा एकुण १४८२ व्यक्तीचा शोध लागलेला नाही. हि अतिशय गंभीर बाब असून बेपत्ता असलेल्या या १४८२ व्यक्तींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान नवी मुंबई पोलीस दलासमोर आहे.

बेपत्ता झालेल्या लोकांमध्ये पुरुषांची टक्केवारी कमी तर तरुण, तरुणी व महिलांची संख्या मोठी आहे. बहुतांश तरुणी या युवकांच्या प्रेमात पडून आईवडिलांचे घर सोडून बाहेर पडत असल्याचे आढळून आले आहे. मात्र प्रियकाराकडून त्यांचा अपेक्षाभंग अथवा विश्वासघात झाल्यानंतर अनेक तरुणींना घरी परत जाणे कठीण होऊन जाते. अशा वेळी या तरुणी कायमचे आपल्या कुटुंबियांपासून दूरवर निघून जात असल्याच्या असंख्य घटना घडलेल्या आहेत. तर विवाहित महिला कौटुंबिक कलहातून घर सोडत असल्याची अनेक प्रकरणे तपासात समोर आली आहेत. परंतु एकदा का विवाहितेला तिची चूक लक्षात आली की, ती घरी परत आल्याची देखील असंख्य प्रकरणे आहेत. पोलिसांनी शोधून काढलेल्या बहुतेक प्रकरणांमध्ये महिलांची समस्या हीच दिसून आली आहे. तर तरुणीसुध्दा प्रेम प्रकरणात निघून गेल्याचे निदर्शनास आले आहे.  

त्याचप्रमाणे घरातील कोणाचा तरी राग आला म्हणून, परीक्षेत कमी गुण मिळाले-घरी सांगितल्यावर काय होईल, या भितीने अनेक लहान मुले-मुली घर सोडून जात असल्याचे अनेक प्रकरणात उघडकिस आले आहे. तर काही प्रकरणात शहराच्या मोहाने, कुठल्यातरी चित्रपटातील हिरोला अथवा क्रिकेटरला भेटण्याच्या ओढीनेही मुले मुली घर सोडत असल्याचे तसेच परतीचा मार्ग न सापडल्याने शहरात कुठेतरी भटकत असल्याचे आढळुन आले आहे. अशी असंख्य मुले-मुली रेल्वे स्थानकावर व शहरात आजही भटकताना निदर्शनास येतात.  

संकटग्रस्त लहान मुलांच्या मदतीसाठी कार्यरत असलेल्या चाईल्ड लाईन या संस्थेच्या कार्यकर्त्यांना अशा प्रकारे भटकलेली मुले मुली रेल्वे स्थानक व बस स्थानकात नियमित सापडत असतात. चाईल्ड लाईनच्या कार्यकर्त्यांकडून अशा मुलांचे समुपदेशन करण्यात येऊन त्यांना पुन्हा आपल्या घरी पाठविण्याची व्यवस्था केली जाते. बेपत्ता मुलांचे वाढते प्रमाण पाहता पोलिसांकडून विशेष मोहीमेद्वारे बेपत्ता झालेल्या मुला मुलींचा शोध घेण्यात येतो. या मोहीमेमुळे अनेक वर्षापासून आपल्या कुटुंबियापासून दुरावलेली शेकडो मुले मुली पोलिसांच्या हाती लागली आहेत.  

काही पोलिस अधिकाऱयांच्या म्हणण्यानुसार, कौटुंबिक वादातून अथवा अन्य कौटुंबिक कारणांमुळे घरातून निघून जाणाऱया १५ ते १७ वयोगटातील मुला-मुलींचे प्रमाण अधिक आहे. यातील निम्मे जण कालांतराने परत येत असल्याची उदाहरणे देखील आहेत. बेपत्ता होणाऱया मुला-मुलींच्या शोधासाठी विशेष प्रयत्न नेहमीच केले जातात. मात्र अनेक अल्पवयीन तरुणी हे प्रियकरांसोबत लग्न करुन नाव बदलून परराज्यात लपून राहत असल्याने त्यांचा शोध घेण्यात अनेक अडचणी येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.  

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून २०१९ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत बेपत्ता झालेल्या व सापडलेल्या व्यक्तींची आकडेवारी  

 

                               हरविलेले                                                                        सापडलेले 

   सन           स्त्री        पुरुष        मुली     मुले         एकुण                स्त्री         पुरुष      मुली       मुले        एकुण 

  २०१९         ९९८       ८३०          २४२      १००       २१७०                  ९१६        ७२४        २४१      १००         १९८१ 

  २०२०          ७१६       ५१८         १४४      ५८         १४३६                  ६३३        ४३६         १४३      ५६          १२६८ 

  २०२१         ८७६       ७००          २४०      ४९         १८६५                  ७३२        ५६६         २३७      ४६         १५८१ 

  २०२२         ९१२      ७९३           २४८      ९९          २०५२                  ७२६       ६१०         २३३       ९१        १६६० 

  २०२३         ९४१      ७३६           २६३      १०२        २०४२                  ७३२       ५४१         २२९       ९४          १५९६ 

   एकूण       ४४४३    ३५७७          ११३७    ४०८        ९५६५                 ३७३९      २८७७       १०८३     ३८७        ८०८६ 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

थर्टीफस्ट, नववर्ष स्वागतः नवी मुंबई पोलीस अलर्ट