‘सीसीटीएनएस' रँकींगमध्ये नवी मुंबई पोलीस राज्यात प्रथम  

पोलीस आयुवत मिलिंद भारंबे यांच्याकडून सर्व अधिकारी, महिला अंमलदारांचा सत्कार

नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस दलाने ‘सीसीटीएनएस'च्या माध्यमातून एफआयआर नोंदणी करण्यापासून ते अन्वेषण तसेच चार्जशीट आणि त्यासंबंधित असलेले सर्व कामकाज ऑनलाईन पध्दतीने हाताळल्याने नवी मुंबई पोलीस आयुक्तालय ‘सीसीटीएनएस'च्या रँकींगमध्ये पहिल्या क्रमांकावर आले आहे. डिसेंबर २०२२ मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालय ‘सीसीटीएनएस'मध्ये ३६ व्या क्रमांकावर होते. दरम्यान, सदर कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे आणि अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दिपक साकोरे यांनी ‘सीसीटीएनएस'चे कामकाज करणाऱ्या नवी मुंबई पोलीस दलातील सर्व अधिकारी आणि पोलीस ठाण्यातील महिला अंमलदारांचा प्रशस्तीपत्रक देवून सत्कार केला आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार स्विकारल्यानंतर पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी नवी मुंबई पोलीस दलाला शिस्त लावण्याबरोबरच पोलीस दलाचे सर्व कामकाज ऑनलाईन करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी त्यांनी सीसीटीएनएस कार्यप्रणालीतील कामकाजात सुधारणा करुन सर्व कामकाज ऑनलाईन करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने पोलीस दलाचे कामकाज ऑनलाईन करण्याकरिता राबविण्यात येणाऱ्या सीसीटीएनएस यंत्रणेत एफआयआर नोंदणी पासून ते अन्वेषण तसेच चार्जशीट आणि त्यासंबधीत सर्व कामकाज ऑनलाईन पध्दतीने हाताळण्यास सुरुवात केली आहे.  

राज्यातील संपूर्ण पोलीस यंत्रणेचे कामकाज ऑनलाईन करण्यात आल्याने राज्यातील प्रत्येक पोलीस दलाला सीसीटीएनएस कार्यप्रणालीतील १ ते २१ फॉर्ममध्ये माहिती भरावी लागत आहे. यात एफआयआर, घटनास्थळ पंचनामा, अटक आरोपी, मालमत्ता जप्ती, चार्जशीट, शिक्षा, अपिल तसेच इतर माहितीचा समावेश आहे. नवी मुंबई पोलीस दलाने यातील महत्वाचे ७ फॉर्म १०० टक्के भरण्याबरोबरच सीसीटीएनएस प्रणाली अंतर्गत असलेल्या सीआरआय, एमएसी पोर्टल, आसीजेसी पोर्टल, आयटीएसएसओ पोर्टल या महत्वाच्या पोर्टलचा सुध्दा सुयोग्य पध्दतीने वापर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पोलीस दलाच्या कामकाजात सुसुत्रता आल्याने वाहन चोरी संबंधित गुन्हे, आरोपींचा पूर्व इतिहास, महिला-बालकांसंबधित असलेले गुन्हे हाताळण्यास सुलभ होऊन त्याचा विविध गुन्ह्यांच्या तपासात आणि त्यासंबधित गुन्हे निकाली काढण्यास मदत होत आहे.  

दरम्यान, गुन्हे अन्वेषण विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांकडून प्रत्येक महिन्याला ‘सीसीटीएनएस'ची रॅँकींग जाहिर करण्यात येते. त्यानुसार डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या रँकींगमध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालय ३६ व्या क्रमांकावर होते. मात्र, पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दिपक साकोरे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमित काळे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन राठोड यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार सीसीटीएनएस कक्षाच्या प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सुवर्णा राऊत आणि त्यांच्या टीमने चांगली कामगिरी केल्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय सीसीटीएनएस कामकाजात प्रथक क्रमांक मिळवण्यात यशस्वी झाले आहे. त्यामुळे या संपूर्ण टीमचे पोलीस दलातून अभिनंदन करण्यात येत आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

लोकलमधील तरुणीच्या हातातील मोबाईल फोन खेचणारा लुटारु अखेर जेरबंद