लोकलमधील तरुणीच्या हातातील मोबाईल फोन खेचणारा लुटारु अखेर जेरबंद  

लुटारुला पकण्याच्या प्रयत्नात फलाटावर उडी मारणारी तरुणी झाली होती जखमी  

नवी मुंबई : मोबाईल फोन खेचुन पळणाऱ्या लुटारुला पकडण्यासाठी धावत्या लोकलमधून फलाटावर उडी टाकल्यामुळे काजल चंदनशिवे ही तरुणी जखमी झाल्याची घटना गत आठवडयात घणसोली रेल्वे स्थानकात घडली होती. याच घटनेतील आरोपी चांद अब्दुल शेख (28) याला एपीएमसी पोलिसांनी सोमवारी रात्री ग्रीन पार्क झोपडपट्टीतून अटक केली आहे. या लुटारुने हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील लोकलमध्ये मोबाईल फोन चोरीसह जबरी चोरीचे एकुण चार गुन्हे केल्याचे तपासात आढळुन आले आहे. या लुटारुला पुढील कारवाईसाठी वाशी रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.  

या घटनेत जखमी काजल चंदनशिवे (24) ही तरुणी वाशीतील जुहूगावात राहण्यास असून ती मुलुंड येथील आयटी कंपनीत कामाला आहे. गत 4 डिसेंबर रोजी काजल नेहमीप्रमाणे कामावरुन सुटल्यानंतर रात्री पावणे नऊच्या ठाणे वाशी लोकलमधील महिलांच्या डब्यामधुन प्रवास करत होती. सदर लोकल घणसोली रेल्वे स्थानकात येऊन कोपरखैरणेच्या दिशेने निघाली असताना, आरोपी चांद अब्दुल शेख याने लोकलच्या डब्यात चढुन काजलच्या हातातील मोबाईल फोन खेचुन धावत्या लोकलमधुन फलाटावर उडी टाकून पलायन केले होते. यावेळी काजलने देखील सदर लुटारुला पकडण्यासाठी धावत्या लोकलमधून फलाटावर उडी मारली होती. मात्र तिचा तोल गेल्याने ती फलाटावर पडून जखमी झाली होती.
 त्यावेळी रेल्वे स्थानकावर डयुटीवर असलेल्या पोलीस व प्रवाशांनी काजलला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले होते. या घटनेनंतर वाशी रेल्वे पोलिसांनी अज्ञात लुटारु विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करुन सीसीटिव्ही फूटेजवरुन मिळालेल्या वर्णनावरुन त्याचा शोध सुरु केला होता. त्यासाठी रेल्वे पोलिसांनी दोन वेगवेगळी पथके देखील तयार केली होती. सदरची घटना ही संवेदनशील असल्याने रेल्वे पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज व्हायरल करण्यात आले होते. त्यावरुन एपीएमसी पोलिसांकडून देखील या घटनेतील आरोपीचा शोध घेण्यात येत होता. या तपासादरम्यान, सदर गुह्यातील आरोपी हा एपीएमसी मार्केटमधील ग्रीन पार्क येथील झोपडपट्टीत राहणा-या त्याच्या आईला भेटण्यासाठी  येणार असल्याची माहिती एपीएमसी पोलिसांना मिळाली होती.  

त्यानुसार एपीएमसी पोलीस स्टेशनमधील गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार महाडिक, पोलीस हवालदार चंद्रकांत कदम, कदम, बोराटे, पोलीस नाईक काळे, पोलीस शिपाई पाटोळे, भिलारे, वाटकर आदींच्या पथकाने सोमवारी रात्री चांद अब्दुल शेख हा ग्रीनपार्क झोपडपट्टीत आला असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले. या आरोपीकडे अधिक चौकशी केली असता, त्याने वाशी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 मोबाईल चोरीचे तसेच इतर 2 असे एकुण 4 गुन्हे केल्याचे तपासात आढळुन आले आहे.  

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

तुर्भे वाहतूक शाखेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती