नायजेरियन सायबर गुन्हेगार दिल्लीत जेरबंद

पनवेल पोलिसांच्या धाडसी कारवाईचे रामशेठ ठाकूर, आ. प्रशांत ठाकूर यांच्याकडून कौतुक

पनवेल : अत्यंत गुंतागुंतीच्या सायबर गुन्ह्याची शिताफीने आणि धाडसाने उकल करत ६ नायजेरियन सायबर गुन्हेगारांना दिल्लीतून जेरबंद करणाऱ्या पनवेल पोलिसांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी अभिनंदन केले.

दरम्यान, लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, उमेश इनामदार, प्रसाद हनुमंते, आदिंनी पनवेल शहर पोलिसांचे कौतुक केले आहे.

सोशल मिडीयाच्या माध्यमातून ओळख करत भेटवस्तुच्या आमिषाने एक महिन्यापूर्वी पनवेल मधील एका महिलेची तब्बल ३ लाख २५ हजार ५०० रुपयांची ऑनलाईन पध्दतीने नायजेरिन सायबर गुन्हेगारांकडून आर्थिक फसवणूक झाली होती. त्या अनुषंगाने या गुन्ह्याची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलीस तपास यंत्रणा कार्यान्वित केली.

ऑनलाईन सायबर गुन्हा असल्याने त्या संदर्भात योग्य तपास दिशा मिळण्यासाठी सायबर तज्ञांची मदत घेण्यात आली.  सायबर गुन्हेगार तांत्रिकदृष्ट्या अनेक आधुनिक उपकरणांची मदत घेऊन लोकांची आर्थिक फसवणूक करत असतात. त्यामुळे सायबर गुन्हेगारांना जेरबंद करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितीन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली व्युहरचना आखण्यात आली. १८ पोलीस आणि सायबर तज्ञ अशी टीम बनविण्यात आली. तपासाच्या अनुषंगाने गुन्हेगारांचे केंद्र दिल्ली जवळ असल्याचे या टीमच्या निदर्शनास आले. त्यानुसार गुन्हेगारांना पकडण्यासाठी पनवेल येथून दिल्लीला टीम रवाना झाली. त्यांनी तब्बल दहा दिवस दिल्लीमध्ये शोध मोहीम घेतली.

सायबर गुन्हेगार हत्यारांचा वापर करणारे असल्याची शक्यता दाट असते. त्यामुळे त्याची दक्षता घेणे गरजेचे असते. त्या अनुषंगाने पोलिसांच्या टीमने तपास यंत्रणेला आपल्या चाणाक्ष्य बुध्दीने वेग दिला आणि मोठे धाडस करुन ६ आरोपींना अटक केली. विशेष म्हणजे सदर आरोपी सर्व नायजेरियन निघाले. पोलिसांच्या या टीमने केलेल्या कारवाईने सराईत सायबर गुन्हेगार तर जेरबंद झालेच; त्याचबरोबर पोलिसांनी केलेल्या या धाडसी कामगिरीने पनवेल पोलिसांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्याबद्दल लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नितीन ठाकरे आणि त्यांच्या टीमचे विशेष कौतुक केले.

 फसवणूक झालेल्या महिलेने दिलेल्या माहितीनुसार १० ऑगस्ट २०२३ रोजी फेसबुकवर अतुल कुमार या नावाने अनोळखी व्यक्तीकडून आलेली फ्रेंड रिक्वेस्ट मान्य केली. त्यांनतर सोशल मिडीयातून संपर्क वाढल्यानंतर अतुल कुमार याने आपली पत्नी कोव्हीडमध्ये मयत झाली असून आठ वर्षाची मुलगी असल्याचे सांगितले. दरम्यान, युके देशातील नंबर वरुन त्याने व्हॉटस्‌ॲप वर चॅटींग सुरु केले. त्यानंतर मैत्रीबद्दल भेटवस्तू पाठवत असल्याचे सांगितले. मात्र, त्याला नकार दिले होते. तरीही त्याने व्यक्तीने तगादा लावला. त्यामुळे भेटवस्तू द्यायची असल्यास फक्त छोटीशी पर्स पाठविण्याबाबत कळविले. त्यावेळी त्याने माझा पत्ता घेऊन भेटवस्तू पाठवत आल्याचे सांगितले. थोड्यावेळाने एक पार्सल बॉक्स मध्ये आणि एक पावतीचा फोटो व्हॉटस्‌ॲपवर पाठविला. त्यामध्ये सोने, युके करन्सी, आयफोन, परपयुम्स आणि चॉकलेट दिसत होते. त्यानंतर त्या व्यक्तीने पार्सलसाठी कस्टम क्लिअरन्स फी म्हणून २५ हजार रुपये भरण्यास सांगून युके करन्सी रुपयांमध्ये ट्रान्सफर करून घे, असे सांगितले. मात्र, त्या दिवशी मी ते पैसे भरले नाहीत. त्यानंतर २३ सप्टेंबर २०२३ रोजी एका महिलेने आपण इंदिरा गांधी विमानतळावरुन बोलत असल्याचे सांगून तुमचे युके वरून पार्सल कस्टम क्लिअरिंग फी साठी बाकी असल्याचे सांगितले. त्यामुळे मी २५ हजार रुपये क्लेअरिंग फी म्हणून तिने दिलेल्या बँक खात्यावर जमा केले. त्यानंतर पुन्हा एकदा त्या महिलेने पार्सल स्कॅनिंगमध्ये युके करन्सी असल्याने त्यासाठी १ लाख रुपये क्लिअरन्स फी भरावे लागतील, असे सांगितले. अशा प्रकारे वेगवेगळ्या क्लुप्त्या करत एकूण ३ लाख २५ हजार ५०० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पोलिसांनी केलेल्या तपास कारवाईमुळे त्यांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

नियमांचे उल्लंघन; ऑर्केस्ट्रा बारवर कारवाईचा बडगा