नियमांचे उल्लंघन; ऑर्केस्ट्रा बारवर कारवाईचा बडगा  

पनवेल मधील क्रेझी बॉईज बारचा परवाना रद्द  

नवी मुंबई :ऑर्केस्ट्राच्या नावाखाली छुपे डान्स बार चालवत असलेल्या ऑर्केस्ट्रा बारवर नवी मुंबई पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. नवी मुंबई पोलिसांनी परवान्याचे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पनवेल मधील क्रेझी बॉईज रेस्टॉरंट ॲन्ड ऑर्केस्ट्रा बारचा परवाना रद्द केला आहे. त्यामुळे नियम धाब्यावर बसवून बार चालविणाऱ्या नवी मुंबईतील बार चालकांचे धाबे दणाणले आहेत.  

नवी मुंबईतील ऑर्केस्ट्रा बार फक्त गाण्यांपुरतेच मर्यादित न राहता त्यात अश्लिल नाच-गाण्यांचा आणि नोटा उडवण्याचे प्रकार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक बार विहीत वेळेपेक्षा अधिक वेळ चालविण्यात येत असल्याचे तसेच बारचे प्रवेशद्वार बाहेरुन बंद असले तरी बारच्या आतमध्ये बिनबोभाटपणे महिला वेटर्सचे अश्लिल चाळे सुरु असल्याचे पोलिसांनी वेळोवेळी केलेल्या कारवाईमध्ये निदर्शनास आले आहे. नवी मुंबईतील अनेक ऑर्केस्ट्रा बारमध्ये नियम धाब्यावर बसवून ते बिनबोभाट चालविण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सर्व पोलीस ठाण्यांना आपापल्या हद्दीतील बारची तपासणी करुन त्यात गैरप्रकार होत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे सक्त आदेश दिले आहेत.  

त्यामुळे ऑर्केस्ट्राच्या नावाखाली छुपे डान्सबार चालवत असलेल्या शहरातील ऑर्केस्ट्रा बारवर नवी मुंबई पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी आयुक्तालयाच्या हद्दीतील ऑर्केस्ट्रा बार मध्ये अचानक छापा मारून या बारची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार नवी मुंबई पोलिसांनी २६ ऑगस्ट रोजी पनवेल मधील क्रेझी बॉईज रेस्टॉरंट ॲन्ड बार आस्थापनेची तपासणी केली होती. या तपासणी दरम्यान क्रेझी बारने त्यांना दिलेल्या परवान्याचे आणि नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे क्रेझी बारचा परवाना रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानंतर पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी याबाबत सुनावणी घ्ोतली होती. अखेर क्रेझी बॉईज रेस्टॉरंट ॲन्ड ऑर्केस्ट्रा बारकडून नियमांचे, अटींचे उल्लंघन झाल्याची खात्री झाल्यानंतर ३० ऑक्टोबर रोजी सदर बारचा ऑर्केस्ट्रा परवाना रद्द करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

क्रेझी बॉईज ऑर्केस्ट्रा बारकडून सार्वजनिक मनोरंजनाचे कार्यक्रम नियम १९९९ मधील तरतुदींचा आणि परवान्यातील अटींचा भंग करण्यात आल्याने हि कारवाई करण्यात आली आहे. बारमध्ये सुरु असलेल्या गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी सदर कारवाई करण्यात आली असून परवान्याचे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इतर बारवर देखील कडक कारवाई करण्यात येईल. - संजयकुमार पाटील, पोलीस उपायुवत (मुख्यालय), नवी मुंबई.

यापूर्वीही बार वर निलंबनाची कारवाई...
यापूर्वी नवी मुंबई पोलिसांनी नियमांचे आणि अटींचे उल्लंघन करणाऱ्या वाशीतील ऑन्टेरिओ हॉटेल्स प्रा.लि, पनवेल तालुक्यातील टाईम्स बार ॲन्ड रेस्टॉरंट, गोल्डन पाम बार ॲन्ड रेस्टॉरंट, क्रेझी बॉईज रेस्टॉरंट ॲन्ड बार त्याचप्रमाणे रबाले एमआयडीसी मधील हॉटेल माया पॅलेस या पाच ऑर्केस्ट्रा बारचे परवाने पंधरा दिवसांसाठी निलंबित केले होते. तसेच कपल बार, हॉटेल मेघराज बार आणि माया बार या तीन ऑर्केस्ट्रा बारचे परवाने एक महिन्याच्या कालावधीसाठी निलंबित केले आहेत. तर हॉटेल कॅप्टन एनएक्स बार या आर्केस्ट्रा बारचा परवाना तीन महिन्याकरिता निलंबित करण्यात आला आहे. 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

दिवसा घरफोडी करणा-या सराईत चोरटयाला नेरुळ पोलिसांनी केली अटक