कोपरखैरणेतील नटराज या लेडीज बारवर पोलिसांचा छापा

कोपरखैरणेतील नटराज रेस्टॉरंट ऍन्ड बारवर कोपरखैरणे पोलिसांचा छापा

नवी मुंबई : कोपरखैरणेतील नटराज रेस्टॉरंट ऍन्ड बारवर कोपरखैरणे पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री छापा मारुन बारमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अश्लील हावभाव व अंगविक्षेप करणा-या 28 महिला वेटर, 22 ग्राहक तसेच बार मॅनेजर, कॅशीयर, वेटर अशा एकुण 63 जणांवर कारवाई करुन त्यांना ताब्यात घेतले आहे.  

कोपरखैरणे सेक्टर-15 मधील नटराज रेस्टाँरंट ऍन्ड बारमध्ये नियम व अटींचा भंग करुन महिलांकडुन विनापरवाना अश्लील नृत्य करवुन घेण्यात येत असल्याची माहिती कोपरखैरणे पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय भोसले यांनी सदर बारवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक दाभोळकर व त्यांच्या पथकाने सदर बारमध्ये बोगस गिऱ्हाईक पाठवून खातरजमा करण्यासाठी पाठवले होते. यावेळी सदर बारमधील काही महिला या तोकड्या कपड्यात बीभत्स वर्तन व अश्लील हावभाव करुन गिऱहाईकासोबत अंगलट करुन नृत्य करत असल्याचे निदर्शनास आले.  

तसेच काही गिऱहाईक हे बारमध्ये नृत्य करत असलेल्या महिलांवर पैशांची उधळण करत असल्याचे निदर्शनास आले. बोगस गिऱहाईकाने याचे व्हिडीओ चित्रीकरण करुन त्याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी सदर बारवर मध्यरात्री 12.30 वाजता छापा मारला. यावेळी सदर बारमधील मॅनेजर व इतर स्टाफ हे ऑर्केस्ट्रा परवाना अटी व शर्तीचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी सदर बारमधील 28 महिला वेटर, 22 ग्राहक तसेच बारमधील, मॅनेजर, कॅशीयर, वेटर व कर्मचारी अशा एकुण 63 जणांवर कारवाई करुन त्यांना ताब्यात घेतले.  

या सर्वांविरोधात महाराष्ट्र हॉटेल, उपहारगृहे आणि मद्यपान कक्ष (बार) यामध्ये अश्लिल नृत्यांवर प्रतिबंध घालण्याबाबत महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबतचे अधिनियम, तसेच सार्वजनिक मनोजंनाच्या जागांना लायसन्स देणे व त्यांचे नियंत्रण करणे तसेच 294. 110,114,188,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.  

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

प्राध्यापकाला २१ लाखांचा गंडा घालणारा सायबर चोरटा जेरबंद