प्राध्यापकाला २१ लाखांचा गंडा घालणारा सायबर चोरटा जेरबंद

सायबर चोरट्यांच्या बँक खात्यातून पोलिसांनी गोठवली १८.८० लाखाची रक्कम

नवी मुंबई : इन्कम टॅक्स विभागाची धमकी देतानाच नॅशनल सिक्युरिटीचा इश्यु असल्याची तसेच सदर केसमध्ये अटक करण्याची भिती दाखवून प्राध्यापक आणि त्याच्या पत्नीकडून ऑनलाईन २१ लाख २२२ हजार रुपये उकळणाऱ्या टोळीतील आरोपीला नवी मुंबई पोलिसांच्या सायबर पोलिसांनी चेन्नई येथून अटक केली आहे. या प्रकरणातील सायबर चोरट्यांनी ज्या खात्यामध्ये फसवणुकीची रक्कम स्वीकारली, त्या बँक खात्यातील एकूण १८ लाख ८० हजाराची रक्कम सायबर पोलिसांनी गोठवली आहे. सायबर पोलिसांनी आता या टोळीतील इतर आरोपींचा शोध सुरु केला आहे.

या प्रकरणातील सायबर टोळीने ऑगस्ट महिन्यात सीवुडस्‌ भागात राहणाऱ्या प्राध्यापकाला इन्कम टॅक्स विभागाची धमकी दिली होती. तसेच त्यांच्या नागपूर येथील बँक खात्यात मोठ्या प्रमाणात पैशांची देवाण-घेवाण होत असल्याचे सांगून त्यांच्या नावाने कॅनडा देशात अवैध पार्सल पाठविले जात असल्याची भिती दाखवली होती. त्यानंतर सदर प्रकार नॅशनल सिक्युरीटीचा इश्यु असल्याची भिती दाखवून सदर केसमध्ये इन्कम टॅक्स विभागामार्फत कारवाई करुन त्यांना अटक करण्याची धमकी दिली दिली होती. त्यानंतर जामिनाच्या नावाखाली तसेच प्राध्यापकाचे बँक खाते सुरक्षिततेच्या नावाखाली डेबिट फिज करत असल्याचा बहाणा करुन त्यांच्याकडून वेगवेगळ्या बँक खात्यावर टप्प्याटप्प्याने तब्बल २१ लाख २२ हजार रुपये त्यांच्याकडून उकळले होते.  

त्यानंतर देखील सायबर चोरट्यांकडून जामिनासाठी पैशांची मागणी वाढल्याने आपली फसवणूक होत असल्याचे प्राध्यापक आणि त्याच्या पत्नीच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती. सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांनी तात्काळ पाऊले उचलत प्राध्यापकाने फसवणुकीची रक्कम भरलेले सर्व बँक खाते गोठविण्याबाबत बँकांसोबत पत्रव्यवहार केला. त्यामुळे सायबर पोलिसांना १८ लाख ८० हजाराची रक्कम गोठविण्यात यश आले. त्यानंतर सायबर पोलिसांनी या गुन्ह्यासाठी वापरलेले बँक खाते आणि मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करुन चेन्नई येथून लोकेशकुमार याला अटक केली. सायबर पोलिसांनी आता या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध सुरु केला आहे.  

सदरचा गुन्हा सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम, पोलीस उपनिरीक्षक लिंगराम देवकत्ते, विजय आयरे, विनोद हिरे, संदिप सोलाट, पोलीस नाईक  मंगेश गायकवाड, पोलीस शिपाई नरहरी क्षीरसागर आणि महिला पोलीस शिपाई पुनम गडगे यांनी उघडकीस आणला आहे.

दरम्यान, या कामगिरीबद्दल सायबर पोलिसांचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह-पोलीस आयुक्त संजय मोहिते, गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल नेहुल यांनी विशेष कौतुक केले आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

नायजेरियन सायबर गुन्हेगार दिल्लीत जेरबंद