‘अनंत चतुर्दशी'साठी पोलीस-महापालिका सज्ज

नवी मुंबई पोलिसांकडून शहरात चोख बंदोबस्त    

नवी मुंबई : अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन सोहळा निविघ्नपणे पार पडावा, यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून संपूर्ण शहरात तसेच विसर्जनस्थळावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे गणेशभक्तांनी देखील अनंत चतुर्दशी दिवशी शांततेत श्री गणेशाचे विसर्जन करावे, असे आवाहन नवी मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.

   नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकुण ८४२ सार्वजनिक तर ९०,३२० घरगुती गणेशमुर्तींची स्थापना करण्यात आली असून यातील दिड, अडीच, पाच, सहा आणि सात दिवसाच्या गणेश मुर्तींचे विसर्जन शांततेत पार पडले आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकुण ४२१ सार्वजनिक आणि २०,६९४ खाजगी गणेशमुर्तींचे विसर्जन होणार आहे. अनंत चतुर्दशी दिनी कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
त्यासाठी ६ पोलीस उपआयुक्त, १० सहाय्यक पोलीस आयुक्त, ६७ पोलीस निरीक्षक, २७४ सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरिक्षक तसेच ३१५० पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्याशिवाय ८ स्ट्रायकिंग फोर्स, १ क्युआरटी, २ आरसीपी, २ एसआरपीएफचे प्लाटून तसेच ३०० होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे विसर्जन स्थळे, मिरवणुकीचे मार्ग यावर कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी नवी मुंबई पोलिसांचे प्रशिक्षीत बॉम्ब शोधक आणि बॉम्ब नाशक पथक तैनात करण्यात आले आहेत.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयच्या हद्दीतील वाशी-जागृतेश्वर मंदिर तलाव, कोपरखैरणे खाडी तलाव, तुर्भे तलाव, नेरुळ-चिंचवली तलाव, करावे गांव तलाव, दारावे गांव तलाव, सीबीडी-आग्रोळी तलाव, ऐरोली नाका तलाव, रबाले-ऐरोली सेक्टर-२० खाडी तलाव, दिघा तलाव, तर परिमंडळ-२ं मध्ये कळंबोली-रोडपाली तलाव, खारघर-स्पॅगेटी तलाव, पनवेल-वडघर खाडी पनवेल, उरण विमला तलाव अशा महत्वाच्या १६ विसर्जन घाटावर पोलीस आयुक्तालय कडून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. उर्वरित विसर्जनाच्या ठिकाणी स्थानिक पोलीस ठाणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमऱ्यांच्या माध्यमातून देखील पोलिसांचा गणेश विसर्जन मिरवणुकांवर वॉच राहणार आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनापूर्वी सर्व विसर्जन स्थळांची बॉम्ब शोधक- नाशक पथकामार्फत तपासणी करण्यात येणार आहे. त्याशिवाय गणेश विसर्जन शांततेत व्हावे, ध्वनी प्रदुषण कायद्याचे उल्लंघन होऊ नये यासाठी पोलीस ठाणे स्तरावर गणेशोत्सव मंडळाच्या बैठका आणि डॉल्बी मालकांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. ध्वनी प्रदुषण संदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यात ध्वनी प्रदुषण विरोधी पथक तयार करण्यात आले असून या पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांना ध्वनीमापक यंत्रे हातळण्याबाबतचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी सदर प्रशिक्षित अधिकारी-कर्मचारी आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या मंडळावर कारवाई करणार आहेत.    

गणेश विसर्जन सोहळा निर्विघ्नंपणे पार पडावा, यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून संपुर्ण शहरात तसेच विसर्जनस्थळावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे गणेश भक्तांनी देखील शांततेत श्री गणेशाचे विसर्जन करावे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. नागरिकांना कुणी संशयित व्यक्ती निदर्शनास आल्यास तात्काळ त्याची माहिती पोलिसांना द्यावी. - प्रशांत मोहिते, पोलीस उपायुवत - विशेष शाखा, नवी मुंबई. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

नवी मुंबईत वाहने पार्क करण्यास व मार्गस्थ होण्यास देखील मनाई