अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेले त्रिकुट जेरबंद 

17 लाख 50 हजार रुपये किंमतीचे मेफेड्रोन जप्त

नवी मुंबई : बेलापुर खाडीचे बाजुला, सेक्टर 15 भागात अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या त्रिकुटाला नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी रात्री सापळा लावून अटक केली आहे. सलीम उमतअली शाह (32), रफिक शकील शहा (24) व फिरोज मोहम्मद यासिन खान (18) अशी या त्रिकुटाची नावे असून अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्याच्या जवळ असलेले 17 लाख 50 हजार रुपये किंमतीचे 175 ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन हे अंमली पदार्थ जप्त केले आहे. या त्रिकुटाने सदरचे अंमली पदार्थ कुठून आणले याबाबत पोलिसांकडुन तपास करण्यात येत आहे.  

बेलापुर खाडीचे बाजुला, सेक्टर १५ भागात काही तरुण अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीरज चौधरी व त्यांच्या पथकाने मंगळवारी रात्री सेक्टर -15 मध्ये बेलापुर खाडी लगत सापळा लावला होता. रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास सलीम शाह, रफिक शहा व फिरोज खान त्याठिकाणी संशयीतरित्या आले असताना त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्यांची धरपकड केली.  

त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्यांची झडती घेतली असता, त्यांच्या जवळ 17 लाख 50 हजार रुपये किंमतीचे 175 ग्रॅम वजनाचे पांढ-या रंगाचे पारदर्शक स्फटीकाप्रमाणे कण असलेली (एम.डी) मेफेड्रॉन हे अंमली पदार्थ आढळून आले. त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने सदरचे अंमली पदार्थ जप्त करुन सलीम शाह, रफिक शहा व फिरोज खान या तिघा विरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कलमाखाली गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे. या कारवाईत पकडण्यात आलेल्या त्रिकुटाने केवळ पैशांच्या हव्यासापोटी सदरचा गैरकायदेशीर धंदा केल्याचे तपासात आहे.

 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

 ‘अनंत चतुर्दशी'साठी पोलीस-महापालिका सज्ज