17 दिवसाच्या बाळाला अडीच लाख रुपयांमध्ये विकण्याचा प्रयत्न

अडीच लाख रुपयांत आपल्या 17 दिवसांच्या बाळाला विकण्यासाठी आलेली आई व मध्यस्थी करणारे आठजण अटकेत  

नवी मुंबई : मुंबईतील मानखुर्द येथे रहाणा-या एका महिलने मध्यस्थींच्या मदतीने आपल्या 17 दिवसाच्या बाळाला अडीच लाख रुपयांमध्ये विकण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना खारघरमध्ये उघडकिस आली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सदर पथकाने खारघरमध्ये सापळा लावून लहान बाळाला विकण्यासाठी आलेल्या आईला तसेच बाळ विक्रीसाठी मध्यस्थी करणाऱया अशा एकुण 8 जणांना अटक केली आहे. या कारवाईत अटक करण्यात आलेल्या टोळीने अशाच पद्धतीने अनेक लहान मुलांची विक्री केली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.  

या कारवाईत अटक करण्यात आलेल्यामध्ये बाळाची आई मुमताज रहेमान मंडळ (28) रा.मानखुर्द महाराष्ट्र नगर, व मध्यस्थी मुमताज नियाज अब्बास खान (48), नदिम शाहिद अहमद अन्सारी (29), गुलाम गौस अहमद अन्सारी (37), सुरेश शामराव कांबळे (60) सर्व राहणार मुंब्रा तसेच जुबेदा सैयद रफिक (49), शमिरा बानु मोहद्दीन शेख (42) दोघेही राहणार चिता कॅम्प ट्रॉम्बे, व दिलशाद आलम (42) राहणार बांद्रा खेरवाडी या आठ जणांचा समावेश आहे. हि टोळी लहान मुलांना पळवून नेऊन त्यांची विक्री करत असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती.  

या माहितीच्या आधारे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने एका महिलेच्या माध्यमातून या टोळीसोबत व्हॉट्सऍपवरुन मागील एक महिन्यापासून संपर्क ठेवला होता. या चॅटींगदरम्यान पोलिसांच्या पथकाने लहान मुल खरेदीबाबत चौकशी केल्यानंतर या टोळीने अडीच लाख रुपयांमध्ये नवजात बाळ विकत देण्याची तयारी दर्शविली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने लहान मुल विकत घेण्याची तयारी दर्शवून त्यांना खारघर येथे बोलावून घेतले होते. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल आहेर व त्यांच्या पथकाने गत शनिवारी दुपारी खारघर सेक्टर-21 मधील सिद्धी विनय बिल्डिंग जवळ सापळा लावला होता.  

दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास या टोळीतील मुमताज खान व रिक्षा चालक नदिम शाहिद अन्सारी व बाळाची आई मुमताज रहेमान मंडळ हे तिघेही 17 दिवसाच्या बाळाला घेऊन रिक्षामधून खारघरमध्ये आले होते. यावेळी बाळाच्या खरेदी विक्रीचे अडीच लाख रुपये त्यांना दिल्यानंतर पोलिसांनी तिघांची धरपकड करुन त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी केली असता, या बाळाच्या विक्री व्यवहारात इतर पाच जण सहभागी असल्याची व ते सर्व मुंब्रा येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने मुंब्रा येथून इतर पाच जणांना देखील ताब्यात घेतले.  
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल आहेर (अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष)

या कारवाईत अटक करण्यात आलेली टोळी लहान मुले पळवून त्यांची विक्री करुन लाखो रुपये मिळवत असल्याचे आढळून आले आहे. या सर्वांविरोधात बाळाची विक्री केल्याप्रकरणी तसेच बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमानुसार गुन्हा दाखल करुन सर्वांना अटक करण्यात आली आहे. या टोळीने अशाच पद्धतीने लहान बाळांची बेकायदेशीररीत्या खरेदी विक्री केली असण्याची शक्यता आहे. त्यानुसार पुढील तपास करण्यात येत आहे.    

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

शिवराज ढाबा तात्काळ बंद करण्याचे एफडीएचे निर्देश