शिवराज ढाबा तात्काळ बंद करण्याचे एफडीएचे निर्देश

अन्न औषध प्रशासनाची सीबीडीतील हॉटेल शिवराज ढाब्यावर कारवाई 

नवी मुंबई : सीबीडी बेलापूर सेक्टर-15 मधील शिवराज ढाब्यामध्ये आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाच्या तरतुदींचे पालन केले जात नसल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या तपासणीत आढळून आले आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने हा ढाबा तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार हा ढाबा आता बंद करण्यात आला आहे. 

राज्याचे अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री बाबा आत्राम आणि प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात हॉटेल तपासणी मोहिम राबवली जात आहे. त्यानुसार गत सोमवारी ठाण्यातील अन्न औषध प्रशासनाच्या वतीने सीबीडी बेलापूर सेक्टर-15 मधील शिवराज ढाब्याची तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत शिवराज ढाब्या मध्ये तयार होणा-या अन्नपदार्थावर लक्ष ठेण्यासाठी विहित शैक्षणिक पात्रता धारक करणा-या पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली नसल्याचे आढळून आले. तसेच अन्नपदार्थ विक्रीसाठी तयार करताना वापरल्या जाणा-या पाण्याची तपासणी करण्यात येत नसल्याचे  तसेच अन्नपदार्थ बनवताना त्यासाठी लागणाऱ्या कच्चा अन्नपदार्थांची हाताळणी करणा-या कामगारांची आरोग्य तपासणीही करण्यात आले नसल्याचे आढळून आले आहे. त्याचप्रमाणे शिजवलेले अन्न मानवी सेवनास योग्य आहे की नाही, याची एनएबीएलच्या प्रयोगशाळेत तपासणी देखील करण्यात आली नसल्याचे आढळून आले आहे. 

या सर्व बाबींचा विचार करुन तसेच जनहित व जन आरोग्य प्राधान्याने विचारात घेवून या ढाब्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ व त्या अंतर्गत नियमन २.१.१४ (१) अंतर्गत कारवाई करण्यात अली आहे. तसेच हा ढाबा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार हा ढाबा बंद करण्यात आला आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांच्या निर्देशानुसार कोकण विभागाचे सहआयुक्त सुरेश देशमुख, सहाय्यक आयुक्त योगेश ढाणे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी रश्मी वंजारी यांनी केली.  कोणत्याही अन्नपदार्थाच्या गुणवता व दर्जा बाबत किंवा अन्न आस्थापनाबाबत कोणतीही तक्रार असल्यास त्याबाबत 1800-222-365 या माहिती प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांकावर नोंदवावी असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाकडून करण्यात आले आहे. .

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

मेल-एक्सप्रेस गाड्यामध्ये चोरी करणारे त्रिकुट जेरबंद