अंमली पदार्थ विरोधी कक्षाची खारघर आणि तळोजामध्ये धडक कारवाई


२०  लाख ८० हजार रुपये किंमतीचे २०८ ग्रॅम वजनाचे एम.डी.(मेफेड्रॉन) जप्त


नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने गुरुवारी एका दिवसांमध्ये तळोजा आणि खारघर परिसरात दोन वेगवेगळ्या कारवाया करुन अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या नायजेरीयन नागरिकासह दोघांना अटक केली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने या दोन्ही कारवायांमध्ये तब्बल २० लाख ८० हजार रुपये किंमतीचे २०८ ग्रॅम वजनाचे एम.डी.(मेफेड्रॉन) हे अंमली पदार्थ जप्त केले आहे. सदरचे अंमली पदार्थ त्यांनी कुठून आणले तसेच ते कुणाला विकणार होते, याबाबत पोलिसांकडुन चौकशी करण्यात येत आहे.  

गुरुवारी १७ ऑगस्ट रोजी दुपारी तळोजा फेज-1 मधील मेट्रो शेड समोरील गामी रोडवर एक नायजेरीयन व्यक्ती अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी कक्षाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीरज चौधरी व त्यांच्या पथकाने दुपारी तळोजा फेज-१ भागात सापळा लावला होता. दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास ओनयेंका क्लेमेटं ईग्बोईजे (३९) हा नायजेरीयन नागरिक संशयास्पदरित्या त्या भागात आला असता, अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ १० लाख ३० हजार रुपये किंमतीचे १०३ ग्रॅम वजनाचे एम.डी.(मेफेड्रॉन) हे अंमली पदार्थ आढळुन आले. त्यानंतर पोलिसांनी सदरचे अंमली पदार्थ जप्त करुन त्याला अटक केली.  

या कारवाईनंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने खारघर सेक्टर-३३ मधिल बागेश्री अपार्टमेंटजवळ गुरुवारी रात्री सापळा लावून अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या हबिब अजीज चौधरी (३९) याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ १० लाख ५० हजार रुपये किंमतीचे १०५ ग्रॅम वजनाचे एम.डी.(मेफेड्रॉन) हे अंमली पदार्थ आढळुन आले. सदरचे अंमली पदार्थ जफ्त करुन त्याला अटक करण्यात आली. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीरज चौधरी, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक चोपडे, पोलीस उपनिरीक्षक मोरे, शिंगे व त्यांच्या पथकाने केली.  

या दोन्ही कारवायामध्ये अटक करण्यात आलेल्या दोघांवर अनुक्रमे तळोजा व खारघर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी सदरचे अंमली कोणाकडून आणले, तसेच ते कोणाला विकणार होते? याबाबत पुढील चौकशी सुरु  असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीरज चौधरी यांनी दिली.  

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

एसीपी संगीता अल्फान्सो यांची शेवटची साक्ष सुरु