एसीपी संगीता अल्फान्सो यांची शेवटची साक्ष सुरु

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण

नवी मुंबई : सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड खटल्यातील तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त संगिता अल्फान्सो यांची साक्ष पनवेल सत्र न्यायालयात सुरु झाली आहे. या खटल्यात आतापर्यंत न्यायालयाने सुमारे ८० साक्षीदार तपासले आहेत. त्यामध्ये चार तपास अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. संगीता अल्फान्सो सदर खटल्यातील अंतिम साक्षीदार आहेत. त्यांची सर आणि उलट तपासणी एक महिन्यात पूर्ण होणार आहे. त्यानंतर महिनाभर दोन्ही बाजुच्या वकिलांचा युक्तीवाद चालणार असून मुख्य आरोपी अभय कुरुंदकरसह अन्य आरोपींच्या भवितव्याचा निकाल लागणार आहे.

 पोलीस दलात लेडी सिंघम अशी ओळख असलेल्या सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता अल्फान्सो यांच्या मार्गदर्शनाखाली अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा सर्व तपास झाला आहे. सुरुवातीला त्या तपास अधिकारी होत्या. त्यांची बदली झाल्यानंतरही गृह विभागाने त्यांच्यावर बिद्रे हत्याकांडाच्या तपासाची जबाबदारी कायम ठेवली होती. तत्कालिन सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड, निलेश राऊत यांची साक्ष पूर्ण झाल्यानंतर १८ ऑगस्ट पासून संगीता अल्फान्सो यांची साक्ष पनवेल न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधिश के. जी. पालदेवार यांच्या समोर सुरु झाली आहे.

अल्फान्सो यांनी या खटल्यात २०१७ मध्ये केलेल्या तपासाबाबत विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी त्यांची सर तपासणी घेतली. यावेळी न्यायालयात मुख्य आरोपी अभय कुरुंदकरसह राजू पाटील, कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर हजर होते. सदर सर तपासणी आणखी दोन आठवडे चालण्याची शक्यता आहे. त्यानंतर आरोपींचे वकील विशाल भानुशाली आणि प्रसाद पाटील अल्फान्सो यांची उलट तपासणी घेणार आहेत. सदर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन्ही बाजुच्या वकिलांचा युक्तीवाद न्यायालयात सुरु होणार आहे.


महत्त्वाच्या घटनाक्रमांचा होणार उलगडा...
अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणाचे तपास अधिकारी वेगवेगळे असले तरी सहाय्यक पोलीस आयुक्त संगिता अल्फान्सो यांनी सुरुवातीपासून या गुन्ह्याचा तपास केला आहे. तसेच त्यांनी सर्वच महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. त्यांनी केलेल्या सखोल तपासामुळे कुरुंदकर आणि अन्य आरोपींच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. अल्फान्सो यांच्या सर आणि उलट तपासणीमध्ये या हत्याकांडातील घटनाक्रमांचा उलगडा होणार आहे. त्यामुळे त्यांची साक्ष या खटल्यासाठी विशेष महत्त्वाची ठरणार आहे. 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

अज्ञात सायबर चोरटयाविरोधात फसवणुकीसह आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल