नेरुळ गाव सेक्टर-20 मधील सदगुरु अपार्टमेंटमध्ये भरदिवसा घरफोडी

नेरुळ गावात भरदिवसा 5 लाख 65 हजाराची घरफोडी  

नवी मुंबई : अज्ञात चोरटयाने नेरुळ गाव सेक्टर-20 मधील सदगुरु अपार्टमेंटमध्ये भरदिवसा घरफोडी करुन तब्बल 5 लाख 65 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेल्याचे उघडकीस आले आहे. नेरुळ पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात चोरटयाविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करुन या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.  

या प्रकरणातील तक्रारदार प्रतिभा म्हात्रे (48) या नेरुळ सेक्टर-20 मधील सदगुरु अपार्टमेंटमध्ये कुटुंबासह राहण्यास आहेत. प्रतिभा म्हात्रे यांच्या सासु बाजुच्या इमारतीत राहण्यास असल्याने प्रतिभा म्हात्रे या दररोज आपल्या घरातील काम आटोपुन दुपारच्या सुमारास सासुच्या घरी काम करण्यास जात असतात. गत बुधवारी सकाळी 10.30 वाजता देखील प्रतिभा म्हात्रे या आपल्या घराला टाळे लावून सासुच्या घरी कामासाठी गेल्या होत्या. यादरम्यान अज्ञात चोरटयाने त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून त्यांच्या घरातील रोख रक्कमेसह दागिने व इतर ऐवज चोरुन नेला. सासुच्या घरातील काम संपवुन प्रतिभा म्हात्रे या दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आपल्या घरी आल्या असता, त्यांना दरवाजाचा कडी कोयंडा तुटल्याचे निर्शनास आले. तसेच घरातील 1 लाख रुपयांच्या रोख रक्कमेसह वेगवेगळे सोन्याचे दागिने असा तब्बल 5 लाख 65 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी नेरुळ पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली.  


 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

आई तुझ देऊळ फेम डान्सर सचिन ठाकूर यांची कार पुन्हा एकदा अज्ञात व्यक्तीने जाळली