ब्रेक निकामी झालेल्या कंटेनरची ९ वाहनांना धडक

कंटनेरची धडक बसल्यामुळे ९ वाहनांचे नुकसान

नवी मुंबई : ठाणे-बेलापूर मार्गे भिवंडी येथे जाणाऱ्या कंटेनर ट्रेलरचा ब्रेक निकामी झाल्याने सदर कंटेनर ट्रेलर ९ वाहनांना धडक देत ऐरोली येथील टी जंक्शनमध्ये घुसल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. सुदैवाने या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवीत हानी झाली नसून रिक्षामधील एक महिला जखमी झाली आहे. या अपघातात कंटनेरची धडक बसल्यामुळे ९ वाहनांचे नुकसान झाले आहे. या अपघातानंतर ऐरोली मुलुंड मार्गावर सुमारे तासभर वाहतूक कोंडी झाली होती.

या घटनेतील अपघातग्रस्त कंटेनर ट्रेलर शुक्रवारी दुपारी जेएनपीटी येथून ठाणे- बेलापूर मार्गावरुन भिवंडी येथे जात होता. सदर कंटेनर ट्रेलर दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास रबाळे येथील दिवा नाका येथे आल्यानंतर त्याचा ब्रेक निकामी झाला. त्यामुळे चालकाने सदर ट्रेलर ऐरोली टी जंक्शनच्या मार्गावर वळवल्याने सदर ट्रेलर रस्त्यात उभ्या असलेल्या सर्व वाहनांना धडक देत ऐरोली-मुलुंड मार्गावरील टी जंक्शन येथे जाऊन थांबला. या अपघातात ट्रेलरची एक मोटारसायकल, एक रिक्षा, छोटा हत्ती टेम्पो व ६ कारला ट्रेलरची धडक बसल्याने या ९ वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नसली तरी रिक्षामधील एक महिला तसेच एक वाहतूक पोलिस किरकोळ जखम झाले आहे. या अपघातामुळे ऐरोली-मुलुंड मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. रबाळे वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजुला काढून तासाभरानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु झाली. रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

वाशी रेल्वे स्थानकातील शॉर्टकट ठरतोय जीवघेणा