वाशी रेल्वे स्थानकातील शॉर्टकट ठरतोय जीवघेणा

‘शॉर्टकट'चा वापर करणाऱ्यांना आवरायचे कसे? रेल्वे पोलिसांसह आरपीएफला प्रश्न

नवी मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या उपनगरी लोकलच्या अपघातामध्ये वर्षाला शेकडो व्यक्ती मरण पावतात. यामध्ये रेल्वे रुळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. केवळ रेल्वे रुळ ओलांडताना होणारे अपघात कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात असली तरी, अनेक प्रवाशी ‘शॉर्टकट'च्या नादात रेल्वे रुळ ओलांडून जात असल्यामुळे आपला जीव गमावून बसतात. वाशी रेल्वे स्थानकाच्या पश्चिम टोकाला देखील अनेक प्रवाशी दरदिवशी अशाच प्रकारे रेल्वे रुळ ओलांडुन जात आपला जीव धोक्यात घालत आहेत.

वाशी रेल्वे स्थानक आणि आजुबाजुच्या परिसरातील रेल्वेची तसेच इतर कामे करण्यासाठी वाशी रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजुकडे रघुलीला मॉलच्या दिशेने असलेली संरक्षक भिंत काही वर्षांपूर्वी पाडण्यात आली आहे. याच भागातून प्रवाशांनी ‘शॉर्टकट'चा मार्ग अवलंबण्यास सुरुवात केली आहे. वाशी रेल्वे स्थानकावर उतरणारे आणि वाशी गांवच्या दिशेने जाणारे बहुतेक प्रवाशी तसेच विना तिकीट असलेले प्रवासी तिकीट तपासणीसांपासून वाचण्यासाठी याच ‘शॉर्टकट'चा वापर करुन रेल्वे रुळ ओलांडून जात आहेत. विशेष म्हणजे येथून महिला, वृध्द आणि शाळकरी विद्यार्थी देखील सर्रास रेल्वे रुळ ओलांडून जात आहेत.  

विशेष म्हणजे या ठिकाणी रेल्वे रुळ ओलांडून जाण्यास मनाई असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून बोर्ड देखील लावण्यात आले आहेत. सदर ठिकाणावरुन रेल्वे रुळ ओलांडून जात असताना अनेकवेळा अपघात झाले असून काही प्रवाशांचा तेथे मृत्यू देखील झाला आहे. असे असताना देखील दरदिवशी शेकडो प्रवाशी या ‘शॉर्टकट'चा वापर करुन आपला जीव धोक्यात घालत आहेत. वाशी रेल्वे स्थानकालगतच्या या ‘शॉर्टकट'मधून रघुलीला मॉलच्या दिशेने बाहेर पडणाऱ्या प्रवाशांसाठी रिक्षा चालकांनी अनधिकृत रिक्षा स्टॅन्ड देखील सुरु केले आहे. त्यामुळे बहुतेक प्रवाशी या ‘शॉर्टकट'चा वापर करुन थेट रिक्षा प्रवास करीत असल्याचे दिसून येत आहे.    

रेल्वे पोलीस आणि आरपीएफ जवानांकडून रेल्वे रुळ ओलांडून जाणाऱ्या प्रवाशांचा अटकाव करण्यात येत असला तरी, दुसऱ्या दिवशी पुन्हा हेच प्रवाशी त्याच ठिकाणावरुन बिनदिक्कतपणे जात असल्याचे येथील चित्र आहे. त्यामुळे अशा व्यक्तींना आवरायचे कसे? असा प्रश्न रेल्वे पोलिसांसह, आरपीएफला पडला आहे. याच ‘शॉर्टकट' मार्गामध्ये दोन वर्षापूर्वी एका तरुणाच्या हत्येची घटना देखील घडली होती.    

हार्बर आणि ट्रान्स-हार्बर रेल्वे मार्गावरील वाशी आणि पनवेल रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोवंडी ते पनवेल आणि रबाले ते जुईनगर या दोन्ही मार्गावर गतवर्षामध्ये झालेल्या वेगवेगळ्या अपघातात २०० पेक्षा अधिक लोकांचा बळी गेला आहे. यात सर्वात जास्त अपघात रेल्वे रुळ ओलांडताना होऊन त्यात ११० लोकांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. प्रवाशांनी रेल्वे रुळ ओलांडू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून वारंवार करण्यात येते. तसेच त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात येत असते. मात्र, त्यांनतर देखील अनेक प्रवाशी आपल्या जीवाची काळजी न करता, रेल्वे रुळ ओलांडून जात असल्याचे दिसून येते. अनेकजण तर कानात हेडफोन घालून रेल्वे रुळ ओलांडून जात असल्यामुळे त्यांना लोकलचा हॉर्न ऐकू न आल्यामुळे त्यांचा हकनाक बळी गेल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.  

वाशी रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजुकडे रेल्वे रुळ ओलांडून शौचालयाच्या बाजुने बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना अटकाव करुन त्यांच्यावर नियमित कारवाई देखील करण्यात येते. प्रवाशांनी या ‘शॉर्टकट'चा वापर न करता, रेल्वे पुलांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येते. तसेच ‘सिडको'कडे सदर ठिकाणी भिंत बांधण्याबाबत पत्रव्यवहार देखील करण्यात आला आहे. - संभाजी कटारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक - वाशी रेल्वे पोलीस ठाणे. 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

पनवेल मधील गाढेश्वर धरणाच्या प्रवाहात अडकुन पडलेल्या दोघांची पोलिसांनी केली सुखरुप सुटका