पत्नीची हत्या करुन पळून गेलेल्या पतीला गुन्हे शाखा युनिट-2च्या पथकाने कोल्हापुर येथून केली अटक

पत्नीची हत्या करुन फरार झालेल्या पतीला अटक करण्यात गुन्हे शाखेला यश  

नवी मुंबई : घरगुती कारणावरुन पत्नीच्या डोक्यामध्ये हातोडीने प्रहार करुन तिची हत्या करुन पळून गेलेल्या पतीला गुन्हे शाखा युनिट-2च्या पथकाने कोल्हापुर येथून अटक केली आहे. बिराफ्पा श्रीरंग शेजाळ (41) असे या आरोपी पतीचे नाव असून गत 8 एप्रिल रोजी सकाळी त्याने आपल्या मुलांना शाळेत सोडल्यानंतर घरी येऊन पत्नीची हत्या करुन पलायन केले होते.  

कॅग विभागात क्लार्क म्हणुन नोकरीला असलेल्या आरोपी बिराफ्पा शेजाळ हा पत्नी शिलतवंता व दोन मुलांसह कामोठे सेक्टर-11 मधील त्रिमुर्ती कॉम्फ्लेक्समध्ये राहण्यास होता. शिलवंता व बिराफ्पा या दोघांचा विवाह 2010 साली झाला होता. बिराफ्पा हा पत्नीसोबत नेहमी बारीकसारीक कारणावरुन भांडण काढत होता. तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारझोड करत होता. बिराफ्पा हा वेगवेगळ्या कारणावरुन नेहमी पत्नीसोबत भांडण काढत असल्याने शिलवंता हिच्या नातेवाईकांनी त्याच्या विरोधात ऑगस्ट 2022 मध्ये पनवेल न्यायालयात कौटुंबिक हिसांचार कायद्यानुसार तक्रार दाखल केली होती.  

मात्र त्यावेळी बिराफ्पा याने नातेवाईक व मित्र मंडळीसमोर पत्नीला त्रास देणार नसल्याचे सांगुन त्याने पत्नी शिलवंता हिची सर्वांसमोर माफी मागितली होती. त्यामुळे नातेवाईकांनी पनवेलमध्ये दाखल करण्यात आलेला दावा लोकलन्यायालयातुन काढुन टाकण्यात आला होता. मात्र त्यानंतर देखील बिराफ्पा याच्यामध्ये काहीच सुधारणा झाली नव्हती. गत शुक्रवारी 7 एप्रिल रोजी त्याने पत्नीसोबत दिवसभर भांडण केले. त्यानंतर शनिवारी सकाळी बिराफ्पा याने आपल्या दोन्ही मुलांना शाळेत सोडून आल्यानंतर त्याने पत्नी शिलवंता हिच्या डोक्यामध्ये हतोडीने प्रहार करुन तिची हत्या करुन पलायन केले होते.  

दरम्यान, शिलवंता व तिचा पती बिराफ्पा या दोघांचा संपर्क होत नसल्याने शिलवंता हिच्या नातेवाईकांनी रात्री 8 च्या सुमारास कामोठे येथील घरी धाव घेतल्यानंतर शिलवंता हि घरातील बेडरुममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे व तिच्या डोक्याचा चेंदा मेंदा झाल्याचे निदर्शनास आले होते. बिराफ्पा यानेच शिलवंता हिची हत्या करुन पलायन केल्याचे आढळुन आल्यानंतर कामोठे पोलिसांनी त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला होता. गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने या हत्या प्रकरणाचा तपास करताना सीसीटीव्ही कॅमेरे तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे फरार बिराफ्पा याचा शोध घेतला.  

यावेळी तो कोल्हापूर आदमापुर मधील भुदरगड येथे लपवून राहत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने कोल्हापुर येथे जाऊन तेथून पळून जाण्याचा प्रयत्ननात असलेल्या आरोपी बिराफ्पा शेजाळ याला ताब्यांत घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने पत्नीशी वारंवार होणाऱया घरगुती भांडणाच्या रागातून तिच्या डोक्यात हातोडी मारुन तिची हत्या केल्याची तसेच हत्येसाठी वापरलेली हातोडी त्याने खाडीत टाकुन दिल्याची कबुली दिली आहे. त्यानुसार गुन्हे शाखेने त्याला पुढील कार्यवाहीसाठी कामोठे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.   

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरुन १० ते १२ कि.मी. नेले फरफटत