वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरुन १० ते १२ कि.मी. नेले फरफटत

कार चालक जेरबंद; थरारक व्हिडीओ व्हायरल  

नवी मुंबई ः अंमली पदार्थ आणि स्फोटके असल्याच्या संशयावरुन कारला थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहतूक पोलिसाला कार चालकाने आपल्या कारच्या बोनटवरुन वाशीतून पामबीच मार्गे थेट उरण रोडवर १० ते १२ किलोमीटर फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांनी या कारचा पाठलाग करतानाच उरण रोडवर दोन ट्रेलर आडवे लावून सदर कार अडविल्यानंतर बोनेटवर असलेल्या वाहतूक पोलिसाची सुटका केली. कार चालक तरुणाला ताब्यात घेऊन वाशी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. वाहतूक पोलिसाचे कारच्या बोनेटवरील थरारक चित्रण नवी मुंबईतील विविध चौकातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.  

कारच्या बोनेटवरुन फरफटत नेलेले वाहतूक पोलीस सिध्देश्वर माळी वाशी वाहतूक शाखेत कार्यरत असून १५ एप्रिल रोजी दुपारी ते वाशीतील ब्ल्यू डायमंड चौकात वाहतूक नियमनासाठी कार्यरत होते. यावेळी कोपरखैरणे येथून वाशीच्या दिशेने येणारी हुंडाई वेरना कार संशय आल्याने पोलीस नाईक माळी यांनी चालकाला थांबण्याचा इशारा केला. मात्र, कार चालक आदित्य धोंडीराम बेमडे (२२) याने त्या ठिकाणी न थांबता पलायन केले. त्यामुळे माळी यांनी मोटारसायकलने सदर कारचा पाठलाग करुन त्याला एपीएमसीतील अन्नपूर्णा चौकात थांबवले. यावेळी माळी यांनी सदर कार अडविण्याचा प्रयत्न केला असता, आदित्य बेमडे याने माळी यांच्या अंगावर गाडी घालून पळून जाण्याचा प्रयत्न केला.  
त्यामुळे सिध्देश्वर माळी यांनी स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करत कारचे बोनेट पकडले. यावेळी आदित्य बेमडे याने आपली कार  न थांबवताच माळी यांना आपल्या कारच्या बोनेटवर लटकलेल्या अवस्थेत ठेवून कार भरधाव वेगात पामबीच मार्गावरुन थेट उरणच्या दिशेने १० ते १२ कि.मी. अंतर पळवून नेली. तत्पूर्वी अन्नपूर्णा चौकात कार्यरत असलेल्या वाहतूक पोलिसांनी याबाबतची माहिती नियंत्रण कक्षाला देऊन या कारचा पाठलाग सुरु केला. आदित्य बेमडे उरणच्या दिशेने भरधाव वेगात जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर गव्हाणफाटा येथील वाहतूक पोलिसांनी साई मंदिर येथे भररस्त्यात दोन ट्रेलर आडवे लावून नाकाबंदी करीत सदर कार अडवून वाहतूक पोलीस माळी यांची सुटका केली.  त्यानंतर कार चालक आदित्य बेमडे याला कारसह ताब्यात घेऊन त्याला वाशी पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानुसार वाशी पोलिसांनी  आदित्य बेमडे याच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा आणणे अशा विविध कलमाखाली गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. दरम्यान, नवी मुंबईतील विविध चौकात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या घटनाक्रमाचे थरारक व्हिडीओ कैद झाले असून ते सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल होत आहेत.    

वाहतूक पोलिसाला वाचविण्याऐवजी फवत बघ्याची भूमिका...
आरोपी आदित्य बेमडे नशेत असल्याचे त्याच्या वैद्यकीय तपासणीत आढळून आले आहे. नशेत कार चालवताना पकडले जाण्याच्या भितीने त्याने कार न थांबवता पळवून नेल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. दुसरीकडे आदित्य बेमडे याने वाशी येथून गव्हाणफाटा पर्यंत जवळपास १० ते १२ कि.मी. पर्यंत वाहतूक पोलिसाला आपल्या कारच्या बोनेटवरुन फरफटत भरधाव वेगात घेऊन जात असल्याचे रस्त्यावरुन जाणाऱ्या अनेक वाहन चालकांनी पाहून देखील त्याला कुणीही अडविण्याचा प्रयत्न केला नाही. सर्व वाहन चालकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतल्याचे सीसीटीव्ही फुटेज वरुन दिसून येत आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चैन स्नॅचिंगच्या घटना सुरुच