गुजरात येथून कंटेनर, टेम्पोद्वारे गुटख्याची तस्करी

६२ लाखांचा गुटखा साठा जप्त

नवी मुंबई ः शिळफाटा-महापे मार्गे टेम्पोमधून मुंबईत नेला जाणारा तब्बल १२ लाख रुपये किंमतीचा गुटख्याचा साठा पकडण्याची कामगिरी केल्यानंतर तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी डोंबिवली परिसरातून गुटख्याने भरलेला एक कंटेनर आणि एक टेम्पो जप्त करुन तब्बल ८२ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर गुटख्याचा साठा गुजरात मधून कंटेनर आणि टेम्पोद्वारे डोंबिवली परिसरात आणण्यात आल्यानंतर तो मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात वितरीत करण्यात येत असल्याचे तपासात आढळून आले आहे. आतापर्यंत सदर कारवाईत चार जणांना अटक करण्यात आली असून एकुण ९९ लाख ७८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.

तुर्भे एमआयडीसी पोलिसांचे पथक १९ फेब्रुवारी रोजी पहाटे महापे-शिळफाटा मार्गावरील महापे चेक पोस्टवर नाकाबंदी लावून वाहनांची तपासणी करत होते. यावेळी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास शिळफाटा येथून नवी मुंबईच्या दिशेने येणाऱ्या संशयित टेम्पोची पोलिसांनी तपासणी केली असता, सदर टेम्पोमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधीत असलेला तब्बल १२ लाख रुपये किंमतीचा ३० गोणी भरुन केसरयुक्त विमल पान मसाला आणि इतर असा गुटख्याचा साठा आढळून आला होता. पोलिसांनी सदर गुटख्याचा साठा जप्त करुन टेम्पो चालकाला अटक केली होती. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर शिऊरकर आणि त्यांच्या पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरु केला होता.

या तपासादरम्यान सदर गुटखा गुजरात राज्यातून कंटेनरद्वारे डोंबिवली येथे आणला जात असल्याचे आणि तेथून गुटखा छोट्या वाहनातून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड परिसरामध्ये वितरीत करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे डोंबिवली परिसरातील ऑर्चिड क्राऊन, पलावा सिटी येथून गुटखा आणि पान मसाल्याने भरलेला टेम्पो तसेच मानपाडा एमआयडीसी मधील पिंपळेश्वर मंदिराजवळ गुटख्याने भरलेला आयशर कंटेनर टेम्पो जप्त केला. यातील टेम्पोमध्ये १४ प्लास्टीकच्या गोण्यांमध्ये सुमारे सव्वा सहा लाख रुपये किंमतीचा गुटख्याचा साठा आढळून आला. तसेच दुसऱ्या कंटेनर टेम्पोमध्ये ५५ लाख ५८ हजार रुपये किंमतीच्या १२७ गोण्या भरुन गुटखा साठा आढळून आला. त्यानुसार पोलिसांनी सदर गुटख्याचा साठा आणि दोन टेम्पो असा सुमारे ८२ लाखांचा मुद्देमाल जप्त करुन आणखी तिघांना अटक केली आहे.

सदरचा प्रतिबंधीत गुटखा ज्या ठिकाणावरुन महाराष्ट्रात वितरीत करण्यासाठी आलेला आहे, त्या ठिकाणाचा शोध घेऊन प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या या तस्करीत सहभागी असलेल्या सर्व आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. -विवेक पानसरे, पोलीस उपायुक्त-परिमंडळ-१, नवी मुंबई. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

नियम मोडणा-या वाहन चालकांकडून 2 लाख 56 हजार 750 रुपयांचा दंड