महिलेविरोधात मारहाणीसह अल्पवयीन न्याय मुलांची काळजी व संरक्षण या कलमाखाली गुन्हा दाखल

डे केअर सेंटरमधील बालकाला झालेल्या मारहाण प्रकरणात अखेर आयावर गुन्हा दाखल

नवी मुंबई  : १६ महिन्याच्या बालकाला मारहाण केल्याप्रकरणी अखेर वाशी पोलिसांनी स्मार्ट थॉट्स या डे-केअर सेंटरमधील आया निलम हिरालाल सिंग या महिलेविरोधात मारहाणीसह अल्पवयीन न्याय मुलांची काळजी व संरक्षण या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. गत ७ फेब्रुवारी रोजी ही घटना डे केअरमध्ये घडली होती. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे हा प्रकार उघडकीस आला होता..

वाशी सेक्टर-२८ मधील स्मार्ट थॉट्स केअर सेंटरमध्ये दाखल असलेल्या १६ महिन्याचा बालक गत ७ फेब्रुवारी रोजी खुर्चीवर बसला असताना, त्याच्यासमोर जेवणाचे ताट ठेवण्यात आले. त्यामुळे पीडित बालकाने सदर ताटातील चमचा घेऊन त्यातील अन्न खाण्याचा प्रयत्न केला असता, तेथील आयाने त्याच्या थोबाडीत मारुन त्याला क्रूरपणे उचलुन बाजुला केले होते. त्यामुळे पीडित बालक बराच वेळ रडत राहिले होते. घरी गेल्यानंतर देखील पीडित बालक रडत राहिल्याने त्याच्या पालकांनी आपल्या मोबाईलवरील डे-केअर मधील सीसीटीव्हि फुटेजची तपासणी केली. त्यानंतर डेकेअरमधील आयाकडुन त्याला मारहाण झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

त्यामुळे पीडित बालकाच्या पालकांनी डेकेअर चालकाकडे याबाबत तक्रार केली असता, त्यांनी पीडित बालकांच्या आई वडिलांचे आरोप फेटाळुन लावत त्यांच्या मोबाईलवरील सीसीटीव्हीचे कनेक्शन बंद करुन टाकले होते. त्यामुळे या पालकांनी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर वाशी पोलीसांनी देखील सदर प्रकार गांभीर्याने न घेता, फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल करुन पालकांना कोर्टात जाण्याचा सल्ला दिला होता..

या प्रकारामुळे नाराज झालेल्या पीडित बालकांच्या आई वडिलांनी दोन दिवसापुर्वी नवी मुंबईचे सह पोलीस आयुक्त संजय मोहिते यांची भेट घेऊन त्यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर मोहिते यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश वाशी पोलिसांना दिले होते. त्यानुसार वाशी पोलिसांनी या प्रकरणात १६ महिन्याच्या बालकाला मारहाण करणाऱ्या आया विरोधात गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

अमली पदार्थ मिश्रीत कफ सिरफच्या बाटल्या घेऊन जाणारी दुक्कली जेरबद