नवी मुंबईत गुटखा व तंबाखुजन्य पदार्थाच्या खरेदी विक्रीत वाढ 

बंदी असतानाही नवी मुंबईत परराज्यातून गुटखा, सुंगधी तंबाखुसारखे पदार्थ छुप्या पद्धतीने उपलब्ध

नवी मुंबई : राज्यात गुटखा, सुंगधी तंबाखूसारखे आरोग्यास हानीकारक असलेले पदार्थ विक्रीस व बाळगण्यास बंदी असतानाही नवी मुंबईत परराज्यातून गुटखा, सुंगधी तंबाखुसारखे पदार्थ छुप्या पद्धतीने येत असल्याचे पोलिसांकडुन होत असलेल्या कारवायांवरुन दिसून येत आहे. पोलिसांकडुन हा गुटखा व सुगंधीत तंबाखू पकडण्यात आल्यानंतर देखील शहरातील पान टपऱ्यांवर अगदी सहजतेने गुटखा व सुगंधीत तंबाखु उपलब्ध होत असल्याचे चित्र सध्या नवी मुंबईत पहावयास मिळत आहे.त्यामुळे नवी मुंबईत गुटखा, सुंगधी तंबाखू या सारखे आरोग्यास हानिकारक असलेल्या पदार्थाची छुप्या मार्गाने होत असलेली खरेदी विक्री रोखण्याचे मोठे आव्हान नवी मुंबई पोलिसांसमोर आहे.

तंबाखूजन्य पदार्थ आरोग्यास हानिकारक असल्यामुळे निर्माण होणाऱ्या आजारांमुळे जीवही जातो. त्यामुळे तरुणांना व्यसनाधिनतेपासून दूर ठेवून निरोगी, सुदृढ समाजाच्या निर्मितीसाठी राज्यात हातभट्टी दारु, गुटखा, मावा आदीच्या विक्रीवर राज्यात कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे त्याचे काटेकोर पालन होत नसल्याने काही भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱयांच्या आश्रयाखाली अवैध व्यवसाय चालत असल्याचे अनेकदा समोर आले आहे.  

इतर राज्यात गुटखा उत्पादनास व विक्रीस बंदी नसल्याने या राज्यातून तस्करी करुन खुष्कीच्या मार्गाने विविध वाहनांचा वापर करुन गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ महाराष्ट्रात विक्रीसाठी आणला जात असल्याचे पोलिसांकडुन करण्यात आलेल्या अनेक कारवायांमधून उघड झाले आहे. तस्करी करुन राज्यात आलेल्या गुटखा, सुगंधीत तंबाखुच्या विक्रीची दरवर्षीची उलाढाल कोट्यवधींच्या घरात असल्याचे बोलले जाते. राज्याच्या सीमेवर पोलिसांचे तपासणी नाके असतानाही गुटखा येतोच कसा असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.  

नवी मुंबईत २०२१ या वर्षामध्ये गुटखा व इतर तंबाखुजन्य पदार्थाच्या एकुण १२० कारवाया पोलिसांकडून करण्यात आल्या होत्या. यात विविध पोलीस ठाणे अंतर्गत ८४ तर गुन्हे शाखेकडुन ३६ कारवाया करण्यात आल्या होत्या. या एकुण कारवायांत तब्बल १ कोटी २५ लाख ७३ हजार रुपयांचा गुटखा, पानमसाला तसेच इतर तंबाखुजन्य पदार्थ जप्त करुन एकुण ३५० आरोपींना अटक करण्यात आली होती. तर २०२२ मध्ये गुटखाच्या ४५ कारवाया केल्या आहेत. तसेच गुटख्यांची तस्करी करणाऱया ९५ आरोपींना अटक करुन तब्बल १ कोटी ५७ लाख रुपये किंमतीचा वेगवेगळ्या प्रकारच्या गुटख्याचा साठा जप्त केला आहे. पोलीस तसेच अन्न व औषध प्रशासनाकडुन गुटखा बाळगणाऱया व विकणाऱयांवर कारवाई करण्यात येऊन त्यांच्याकडुन मोठया प्रमाणात गुटख्याचा साठा जप्त केला जात असला तरी नवी मुंबईत छोटया-छोटया पान टपऱयावर दुकानांमध्ये गुटख्याची खरेदी विक्री सुरुच असल्याचे दिसून येत आहे. 

पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार हाती घेताच नवी मुंबई शहराला गुटखा व अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यानी नवी मुंबईच्या हद्दीत चालणारे सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी त्यांनी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्याच्या सक्त सूचना सर्व पोलीस ठाणे, तसेच गुन्हे शाखेच्या सर्व युनिटसला दिले आहेत. काही दिवसापूर्वीच पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी ऑलआऊट ऑपरेशन हाती घेऊन पोलीस दलाला ऍक्शन मोडमध्ये आणले होते. या ऑलआऊट ऑपरेशनमध्ये पोलीस दलाच्या विविध पथकांनी एकाच दिवशी पोलीस आयुक्तालयातील ४१ विविध अवैध व्यवसायांवर धाडी घातल्या होत्या. यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध मद्याचा व्यवसाय करणा-यांवर कारवाई करण्यात आली होती. त्याचप्रमाणे गुटखा व विदेशी सिगारेटची विक्री करणाऱ्या पान टपऱ्या, आणि जुगार अड्यांवर कारवाई केली गेली. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

प्रत्येक पोलीस ठाण्यात लवकरच सायबर सेल -मिलिंद भारंबे